चिंता वाढली… भरपूर सूर्यप्रकाश असूनही व्हिटॅमिन डीची कमी, कारणे काय?; उपाय काय?
भारतात सूर्यप्रकाश असूनही, व्हिटॅमिन डीची कमतरता मोठ्या प्रमाणावर आहे. आधुनिक जीवनशैली, प्रदूषण आणि त्वचेचा रंग यामुळे सूर्यप्रकाशाचे शोषण कमी होते. यामुळे हाडे कमकुवत होतात, थकवा येतो आणि प्रतिकारशक्ती कमी होते. सूर्यप्रकाश, व्हिटॅमिन डी समृद्ध आहार आणि आवश्यकतेनुसार सप्लिमेंट्स घेणे उपयुक्त आहे. व्हिटॅमिन डीची पातळी तपासून डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
आपल्याला निरोगी राहायचं असेल तर शरीराला व्हिटॅमिन डी अत्यंत महत्त्वाचा आहे. व्हिटॅमिन डी शरीरात दुहेरी भूमिका बजावत असते. एकाच वेळी पोषक तत्त्व आणि हार्मोनचं काम करत असते. हाडं आणि दातांसाठी आवश्यक असलेले कॅल्शियम, फॉस्फरसचे शोषण व्हिटॅमिन डी शरीरात किती प्रमाणात आहे, यावर अवलंबून असते. रोगप्रतिकारक कार्य, स्नायूंचे आरोग्य, सूज, मानसिक स्थिती याची देखभाल करण्यास देखील व्हिटॅमिन डी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. सूर्यप्रकाशातील अल्ट्राव्हायोलेट बी (यूव्हीबी) किरणांमुळेच व्हिटॅमिन डी शरीरात तयार होते, त्यामुळे याला ‘सन्साईन व्हिटॅमिन’ असेही म्हणतात.
तरीही भारतात सर्वाधिक सूर्यप्रकाश मिळत असला तरी अनेक लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आढळून येते. यामुळे हाडांची कमकुवतता (लहान मुलांमध्ये रिकेट्स, वयस्कांमध्ये ऑस्टिओमॅलासिया), सांधेदुखी, थकवा, प्रतिकारशक्तीची कमतरता, स्नायूंचा कमकुवतपणा आणि शरीराच्या एकूण आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
कारणे
अहमदाबादमधील शालबी हॉस्पिटलमधील कन्सल्टंट इमर्जन्सी मेडिसिन आणि क्रिटिकल केअर डॉ. मिनेश मेठ यांनी व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची कारणं सांगितली आहेत. डॉ. मेठ यांच्या मते, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचे मुख्य कारणे आधुनिक जीवनशैली, सांस्कृतिक परंपरा आणि पर्यावरणीय घटक आहेत. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत डॉ. मेठ यांनी सांगितले की, शहरातील बहुसंख्य लोक बहुतेक वेळा घरात, ऑफिसमध्ये किंवा शाळेत असतात. त्यामुळे त्यांना सूर्यप्रकाश थोडाच मिळतो. व्हिटॅमिन डीच्या निर्मितीसाठी आवश्यक असा सूर्यप्रकाश लोक घेतच नाही. यामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण होते. तसेच, शरीराच्या बहुतेक भागांचे झाकलेले कपडे घालणे आणि सूर्यप्रकाशापासून बचाव करणारे सनस्क्रीनचे वाढते वापर यामुळे सूर्यप्रकाश शरीरावर पडण्याचे प्रमाण कमी होते.
एक आणखी महत्वाचे कारण म्हणजे शहरांमधील वायू प्रदूषण. जास्त प्रमाणात धूळ, धूर आणि इतर प्रदूषण तत्वे UVB किरणांना थांबवतात. त्यामुळे प्रदूषित शहरांमध्ये राहणाऱ्यांना सूर्यप्रकाश मिळाल्याचे तरी व्हिटॅमिन डी मिळवण्याची खात्री नसते. याशिवाय, भारतात सामान्यत: लोकांचा त्वचेला उच्च मेलेनिन प्रमाण असतो. तो UV किरणांपासून संरक्षण करतो, आणि त्यामुळे त्वचेत UVB किरण शोषणू घेण्याची क्षमता कमी होते.
व्हिटॅमिन डीची उणीव कशी भरून काढणार?
सूर्यप्रकाश घ्या : दररोज सकाळी 10 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत 15-30 मिनिटे बाहेर जाऊन सूर्यप्रकाश घ्या. आपला चेहरा, हात, पाय या शरीराच्या भागांना सूर्यप्रकाश पोहोचेल याची खबरदारी घ्या.
आहारात काय? : सॅल्मन, मच्छी, फिश रो, फोर्टिफाइड डेअरी प्रॉडक्ट्स, धान्ये यासारखे व्हिटॅमिन डी असलेले खाद्यपदार्थ आहारात घ्या.
सप्लिमेंट्स वापरा : प्रौढ व्यक्तींना दररोज 400 IU (आंतरराष्ट्रीय युनिट्स ) व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. 70 वर्षांवरील लोकांना 800 IU आवश्यक असतात. व्हिटॅमिन डीच्या सप्लिमेंट्सचा सर्वोत्तम शोषणासाठी, हे पाणी किंवा चरबी असलेल्या पदार्थांसह घ्या.
नियमित तपासणी : जर आपल्याला थकवा, हाडांमध्ये वेदना किंवा वारंवार संसर्ग होण्याची लक्षणे दिसत असतील, तर आपले व्हिटॅमिन डीचे प्रमाण तपासून घ्या. सप्लिमेंट्स संदर्भात डॉक्टरांचा सल्ला घ्या.
( डिस्क्लेमर : बातमीत दिलेल्या माहितीला आम्ही दुजोरा देत नाही. कोणताही उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला घेऊनच उपचार करावेत.)