Women’s Day 2023 : ‘एक दिवस अचानक महिला सुट्टीवर गेल्या तर… काय होईल?; कल्पना तर करून पाहा
आज 'आंतरराष्ट्रीय महिला दिन' आहे. स्त्रियांशी संबंधित समस्यांकडे जगाचे लक्ष वेधणे हा त्याचा उद्देश आहे. सर्व महिला एक दिवसाच्या रजेवर गेल्या तर काय होईल, हे आकडेवारीच्या सहाय्याने समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
नवी दिल्ली : सकाळी उठल्यावर तुमच्या आसपास तुमची आई, बहीण, पत्नी किंवा मुलगी कोणीच नसेल तर ? जरा विचार करून बघा. सगळ्याजणी कुठे बाहेर गेल्या असतील असा विचार करून तुम्ही ऑफीसला जाल, पण तिथेही तुमच्यासोबत काम करणारी एकही महिला (women)कर्मचारी तुम्हाला दिसली नाही तर ? सर्व महिला अचानक सुट्टीवर गेल्या आहेत, अशी बातमी थोड्याच वेळात टीव्हीवर दिसू लागली तर ? तर काय होईल याचा जरा विचार तर करून बघा. ही फक्त एक कल्पना (imagination) आहे. पण कल्पना करा की एखाद्या दिवशी खरोखरच असे घडले की सर्व महिला (Women’s Day) सुट्टीवर गेल्या तर काय होईल?
काही वर्षांपूर्वी अमेरिकेतही अशीच मोहीम झाली होती. अमेरिकेतील सर्व महिलांनी एक दिवसाच्या सुट्टीवर जायचे ठरवले होते. कोणतेही काम करायचे नाही आणि काही खरेदीही करायचे नाही, असे महिलांनी ठरवसे. 8 मार्च 2017 साली म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिनी त्यांनी हे केले. महिलांच्या योगदानाकडे जगानेही लक्ष द्यायला हवे, हा यामागचा उद्देश होता.
आज ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ आहे. आणि समजा याच दिवशी देशातील सर्व महिला रजेवर गेल्या किंवा कुठेतरी गायब झाल्या तर काय होईल? तुमचा विश्वास बसणार नाही, पण तुमच्यासोबत असे काही घडेल, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. महिला नसतील तर काय होईल, हे आकडेवारीच्या मदतीने समजून घेण्याचा प्रयत्न करून पाहूया.
महिला नसतील तर काम कसे होईल ?
मुलांना कोण शिकवेल ?
देशभरातील सरकारी आणि खासगी शाळांमध्ये 51% आणि कॉलेज-युनिव्हर्सिटीमध्ये 43% महिला शिक्षक आहेत.
उपचारांसाठी बघावी लागेल वाट
मिळालेल्या माहितीनुसार भारतामध्ये 30% महिला डॉक्टर आहेत तर सुमारे 80% नर्स आहेत.
बँकेच्या रांगेत तुम्ही उभे रहाल ?
SBIमध्ये 26%, PNBमध्ये 23%, ICICIमध्ये 32% तर HDFC बँकेत 21% महिला कर्मचारी आहेत.
न्याय मिळण्यासाठी वाट बघाल ?
सुप्रीम कोर्टात 12% आणि हायकोर्टात अंदाजे 14% महिला न्यायाधीश आहेत. तसेच 15 % महिला वकील आहेत.
बातम्या कुठून मिळतील ?
प्रिंट मीडियामध्ये 13% महिला रिपोर्टर. रेडिओमध्ये 21% प्रेझेंटर आणि टीव्हीमध्ये 57% रिपोर्टर या महिला आहेत.
ना जेवण, ना साफसफाई
केवळ 6% पुरुषांना जेवण बनवता येतं. 8% टक्के पुरुष हे घराची स्वच्छका आणि 3% टक्के पुरूष कपडे धुण्याचे काम करू शकतात.
देशात कशी आहे महिलांची स्थिती ?
लोकसंख्या : सांख्यिकी मंत्रालयाच्या अहवालानुसार, 2021 पर्यंत, देशाची लोकसंख्या सुमारे 136 कोटी असेल असा अंदाज आहे. यापैकी 48.6% महिला आहेत. आता देशात महिलांच्या वाढीचा दर पुरुषांपेक्षा जास्त आहे. 2021 मध्ये महिला लोकसंख्येचा वाढीचा दर 1.10%, तर पुरुषांचा 1.07% इतका होता.
शिक्षण : एका अहवालानुसार, 1951 मध्ये पुरुष साक्षरतेचा दर 27.2% होता, जो 2017 पर्यंत वाढून 84.7% झाला. त्याच वेळी, 1951 मध्ये स्त्रियांचा साक्षरता दर 8.9% होता, जो 2017 पर्यंत वाढून 70.3% झाला आहे. 2011 च्या तुलनेत 2017 मध्ये महिलांच्या साक्षरतेत 8.8% ने वाढ झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
रोजगार : येथे महिलांची फारशी बरी नाही. जागतिक बँकेच्या अहवालानुसार, 2019 मध्ये, भारतातील श्रमशक्तीमध्ये महिलांचा हिस्सा 21% पेक्षा कमी होता. म्हणजेच 79% स्त्रिया अशा होत्या ज्या नोकरीसाठी पात्र होत्या, पण त्या कामाच्या शोधात नव्हत्या. सांख्यिकी मंत्रालयाच्या अहवालात असे म्हटले आहे की देशात 35% स्त्रिया घरांमध्ये मदतनीस म्हणून काम करतात, तर असे काम करणारे पुरुष 9% पेक्षा कमी आहेत.
राजकारण : लोकसभेत 15% पेक्षा कमी आणि राज्यसभेत 14% पेक्षा कमी महिला खासदार आहेत. सांख्यिकी मंत्रालयाच्या अहवालानुसार, सध्या देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांमध्ये केवळ 9% आमदार महिला आहेत. मिझोराममध्ये 26% महिला आमदार आहेत. तर, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमध्ये 14 -14% महिला आमदार आहेत.
न्यायालय : सर्वोच्च न्यायालयात 33 न्यायाधीशांपैकी केवळ 4 महिला आहेत. देशभरातील उच्च न्यायालयांमध्ये महिला न्यायाधीशांचे प्रमाण खूपच कमी आहे. फक्त तेलंगणा आणि सिक्कीम उच्च न्यायालये अशी आहेत, जिथे 30% पेक्षा जास्त महिला न्यायाधीश आहेत. मणिपूर, मेघालय, पाटणा, त्रिपुरा आणि उत्तराखंड उच्च न्यायालयांमध्ये एकही महिला न्यायाधीश नाही. देशभरातील न्यायालयांमध्ये महिला वकिलांची संख्या केवळ 15% आहे.
लष्कर : संरक्षण मंत्रालयाच्या मते, लष्करात JCO आणि OR मध्ये महिलांची संख्या केवळ 0.1 टक्के आहे. मात्र, लष्कराच्या मेडिकल कॉर्प्स आणि डेंटल कॉर्प्समध्ये 21 टक्के महिला आहेत. त्याच वेळी, हवाई दलात 6 टक्क्यांहून अधिक आणि नौदलात 13 टक्के महिला आहेत.
तरीही महिला इतरांपेक्षा कमी नाहीत
– काही दिवसांपूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाचा एक अहवाल आला होता. या अहवालात असा अंदाज वर्तवण्यात आला होता की, देशातील महिला दररोज 7.2 तास असे काम करतात, ज्यासाठी त्यांना कोणताही पगार मिळत नाही.
– महिला दररोज जेवढे काम मोफत करतात, त्याचा मोबदला दिल्यास वर्षभरात 22.7 लाख कोटी रुपये खर्च होतील, असा अंदाज या अहवालात म व्यक्त करण्यात आला होता. ही रक्कम भारताच्या जीडीपीच्या 7.5 टक्के इतकी आहे.
– त्याव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) च्या 2022 च्या अहवालात असे म्हटले आहे की जगातील 64 देशांमध्ये महिला दररोज 1,640 तास पगाराशिवाय काम करतात. त्या जे काम करतात ते 11 ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच जगाच्या जीडीपीच्या 9 टक्के इतके आहे.
– यापूर्वी 2010 मध्ये जागतिक बँकेने ब्राझीलमध्ये एक अभ्यास केला होता. या अभ्यासात असे समोर आले आहे की जर महिला पुरुषांपेक्षा जास्त कमावत असतील, तर त्या ते पैसे अशा ठिकाणी खर्त करण्यास प्राधान्य देतात, ज्यामुळे (खरेदीमुळे) आयुष्यात खरंच काही फरक पडतो. म्हणजेच महिला या उपयुक्त वस्तूंची खरेदी करण्यास प्राधान्य देतात. ही कमाई मुलांच्या शिक्षण आणि आरोग्यावर खर्च करण्यास महिला प्राधान्य देतील, असे अभ्यासात सांगण्यात आले.