आता हॉटेलसारखा गाजराचा हलवा बनवा घरच्या घरी, सर्वजण करतील तुमचे कौतुक
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच गाजराचा हलवा आवडतो. हिवाळ्यात लग्न समारंभात आणि खास प्रसंगी गाजराचा हलवा नक्कीच असतो. चला जाणून घेऊया गाजराचा हलवा बनवण्याचा सोपा मार्ग
Gajar Halwa Recipe : थंडीचा हंगाम सुरू होताच बाजारात हंगामी भाज्या येऊ लागलेत. या ऋतूत आपल्या प्रत्येकाच्या घरात हंगामी फळं-भाज्यांचा आहारात समावेश केला जातो. कारण या हंगामी भाज्यांच्या सेवनाने आपल्या शरीराला पोषक घटक मिळत असतात. त्यामुळे गाजर, वाटाणा, मुळा, मेथी अशा हंगामी भाज्या अनेकांना खायला आवडतात. तर दुसरीकडे या सीझनमध्ये कदाचित कोणीतरी असा असेल ज्याला गाजराचा हलवा खायला आवडत नाही. या थंडीच्या दिवसात गाजराला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते. तर काही लग्नसमारंभात किंवा कोणत्याही खास प्रसंगी तुम्ही कुठे गेलात तर तुम्हाला गाजराचा हलवा नक्कीच मिळतो. गाजराचा हलवा स्वादिष्ट तर आहेच, पण त्यातील पोषक तत्त्वे आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत.
गाजरामध्ये व्हिटॅमिन ए, सी, लोह आणि तत्सम पोषक घटक असतात. जे डोळे, त्वचा आणि प्रतिकारशक्तीसाठी फायदेशीर मानले जातात. तुम्ही जर तूप आणि दुधाने हा हलवा बनवला तर अधिकच चवदार आणि पौष्टिक होतो. हिवाळ्याच्या हंगामात गरमागरम गाजराचा हलवा खाण्याची एक वेगळीच मजा असते.
गाजराचा हलवा घरी बनवण्यासाठी बरेच लोक खूप प्रयत्न करतात पण त्याची चव हॉटेलमध्ये मिळणाऱ्या हलव्यासारखी नसते. पण तुम्ही घरच्या घरी अशा प्रकारे स्वादिष्ट हलवा बनवू शकता. हा हलवा बनवण्यासाठी तुम्हाला किसलेले ताजे गाजर, दूध, साखर, तूप, वेलची पूड, ड्रायफ्रुट्स, बारीक चिरलेले बदाम आणि पिस्ता हे साहित्य लागणार आहे.
गाजर हलवा रेसिपी
- गाजराचा हलवा बनवण्यासाठी सर्वप्रथम कढईत किंवा नॉनस्टिक पॅनमध्ये तूप घालून मंद आचेवर ठेवून गरम करत ठेवा.
- त्यानंतर त्यात किसलेले गाजर घालून ४ ते ५ मिनिटे परतून घ्यावे.
- किसलेला गाजर छान परतून झाल्यावर त्यात दूध घालून चांगले मिक्स करावे.
- आता मंद आचेवर शिजवण्यासाठी ठेवा. हे मिश्रण उकळू लागल्यावर गॅस कमी करावा.
- मंद आचेवर सुमारे १५ ते २० मिनिटे शिजू द्या. पण हे लक्षात ठेवा की हे मिश्रण पॅनला चिकटू नये म्हणून काही वेळावेळाने चमच्याने ढवळत राहा.
- काही वेळ सर्व मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजू द्या. मिश्रणातील दूध संपूर्ण आटल्यावर त्यात साखर घाला.
- साखर घातल्यानंतर हलवा आणखी १०-१५ मिनिटे शिजू द्या. म्हणजे साखर व्यवस्थित विरघळून हलवा जाड होईल.
- काही वेळाने गाजर हलव्यात साखर चांगल्या पद्धतीने मिक्स झाल्यावर त्यात मावा घालून मिक्स करून ५ मिनिटे शिजवावे.
- आता त्यात वेलची पूड आणि बारीक केलेले ड्रायफ्रूट्स घाला. ते चांगले मिक्स करा. हलवा घट्ट होऊन तूप सोडायला लागल्यावर गॅस बंद करा.
- आता गरमागरम गाजर हलवा, तुमच्या कुटुंबियांना सर्व्ह करा.