कोरड्या खोकल्यापासून आराम देतील हे 5 हर्बल चहा, अशा पद्धतीने बनवा
हिवाळ्यात खोकला आणि सर्दी होणे सामान्य आहे. हा फार गंभीर आजार नसला तरी कोरडा खोकला खूप त्रासदायक ठरतो. जास्त खोकल्यामुळे घशात खवखव जाणवते आणि बोलताना सुद्धा अनेकदा त्रास होत असतो. अशा वेळी तुम्ही कोणत्याही औषधाशिवाय केवळ हर्बल चहाद्वारे यावर उपाय करू शकता.

हिवाळा हा ऋतू असो वा नसो खोकला आणि सर्दीची समस्या सामान्य झाली आहे. अशातच वातावरणातील बदलामुळे तसेच वातावरणातील प्रदूषण यामुळे कोरडे खोकले होण्याची समस्या जास्त वाढू लागली आहे. ज्यामुळे घशात जळजळ होत असते. कोरड्या खोकल्यामध्ये वारंवार खोकल्याने घशाला त्रास होत असतो आणि बोलण्यास त्रास होऊ लागतो. ही समस्या टाळण्यासाठी घशाची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. कोरड्या खोकल्यासाठी बाजारात बरेच सिरप उपलब्ध असले तरी तुम्ही घरगुती उपचार आणि हर्बल पद्धतींनी देखील त्यावर उपचार करू शकता.
जर तुम्ही सतत कोरड्या खोकल्याने त्रस्त असाल आणि नैसर्गिक व घरगुती पद्धतीचा अवलंब करू इच्छित असाल तर हर्बल चहा तुमच्या कोरड्या खोकल्यावर रामबाण उपाय ठरू शकतो. हर्बल चहा घशाला होणाऱ्या जळजळीपासून आराम देते, तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. त्यामुळे कोरड्या खोकल्यापासून लवकर आराम मिळतो. या लेखात आज 5 प्रभावी हर्बल चहाबद्दल जाणून घेणार आहोत जे कोरड्या खोकल्यापासून मुक्त होण्यासाठी प्रभावी आहेत.
आलं आणि मधाचा चहा
कोरड्या खोकल्यापासून आराम मिळण्यासाठी आलं आणि मधाचा चहा खूप फायदेशीर आहे. आल्यामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे घशाची जळजळ कमी करतात. मधाने खोकला कमी होतो.
बनवण्याची पद्धत:
कप पाणी उकळून घ्या. नंतर त्यात १ इंच किसलेलं आलं घालून मंद आचेवर ५-७ मिनिटे उकळू द्या. गॅस बंद केल्यानंतर त्यात १ चमचा मध मिसळून गरम गरम या हर्बल चहाचे सेवन करा.
तुळस आणि जेष्ठमधाचा चहा
तुळस आणि जेष्ठमध हे दोन्ही आयुर्वेदिक औषधे आहेत जी घशातील जळजळ कमी करतात आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात. यासाठी कोरड्या खोकल्यावर त्यांचा चहा खूप फायदेशीर उपाय करतो.
बनवण्याची पद्धत:
१ कप पाण्यात ७-८ तुळशीची पाने आणि १ चमचा मुलेठी पावडर उकळून घ्या. मंद आचेवर १० मिनिटे उकळू घ्या. त्यानंतर तयार झालेला हर्बल चहा गाळून हळूहळू प्यावे.
हळद आणि काळी मिरीचा चहा
हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे कंपाऊंड असते, जे संक्रमणाशी लढण्यास मदत करते. काळी मिरी श्लेष्मा पातळ करते आणि खोकल्यापासून आराम देते. त्यामुळे कोरडा खोकला दूर करण्यासाठी तुम्ही हे पिऊ शकता.
बनवण्याची पद्धत:
१ कप पाण्यात अर्धा चमचा हळद आणि १/४ चमचा काळी मिरी घाला. ५ मिनिटे उकळून घ्या. नंतर चवीनुसार मध घालून तयार हर्बल चहा प्यावे.
दालचिनी आणि लवंग चहा
दालचिनी आणि लवंगमध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात जे घशातील जळजळ कमी करण्यास मदत करतात. कोरड्या खोकल्यामुळे घशात जळजळ होऊ शकते आणि यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही दालचिनी आणि लवंग चहा पिऊ शकता.
बनवण्याची पद्धत:
१ कप पाण्यात १ छोटी दालचिनी आणि २-३ लवंगा घाला. 8-10 मिनिटे उकळा. पूर्ण उकळल्यानंतर तयार चहा गाळून त्यात मध मिसळावे. चहा गरमागरम प्यावा.
गुळवेल आणि आल्याचा चहा
कोरड्या खोकल्यापासून आराम मिळण्यासाठी गुळवेल आणि आल्याचा चहा देखील खूप फायदेशीर आहे. गुळवेल शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते आणि कोरडा खोकला लवकर बरा करते.
बनवण्याची पद्धत:
१ कप पाण्यात १ चमचा गुळवेल पावडर आणि १/२ इंच आले घालावे. १० मिनिटे उकळा आणि नंतर गाळून प्या.या चहाच्या सेवनाने तुम्हाला लवकरच परिणाम दिसतील.
डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)