Tips To Wear High Heels: हाय हिल्समुळे पायांना होतोय त्रास ? हे उपाय करुन पहा, ठरतील फायदेशीर
उंच, स्टायलिश व ग्लॅमरस दिसण्यासाठी अनेक महिला हाय हिल्सच्या चपला वापरतात. मात्र त्यांच्या सततच्या वापरामुळे पायांचे दुखणे वाढते, कधीकधी लागूही शकते. काही हेल्थ टिप्सचा वापर केलात तर सहजपणे हाय हिल्स वापरता येतील.
Foot care at home : अनेक महिला उंच, ग्लॅमरस आणि स्टायलिश दिसण्यासाठी हाय हिल्सच्या (उंच टाचांच्या) चपला अथवा सँडल्सचा वापर करत असतात.आधी केवळ मॉडेल्स किंवा अभिनेत्री हाय हिल्सच्या (High Heels) चपलांचा वापर करायच्या मात्र आजकाल कॉलेजला, ऑफीसला जाणाऱ्या महिलाही सर्रासपणे हाय हिल्स वापरताना दिसतात. हाय हिल्सच्या चपलांमुळे व्यक्तीमत्वात बदल दिसतो. हाय हिल्समुळे तुम्ही केवळ उंचच दिसत नाही तर दिमाकदार आणि कॉन्फिडंटही वाटता.
त्यामुळे आजकाल बऱ्याच महिला शॉपिंग, पार्टी, ऑफीसला जाताना हाय हिल्सचा वापर करताना दिसतात. मात्र सतत उंच टाचांच्या चपला घातल्यामुळे पायांचे दुखणे (Foot pain) सुरू होते. त्या जरी स्टायलिश दिसत असल्या तरी त्यामुळे पायांवर फोड येणे, ते सुजणे, दुखणे, अशा अनेक समस्या सुरू होतात. बराच वेळ हाय हिल्स घातल्याने पायांवर दाब येतो, ते आखडतात. त्यांच्या नसांना सूज येते, काहीवेळेस ते इतके दुखू लागतात, की धड चालताही येत नाही. कंबरेचे, पाठीचे दुखणेही मागे लागू शकते. मात्र पायांची नीट काळजी घेतल्यास (Foot care) हाय हिल्स घालूनही तुम्हाला सहज चालता येईील, काही त्रास होणार नाही. काही टिप्स फॉलो केल्यास हाय हिल्समुळे पायांना लागणे किंवा त्यांचे दुखणे कमी होऊ शकते.
या टिप्स करा फॉलो
१) पेशींचा व्यायाम – जर तुम्ही हाय हिल्सच्या चपला किंवा सँडल्स रोज वापरत असाल तर तुम्हाला पायांचा आणि मांसपेशींचा व्यायाम करणे आवश्यक आहे. प्रत्येक पायाचा व्यायाम किमान 1 मिनिटं तरी करा. हा व्यायाम दिवसातून 2 ते 3 वेळा करणे महत्वाचे आहे. त्यामुळे तुमच्या पायाच्या पेशी रिलॅक्स होतील व पायाचे दुखणे कमी होईल. तसेच हिल्समुळे काही लागण्याचा धोकाही कमी होईल.
२) फूट मसाज – रोज हाय हिल्स घातल्यामुळे पायांवर दबाव येतो. त्यांना जर आराम मिळाला तर त्यांचे दुखणेही कमी होऊ शकते. त्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी पायाच्या तळव्यांना नारळाच्या तेलाने हलक्या हाताने छान मालिश करावे. त्यामुळे पायाचे दुखणे तर कमी होईलच पण तुमचे शरीर आणि मनही रिलॅक्स होईल.
३) उभे राहण्याची पद्धत सुधारा – सतत हाय हिल्स घातल्याने तुमचे पॉश्चर खराब होऊ शकते. त्यामुळे हिल्स घातल्यावर उभं राहण्याची व चालण्याची पद्धत सुधारली पाहिजे. पायांवर कमीत कमी दाब येईल अशा पद्धतीने उभे रहा. चालताना डोकं सरळ रेषेत ठेवा, ताठपणे चाला आणि खाली (जमिनीकडे) बघणं टाळा.
४) हिल्स खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा – जेव्हा तुम्ही हाय हिल्सच्या चपला अथवा सँडल्स विकत घ्यायला जाल, तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेवा. तुमच्या पायाच्या आकारानुसार चप्पल घ्या. खूप घट्ट किंवा खूप सैल चप्पल घेऊ नका. घट्ट चपलेमुळे पायांवर ताण येऊ शकतो. आणि चप्पल खूप सैल असेल तर चालताना पाय वाकडातिकडा पडून पाय मुरगळण्याची किंवा तुम्हाला लागण्याचा धोका असतो.