शेवग्याच्या शेंगा खाता ? त्याच्या सेवनामुळे आरोग्याला मिळतात अनेक फायदे, जाणून घ्या..
शेवग्याच्या शेंगा आणि त्याच्या पानांचा उपयोग बहुतांश घरात केला जातो. सांबार किंवा आमटीमध्ये घातलेल्या शेंगा किंवा त्यांची भाजी करून खाल्ली जाते.
नवी दिल्ली | 19ऑगस्ट 2023 : बहुतांश घरात शेवग्याच्या शेंगा आणि त्याच्या पानांचा उपयोग केला जातो. शेंगाची भाजी असो किंवा सांबार, आमटीमध्ये त्याचा समावेश केल्याने पदार्थाची चव वाढते.शेवग्याच्या शेंगाना मोरिंगा (Moringa) किंवा ड्रमस्टीक (drumstick) असेही म्हटले जाते. यामध्ये अनेक पोषक गुणधर्म, खनिजे आणि जीवनसत्वं असतात. त्यांचे नियमित सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.
शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे
- हे अत्यंत पौष्टिक असते. शेवग्याच्या शेंगा आणि त्यांची पाने यामध्ये प्रथिने, अमिनो ॲसिड , जीवनसत्वे तसेच अँटी-ऑक्सीडेंटही असतात. तसेच त्यामध्ये कॅल्शिअम, लोह, बी व्हिटॅमिन, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि व्हिटॅमिन सी यांसारख्या महत्त्वाच्या पोषक घटकांचाही समावेश असतो. एकंदरच शेवग्याच्या शेंगांमध्ये असे पोषक घटक आहेत जे शरीराचे कार्य सुरळीत चालावे यासाठी व अनेक रोगांपासून बचाव करण्यासाठी महत्वपूर्ण ठरते.
- त्यामध्ये फायटोन्यूट्रिएंट्स, अँटिऑक्सिडंट्स आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे घटक असतात. यामुळे ऑक्सिडेटिव्ह तणाव, जळजळ कमी होते आणि रोगाशी लढा देण्याची शक्ती वाढते. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की शेवग्याच्या शेंगांमध्ये आढळणारे काही विशिष्ट कंपाऊंड्स हे जुनाट आजारांशी संबंधित जळजळ कमी करण्यास मदत करू शकतात.
- एनर्जी वाढवण्यासाठी कॅफीनमुक्त पदार्थांच्या शोधात असाल तर सकाळच्या दिनचर्येत शेवग्याच्या शेंगाचा समावेश करू शकता. त्यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, लोह असे अनेक पोषक घटक असतात आणि मेटाबॉलिज्म वाढवण्यास प्रोत्साहन देतात. त्यामध्ये बी व्हिटॅमिन देखील असते, जे दीर्घकालीन ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतात .
- वर नमूद केल्याप्रमाणे शेवग्याच्या शेंगामध्ये पोटॅशिअम, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. ज्यांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे, त्यांनी शेवग्याच्या शेंगांचा आहारात समावेश करणे हा उत्तम पर्याय ठरतो. शेवग्याच्या शेंगांच्या पानांचा रस काढून प्यायल्यानेही हाय बीपीच्या रुग्णांना फायदा मिळू शकतो.
- या शेंगांमध्ये कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते, जे लहान मुलांसाठी खूप फायदेशीर आहे, ज्यामुळे त्यांची हाडं आणि दात दोन्ही मजबूत होतात. तसेच यामध्ये योग्य प्रमाणात लोह, मॅग्नेशिअम, फॉस्फरस आढळून येते, ज्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते.
- शेवग्याच्या शेंगा या लठ्ठपणा आणि शरीरातील वाढलेली चरबी दूर करण्यासाठी फायदेशीर मानल्या जातात. त्यामध्ये फॉस्फरसचे प्रमाण मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त कॅलरीज कमी होतात. तसेच याच्या सेनाने चरबी कमी होऊन लठ्ठपणा कमी करण्यास मदत होते. शेवग्याच्या पानांच्या रसाचे सेवन केल्याने लठ्ठपणा हळूहळू कमी होतो. मोरिंगा चयापचय वाढविण्यावर सकारात्मक परिणाम करते असे मानले जाते.
- शेवग्याच्या शेंगा तसेच त्याची पाने यामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे अँटीफंगल आणि अँटीव्हायरल गुणधर्म आहेत, जे आपल्या त्वचेला अनेक प्रकारच्या संक्रमणापासून वाचवतात. त्याचे सेवन त्वचेसाठी फायदेशीर ठरते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)