लांब , घनदाट केस हवे असतील तर नारळ पाण्याचा करा असा वापर
नारळ पाण्यामुळे केसांना अनेक अनोखे फायदे मिळतात. हेअर स्प्रेपासून ते हेअर पॅकपर्यंत तुम्ही तुमच्या केसांसाठी त्याचा सहज वापर करू शकता.
नवी दिल्ली : नारळाच्या झाडाला ‘कल्पवृक्ष’ म्हणतात हे तर आपणा सर्वांनाच माहीत आहे. कारण नारळ (Coconut) खाण्यासाठी तर उपयोगी असतोच पण त्याची करवंटी, काथ्या तसेच झाडाच्या झावळ्या या सर्वांचाही मनुष्याला खूप चांगला उपयोग होतो. नारळाप्रमाणेच त्याचे पाणीही (coconut water benefits) खूप फायदेशीर असते. केवळ पिण्यासाठीच नव्हे तर सौंदर्यांसाठीही त्याचा वापर केला जातो. विशेषत: जर तुम्ही कोरड्या, कमकुवत आणि निर्जीव केसांच्या समस्येशी झुंज देत असाल, तर नारळपाणी पिण्यासोबतच ते तुमच्या केसांसाठीही (hair care) वापरा. जेव्हा तुम्ही नारळाच्या पाण्याचे सेवन करता तेव्हा त्याचा परिणाम केसांवर व्हायला थोडा वेळ लागतो. पण ते केसांना लावल्याने लगेच फरक दिसून येतो.
नारळाच्या पाण्यात अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे, पोटॅशिअम आणि नैसर्गिक दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात. नारळपाणी हे केवळ तुमचे केस हायड्रेट करत नाही तर ते अधिक मॅनेजेबलेही बनवते, तसेच त्यामळे केसांच्या अनेक समस्या स्वतःच बऱ्या होतात. केसांसाठी नारळाच्या पाण्याचा उपयोग कसा करावा हे जाणून घेऊया.
नारळपाण्याचा हेअर स्प्रे
साहित्य – 1/4 कप नारळ पाणी 2 चमचे कोरफडीचा रस 2 चमचे जोजोबा तेल
कृती – प्रथम, नारळाचे पाणी, कोरफडीचे जेल आणि जोजोबा तेल हे सर्व साहित्य एका भांड्यात घ्या आणि नीट मिसळा. आता हे मिश्रण एका स्प्रे बाटलीत ओता. तुमचा हेअर स्प्रे तयार होईल. जेव्हा तुमचे केस निस्तेज आणि कोरडे वाटतील तेव्हा तुम्ही हा स्प्रे वापरू शकता. मात्र तीन ते चार दिवसांत संपेल एवढाच स्प्रे तयार करा. तो संपल्यावर पुन्हा ताजे मिश्रण बनवा.
शांपूमध्ये करा समावेश
हा एक अतिशय सोपा उपाय आहे. यामुळे तुम्ही हेअर केअर रूटीनमध्ये नारळ पाण्याचा सहज समावेश करू शकता.
साहित्य – 3-4 मोठे चमचे नारळपाणी केस धुण्यासाठी शांपू
कृती – सर्वप्रथम, तुमच्या शांपूमध्ये साध्या पाण्याऐवजी नारळाचे पाणी घाला. ते नीट मिक्स करा. नंतर तुमचे केस ओले करा आणि हा शांपू केसांना लावून मसाज करा. नंतर साध्या पाण्याने केस स्वच्छ धुवा.
हेअर रिन्सच्या स्वरुपात वापरा
केस धुतल्यानंतर त्यांची चमक जास्त काळ अशीच राहावी असे तुम्हाला वाटत असेल तर अशावेळी केस धुण्यासाठी नारळाचे पाणी वापरावे.
साहित्य – नारळाचे पाणी
कृती – सर्व प्रथम, तुमचे केस स्वच्छ धुवा आणि कंडीशनर लावा. नंतर केसांवर थोडं नारळाचे पाणी लावून तसेच ठेवा व केस धुवा. या पाण्याला वेगळा वास नसल्यामुळे नंतर साध पाणी ओतायची गरज नाही. तुमचे केस नैसर्गिकरित्या वाळू द्या.
नारळ पाणी व मधाचा हेअर मास्क
हा एक उत्तम हायड्रेटिंग मास्क असून अतिशय कोरड्या केसांसाठी हा मास्क खूप उपयोगी ठरू शकतो.
साहित्य – 6-7 चमचे नारळपाणी 4 मोठे चमचे मध
कृती – सर्वप्रथम एका बाऊलमध्ये नारळाचे पाणी घेऊन त्यात सर्व मध मिसळा. याची कन्सिस्टन्सी थोडी घट्ट असावी. आता हे मिश्रण तुमच्या स्काल्पवर आणि केसांर लावा. नंतर एक टॉवेल घेऊन तो गरम पाण्यात बुडवून पिळून घ्या, हा टॉवेल तुमच्या केसांवर बांधून ठेवा. ज्यामुळे केसांना लावलेले मिश्रण स्काल्पच्या आतपर्यंत व्यवस्थित मुरेल. सुमारे अर्ध्या तासानंतर टॉवेल काढा व केस स्वच्छ धुवून टाका. ही कृती आठवड्यातून एकदा करावी.
नारळाच्या पाण्याचा अशा वेगवेगळ्या पद्धतीने केसांसाठी नियमितपणे वापर करा आणि तुमच्या केसांमध्ये होणारे बदल अनुभवा.