World Happiness Report 2023 : फिनलंडची सलग 6 व्यांदा सरशी, ठरला सर्वात आनंदी देश ; यादीत भारताचा नंबर कितवा ?
या अहवालानुसार, फिनलंड सर्वात आनंदी देश असून सलग सहाव्यांदा तो पहिल्या स्थानावर आहे. या यादीत भारत कितव्या स्थानावर आहे ते पाहूया.
नवी दिल्ली : ‘दि वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट’ (World Happiness Report) जाहीर झाला असून यावेळी पुन्हा फिनलंडला (Finland) जगातील सर्वात आनंदी देश म्हणून गौरवण्यात आले आहे. फिनलंड गेली 6 वर्षे सतत या यादीत अव्वल आहे. ‘दि वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट’ हा यूएन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्यूशन्स नेटवर्कद्वारे प्रकाशित करण्यात आला असून आनंदाच्या आधारावर देशांची क्रमवारी लावण्यात येते. दरवर्षी 20 मार्च रोजी इंटरनॅशनल डे ऑफ हॅपीनेस साजरा करण्यात येतो, त्या वेळी हा रिपोर्ट (report published) प्रकाशित झाला.
हा अहवाल गॅलप वर्ल्ड पोलच्या आधारे तयार करण्यात आला आहे. फिनलंड या यादीत अव्वल स्थानावर असून सलग सहाव्यांदा या देशाला प्रथम स्थान मिळाले आहे. डेन्मार्क दुसऱ्या स्थानावर तर आइसलँड या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र हा अहवाल आशियाई देशांसाठी निराशाजनक आहे. टॉप 20 आनंदी देशांच्या यादीत एकाही आशियाई देशाचा समावेश नाही.
देशातील लोकांची जीवनशैली, त्यांचे राहणीमान, जीडीपी , सामाजिक आधार, कमी भ्रष्टाचार आणि एकमेकांविषयी असलेला आदर व प्रेमाची भावना यांचे मूल्मापन करू जगातील सर्वात आनंदी देशांची यादी बनवली जाते. या सर्व निकषांच्या आधारावर वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टमध्ये यावेळीही फिनलंडला आपल्या क्रमवारीत प्रथम स्थानी ठेवले आहे. मात्र अफगाणिस्तान हा देश या यादीत सर्वात खालच्या, 137व्या क्रमांकावर आहे.
भारत कितव्या स्थानी आहे ?
जगातील सर्वात आनंदी देशांच्या यादीत भारत खूप पिछाडीला आहे. या यादीत भारत 125 व्या क्रमांकावर असून, तो जगातील सर्वात कमी आनंदी देशांपैकी एक बनला आहे. नेपाळ, चीन, बांगलादेश आणि श्रीलंका यांसारख्या शेजारी राष्ट्रांपेक्षाही भारत मागे पडला आहे. या यादीत सर्वात तळाशी म्हणजे 137 व्या स्थानी अफगाणिस्तान आहे.
देशांच्या रँकिंग व्यतिरिक्त, अहवाल 2023 मधील जगाची स्थिती देखील पाहिली जाते. या अहवालाच्या सहलेखकांपैकी एक असलेल्या लारा अकनिन यांनी त्यांचे मत नोंदवले आहे. “या वर्षीच्या अहवालात अनेक रंजक गोष्टी पहायला मिळाल्या. पण मला विशेषत: मनोरंजक आणि आनंददायी वाटणारी एक गोष्ट ही सामाजिकतेशी संबंधित आहे. दैनंदिन जीवनात दयाळूपणाचे विविध अनुभव दिसून आले. एखाद्या अनोळखी व्यक्तीला मदत करणे, धर्मादाय दान करणे आणि स्वयंसेवा करणे, असे अनेक अनुभव वाढल्याचे त्यांनी नमूद केले.