उन्हाळ्यात थंडावा हवाय? ‘या’ फुलांचा नैसर्गिक ज्यूस ठरेल परफेक्ट उपाय!
उन्हाळ्याच्या या दिवसांत बाजारात मिळणाऱ्या कृत्रिम पेयांपेक्षा बुरांश ज्यूस हा एक चविष्ट, आरोग्यदायी आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणारा पर्याय आहे.

उन्हाळा सुरू झाला की थंडपाण्याचे ग्लास, कुल्फी, आईस्क्रीम, लस्सी आणि विविध फ्रूट ज्यूसचा मोह टाळणं कठीण होतं. पण यंदा आरोग्यसंपन्न आणि नैसर्गिक पर्याय शोधत असाल, तर बागेश्वर जिल्ह्यात मिळणारा बुरांश फुलांचा रस तुमच्यासाठी खास ठरू शकतो. हिमालयीन प्रदेशात फुलणाऱ्या या बुरांश फुलांपासून बनवलेला रस शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असून, स्थानिक महिलांचा रोजगारही वाढवणारा आहे.
फुलांपासून बनलेला खास ज्यूस
बुरांश हे उत्तराखंडमध्ये आढळणारे एक सुंदर, लालसर फुल आहे. फक्त काही काळासाठीच फुलणाऱ्या या फुलांपासून बनवलेला रस ‘बुरांश ज्यूस’ या नावाने ओळखला जातो. हा रस तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे रसायन, कृत्रिम गोडवा किंवा संरक्षक वापरले जात नाहीत. त्यामुळे तो पूर्णतः नैसर्गिक आणि आरोग्यदायी आहे.
बागेश्वरच्या सारस मार्केटमध्ये महिला बचतगटाच्या सदस्यांनी हा रस तयार करण्याची जबाबदारी उचलली आहे. या महिलांनी पारंपरिक पद्धतीचा वापर करून बुरांश रसाचे उत्पादन सुरू केले असून, तो सध्या १२० रुपये प्रतिलिटर दराने विकला जातो. रसाच्या दोन प्रकारांची निर्मिती केली जाते – एक शुगर फ्री आणि दुसरा थोड्या गोडव्यासह. त्यामुळे मधुमेही आणि आरोग्य जागरूक ग्राहकांसाठी ही उत्तम निवड आहे.
बुरांश ज्यूसचे आरोग्यदायी फायदे
रेखा देवी या स्थानिक महिलांनी एका वृत्त वाहिनिला दिलेल्या माहितीनुसार, बुरांश ज्यूसमध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे हृदय निरोगी राहते, रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. उन्हाळ्यात डिहायड्रेशन होण्याचा धोका मोठा असतो. अशा वेळी हा रस शरीरात ऊर्जा निर्माण करतो आणि थंडावा देतो.
याशिवाय, हा रस पाचनक्रिया सुधारतो, त्वचेला तेजस्वी बनवतो आणि केसांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो. इम्युनिटी वाढवण्यासाठी बुरांश रसाचे सेवन नियमित केल्यास फायदे लवकरच जाणवतात.
स्थानिक महिलांना आर्थिक उत्पन्न
बुरांश ज्यूस फक्त आरोग्यासाठी नाही, तर स्थानिक अर्थव्यवस्थेसाठीही महत्त्वाचा ठरत आहे. महिलांच्या बचतगटांनी हे उत्पादन हातात घेतल्यामुळे त्यांना घरबसल्या रोजगार मिळतोय. यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली असून, सामाजिकदृष्ट्याही त्यांना नवी ओळख मिळते आहे.
बागेश्वरच्या मुख्य बाजारपेठेपासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या सारस मार्केटमध्ये हा रस सहज उपलब्ध आहे. पर्यटक आणि स्थानिक दोघांनाही या रसाची चव घेण्याची संधी आहे. उन्हाळ्याच्या उकाड्यात, नैसर्गिक थंडावा देणारा आणि शरीरासाठी उपयुक्त ठरणारा हा पेय पर्याय नक्कीच ट्राय करून पाहावा.
उन्हाळ्याच्या या दिवसांत बाजारात मिळणाऱ्या कृत्रिम पेयांपेक्षा बुरांश ज्यूस हा एक चविष्ट, आरोग्यदायी आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणारा पर्याय आहे. निसर्गाचा हा गोड आणि ताजातवाना आशीर्वाद अनुभवण्यासाठी बागेश्वरच्या या खास जागेला एक भेट देणं नक्कीच फायदेशीर ठरेल.