कोरडे रंग पोहोचवू शकता डोळ्यांना मोठी हानी… रंगपंचमीला अशी घ्या काळजी
कोरड्या रंगांमध्ये अनेकदा विषारी घटक असण्याची शक्यता असते. त्यामुळे डोळ्यात लालसरपणा, खाज सुटणे, जळजळ यांसारखी लक्षणे दिसू शकतात. त्यामध्ये अनेकदा हानिकारक रसायने असतात. ज्यामुळे डोळ्यांची जळजळ, लालसर डोळे, अंधुक दृष्टी आणि अगदी अंधत्व येऊ शकते.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Corona) लोकांना होळी (Holi 2022) अन् रंगपंचमीचा सण मोकळेपणाने साजरा करता आला नाही. आजही रंगपंचमी साजरी करताना कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या संपर्कात येण्याची भीतीही लोकांना वाटत आहे. परंतु कोविडची प्रकरणे कमी झाल्यामुळे आणि सरकारने सर्व कोविड निर्बंध हटवण्यास सुरुवात केली असल्याने अनेकांना दिलासा मिळत आहे. अशा परिस्थितीत केवळ विषाणूपासूनच नव्हे तर रंगांमुळे (colors) अनेक प्रकारच्या दुष्परिणामांपासूनही सावध राहण्याची गरज आहे. रंगपंचमीच्या दिवशी कोरोनाशिवाय इतर कोणते धोके निर्माण होउ शकतात. याबाबत ‘TV9 मराठी’ने काही तज्ज्ञांशी चर्चा करुन त्यांचे मत जाणून घेतले आहे.
विट्रो-रेटिनल सर्जन आणि यूवाइटिस तज्ज्ञ सम्यक वी मुल्कुटकर यांनी सांगितले की, होळीचा रंग एखाद्याच्या डोळ्यात गेल्यास यातून डोळ्याला गंभीर दुखापत होऊ शकते. होळीमध्ये वापरल्या जाणार्या रंगांमध्ये रासायनिक आणि धातूचे दूषित घटक असू शकतात जे डोळ्यांच्या पृष्ठभागासाठी खूप वाईट असतात. ते डोळ्याच्या पारदर्शक पृष्ठभागाला इजा करू शकतात. यामुळे एपिथेलियल दोष, ओरखडे किंवा न बरे होणारे कॉर्नियल अल्सर होऊ शकतात. कधीकधी या कोरड्या रंगांमध्ये बुरशी देखील असते जी कॉर्नियल अल्सरला दुसऱ्यांदा संक्रमित करू शकते. कधीकधी गंभीर रासायनिक जखमेमुळे दीर्घकाळ उपचार करूनही बरे होत नाहीत. संसर्ग झालेल्या कॉर्नियल अल्सरमुळे दृष्टीवर परिणाम होउ शकतो.
अंधत्वाचा धोका वाढतो
आय हेल्थ एशिया सायटसेव्हर्सचे ग्लोबल टेक्निकल लीड डॉ. संदीप बुट्टन यांनी सांगितले की, दूषित रंगांमुळे डोळ्यांना इजा आणि दृष्टी खराब होण्याची शक्यता असते. कोरडे रंग विषारी असू शकतात आणि डोळ्यात लालसरपणा, खाज सुटणे, जळजळ होणे यासारख्या समस्या निर्माण होउ शकतात. रंगपंचमीच्या दिवशी डोळ्यांना दुखापत होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पाण्याचे फुगे. हे फुगे लोकांच्या चेहऱ्यावर फोडले जातात. त्यामुळे डोळ्यांना गंभीर दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे रक्तस्त्राव, सूज, रेटिनल डिटेचमेंट होऊ शकते. त्यामुळे कायमची दृष्टी जाण्याचा धोकाही वाढतो.
अशी घ्या काळजी
रंग चुकून डोळ्यांत गेला तर डोळे चोळू नका. ताबडतोब डोळे स्वच्छ पाण्याने धुवा. रंगीत फुगा किंवा वॉटर गनमुळे डोळ्याला दुखापत झाल्यास, ताबडतोब उपचार घ्या कारण उशीर केल्याने दुखापत अधिक गंभीर होऊ शकते. डोळे स्वच्छ पाण्याने धुत असताना वारंवार डोळे उघडबंद केल्याने रंगाचे कण निघून जाण्यास आणि रसायनांची तीव्रता कमी होण्यास मदत होते. त्वचारोगतज्ज्ञ डॉ. किरण लोहिया यांनी सांगितले की, होळीच्या रंगांचा आपल्या त्वचेवर सर्वाधिक परिणाम होतो. कृत्रिम रंगांमुळे दुष्परिणाम होत असतात. जेव्हा तुम्ही रंग काढण्याचा प्रयत्न करता तेव्हा ते काढणे कठीण होते, ज्यामुळे त्वचेला पुरळ आणि जळजळ होऊ शकते.
त्वचेवरील दुष्परिणाम टाळण्यासाठी हे करा
- आदल्या रात्री रेटिनॉल, रेटिनॉइड्स, अल्फा हायड्रॉक्सी अॅसिड, पॉलीहायड्रॉक्सी अॅसिड किंवा सॅलिसिलिक अॅसिड वापरू नका.
- रंगपंचमीच्या किमान 6 दिवस आधी चेहऱ्यावर/मानेवर लेसर लावू नका.
- होळीच्या 6 दिवस अगोदर फेशियल किंवा पील करू नका.
- होळीच्या आधी किंवा होळीच्या दिवशी रंग खेळण्याआधी स्क्रब करु नका.