Viral News : जगातील सर्वात मोठी चपाती बनते चक्क भारतातील या शहरात, 200 कुटुंबाला एकच चपाती पुरून नक्कीच उरेल
World Largest Chapati : चपाती हा असा एकमेव पदार्थ आहे जो सगळीकडे एकसारखाच बनवला जातो. चपातीचा आकार हा सर्वत्र सारखाच आहे. पण भारतात एक असं ठिकाण आहे जिथे जगातील सर्वात मोठी चपाती बनवली जाते.

मुंबई : भारत देश हा विविध खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. भारतातील पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी बाहेरील देशातील अनेक खाद्यप्रेमी आवर्जून येत असतात. तसंच प्रत्येक पदार्थाची चव आणि बनवण्याची पद्धत ही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते. पण चपाती हा असा एकमेव पदार्थ आहे जो सगळीकडे एकसारखाच बनवला जातो. चपातीचा आकार हा सर्वत्र सारखाच आहे. पण भारतात एक असं ठिकाण आहे जिथे जगातील सर्वात मोठी चपाती बनवली जाते. ही रोटी एवढी मोठी आहे की तिला एक संपूर्ण गाव खाऊ शकतं. या अनोख्या चपातीबाबत जाणून घ्या.
जगातील ही सर्वात मोठी चपाती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गृहराज्य गुजरातमधील जामनगरमध्ये बनवली जाते. ही चपाती दररोज केली जात नाही तर काही खास प्रसंगीच बनवली जाते. दगडूशेठ गणपती सार्वजनिक उत्सव आणि जलाराम बापा यांच्या जयंतीनिमित्त ही रोटी जलाराम मंदिराच्या जीर्णोद्धार समितीतर्फे बनवली जाते. त्यानंतर मंदिरात येणारे भाविक या चपातीने आपलं पोट भरतात. जामनगरला ही चपाती खाण्यासाठी या खास दिवशी लोक दूरदूरवरून येत असतात.
महत्त्वाचं सांगायचं झालं तर ही चपाती बनवण्यासाठी एक दोन नव्हे तर अनेक महिला एकत्र मिळून ही मोठी चपाती बनवतात. ही चपाती तासाभराच्या मेहनतीनंतर तयार होते. ही चपाती गव्हाच्या पिठापासून बनवली जाते. त्याचबरोबर ही चपाती भाजण्यासाठी मंदिराजवळ एक मोठा तवा आहे. या तव्यावर ही चपाती भाजली जाते. ही चपाती भाजण्यासाठी अनेक लोकांना काम दिलं जातं.