घरून काम नको रे बाबा… ! 78% कर्मचाऱ्यांना ऑफिसचा माहौलच आवडतोय – रिपोर्ट
Why Worker Returning To Office : लिंक्डइन द्वारे करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात असे आढळले आहे की 78% म्हणजेच 10 पैकी 8 भारतीय कर्मचारी हे त्यांच्या कलीग्जसोबत असलेला बाँड आणि मैत्री यामुळे ऑफीसमध्ये जाऊन काम करणं पसंत करतात.
नवी दिल्ली : कोरोनाच्या काळात अनेक संस्थांनी वर्क फ्रॉम-होम (work-from-home)कल्चर सुरू केले, जे बऱ्याच ठिकाणी आजपर्यंतही सुरू आहे. मात्र, कोविडचा प्रभाव कमी झाल्यावर आता गोष्टी हळुहळू पुन्हा रुळावर येत असल्याने अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना कामासाठी ऑफिसमध्ये (office) बोलावण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर कार्यालयात कामासाठी जाताना कर्मचाऱ्यांचीही (workers) गैरसोय होत नाही. कार्यालयातील वातावरणही बदलू लागले आहे. जिथे पूर्वी लोक ऑफिसला जायला कचरायचे तिथे आता लोकांना ऑफिसला जायला मजा येऊ लागली आहे.
लिंक्डइनच्या एका सर्व्हेमध्ये हा खुलासा झाला आहे. LinkedIn ने केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की 78 टक्के म्हणजे 10 पैकी जवळपास 8 भारतीय कर्मचारी त्यांच्या सहकाऱ्यांशी असलेला बाँड, आणि मैत्री, संपर्क साधण्यासाठी ऑफीसमध्ये जाणं पसंत करतात. त्याच वेळी, अहवालात असे दिसून आले आहे की 63 टक्के कर्मचार्यांना वाटते की दूर राहून काम केल्याने त्यांच्या करिअरवर कोणताही हानिकारक परिणाम झाला नाही. त्याच प्रमाणात असाही विश्वास होता की जर ते कार्यालयात गेले नाहीत तर त्यांची करिअर वाढीची क्षमता कमी असू शकते.
78 टक्के कर्मचारी स्व-मर्जीने ऑफीसला जातात – रिपोर्ट
हा सर्व्हे 28 फेब्रुवारी ते 6 मार्च 2023 दरम्यान लिंक्डइनद्वारे आयोजित करण्यात आला होता. भारतातील 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 1,001 पेक्षा जास्त कामगारांसह सेन्सस इंडियाने केलेल्या संशोधनावर आधारित हा अहवाल देण्यात आला होता. या अहवालानुसार, पूर्वीच्या कर्मचार्यांना कार्यालयात शारीरिकरित्या उपस्थित राहण्याची सक्ती वाटत होती, परंतु मुलाखत घेतलेल्या 78 टक्के व्यावसायिकांनी सांगितले की ते आता त्यांच्या स्वत: च्या इच्छेने असे करतात.
हे कर्मचारी अधिक सामाजिक होण्यासाठी आणि एका संघाचा भाग होण्यासाठी कार्यालयात येण्यास प्राधान्य देत आहेत. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी 72 टक्क्यांहून अधिक लोकांनी असेही म्हटले आहे की ते कामाच्या ठिकाणी असलेला छोटासा टी-ब्रेक खूप मिस करतात. जिथे त्यांचं काम आणि वैयक्तिक जीवन याबद्दल त्यांच्या सहकाऱ्यांसोबत शेअरिंग करू शकतात, थोड्या गप्पा मारू शकतात. 71 टक्के कर्मचार्यांच्या सांगण्यानुसार, कार्यालयात कमी काम करण्याची भरपाई करण्यासाठी, ते घरी जास्त वेळ काम करून कामाप्रती गंभीर असल्याचे दर्शवतात.
डेस्क बॉम्बिंग आहे नवा ट्रेंड
कोरोनानंतर ऑफिसमध्ये नवीन ट्रेंड येऊ लागला आहे. हा ट्रेंड म्हणजे डेस्क बॉम्बिंग आहे. लिंक्डइनच्या अहवालानुसार, आता बहुतेक कर्मचारी त्यांच्या सहकाऱ्यांच्या डेस्कवर वेळ घालवणे पसंत करतात. बहुतांश कर्मचाऱ्यांना, आपल्या इतर कलीग्जना आधीच माहिती न देता त्यांच्या डेस्कवर जाऊन गप्पा मारायला आवडतात. या सर्वेक्षणातील 62 टक्के लोकांना असं वाटतं की लगेच बोलण्यासाठी किंवा गप्पा मारण्यासाठी डेस्क बॉम्बिंग हा सर्वोत्तम मार्ग आहे.
शुक्रवारी ऑफीसला जाणं लोकांना नापसंत
यापूर्वी लोकं शुक्रवारी ऑफिसमध्ये खूप आनंदी असायचे. शुक्रवारनंतर 2 दिवसांच्या सुट्टीसाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत होता. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आता गुरुवार हाच नवा शुक्रवार बनत आहे. लिंक्डइन या नेटवर्किंग साइटने नुकताच एक रिपोर्ट जारी केला आहे. या अहवालातील आकडेवारी धक्कादायक आहे. अहवालानुसार, आता लोक वर्क लाईफ बॅलन्स तयार करण्यासाठी जागरूक होत आहेत.
पूर्वी जिथे ऑफिसला जाण्यासाठी शुक्रवार हा लोकांचा सर्वात आवडता दिवस होता, तिथे आता लोकांना शुक्रवारी ऑफिसला जायला आवडत नाही. सामान्य दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी कमी कर्मचारी कार्यालयात दिसतात. अहवालासाठी सर्वेक्षण करण्यात आलेल्या 50 टक्के लोकांनी सांगितले की, त्यांना शुक्रवारी कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवायचा असतो. दुसरीकडे, काही लोकांना या दिवशी आपली उर्वरित कामे मार्गी लावायची असतात. त्यामुळेच त्यांना शुक्रवारी ऑफिसला जायला आवडत नाही.