रणरणत्या उन्हात त्वचा निरोगी ठेवण्यासाठी वापरा सनस्क्रीन, त्वचेचा कॅन्सर, टॅनिंगपासूनही संरक्षण मिळेल
Sunscreen Benefits for Skin : उन्हाळ्यात बाहेर फिपताना प्रखर किरणांमुळे त्वचा खराब होते. सूर्याच्या हानिकारक किरणांच्या सतत संपर्कात राहिल्याने त्वचेच्या कर्करोगाचा धोकाही वाढू शकतो. अशा परिस्थितीत दररोज सनस्क्रीन वापरणे आवश्यक आहे.
नवी दिल्ली : उन्हाळ्यातील तापमानात (heat is increasing) सातत्याने वाढ होत आहे. लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. रणरणत्या उन्हात बाहेर फिरण्याने उष्माघात, डिहायड्रेशन (dehydration, heatstroke) तर होतोच, पण त्याचबरोबर त्वचेचे सर्वाधिक नुकसान होते. सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे त्वचा जळते. जर तुम्ही त्वचेचे संरक्षण (skin care) न करता उन्हात फिरत असाल तर त्वचा टॅन होणे, सनबर्न अशा समस्या उद्भवू शकतात.
अनेकदा काही लोक त्वचेवर सनस्क्रीन लोशन लावणे टाळतात. काही लोकांना त्याचे फायदे किंवा कोणत्या प्रकारचे सनस्क्रीन विकत घ्यावे हे माहित नसते. तर मग उन्हाळ्यात सनस्क्रीन लावण्याचे कोणते फायदे आहेत, हे जाणून घेऊया.
त्वचेला सनस्क्रीन लावण्याचे फायदे
सनस्क्रीन वृद्धत्वाची चिन्हे रोखते
उन्हाळ्यात त्वचेच्या संरक्षण न करता घराबाहेर पडल्यास सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेचे कोलेजन, त्वचेच्या पेशी, त्वचेची लवचिकता यांचे मोठे नुकसान होते. तसेच, तुमची त्वचा लहान वयातच सुरकुतलेली व वृद्ध दिसू लागेल. तुम्हाला त्वचेचा रंग फिकट होणे, बारीक रेषा, सुरकुत्या, निस्तेज, कोरडी, निर्जीव त्वचा यांचा त्रास होऊ शकतो. सनस्क्रीनच्या संरक्षणाशिवाय तुम्ही लहान वयातच म्हातारे दिसू लागाल. जर तुमचे वय 20 ते 30 च्या दरम्यान असेल, तर तुम्ही सनस्क्रीन वापरणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही लवकर वृद्धत्वाची लक्षणे टाळू शकता.
स्किन इन्फ्लेमेशन होते कमी
जेव्हा तुमची त्वचा सूर्यप्रकाशाच्या थेट संपर्कात येते, तेव्हा एक्जिमा असल्यास ही समस्या आणखी वाढू शकते. अतिनील किरणोत्सर्गामुळे, त्वचेचा एपिडर्मिस लाल होऊ शकतो तसेच सूज येऊ शकते. सनब्लॉकचा नियमित वापर केल्यास या हानिकारक किरणांमुळे जळजळ होण्याची शक्यता कमी होते. जर तुमची त्वचा खूप संवेदनशील असेल आणि त्वचा लाल झाली असेल, तर ज्यामध्ये झिंक ऑक्साईड किंवा टायटॅनियम डायऑक्साइड सारखी हानी न पोहोचवणारी रसायने असतील असे सनस्क्रीन वापरावे.
टॅनिंगपासून होते संरक्षण
उन्हाळ्यात दररोज सनस्क्रीन लोशन लावून घराबाहेर पडल्यास टॅनिंगचा त्रास होणार नाही. अशाच प्रकारचे सनस्क्रीन लोशन खरेदी करा ज्यामध्ये अँटी-टॅनिंग गुणधर्म आहेत. यासाठी, तुम्ही किमान सन प्रोटेक्शन फॅक्टर 30 असलेले सनस्क्रीन लोशन खरेदी करू शकता. अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे त्वचेच्या टॅनिंगची समस्या दूर करते. दर दोन तासांनी सनस्क्रीन जरूर वापरा. विशेषतः, ज्यांची त्वचा संवेदनशील आहे, त्यांनी ते वापरणे आवश्यक आहे. तुम्ही व्यायाम केल्यानंतरही ते लावू शकता, कारण घामामुळे ते लोशन निघून जाते.
त्वचेच्या कॅन्सरपासून होतो बचाव
दररोज उन्हात जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावल्याने तुम्ही अल्ट्रा व्हायोलेट किरणांचे हानिकारक प्रभाव टाळू शकता. यामुळे त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यताही कमी होऊ शकते.हिवाळा असो, उन्हाळा किंवा पाऊस असो, कोणताही ऋतू असला सनस्क्रीन लोशन लावायला विसरू नका. 30 SPF सह सनस्क्रीन दिवसातून अनेक वेळा वापरल्यास, तुम्ही त्वचेच्या कर्करोगाचा धोका कमी करू शकता. जास्त वेळ बाहेर राहिल्यास दर दोन तासांनी ही क्रीम लावा.
निरोगी त्वचा
सनस्क्रीन लावल्याने कोलेजन, केराटिन आणि इलास्टिन सारखी त्वचेची प्रथिने संरक्षित केली जातात. त्वचा मऊ, गुळगुळीत आणि निरोगी ठेवण्यासाठी ही प्रथिने आवश्यक असतात. तुम्ही कोणतेही सनब्लॉक वापरले तरी त्यात टायटॅनियम डायऑक्साइड असणे आवश्यक आहे, जेणेकरून ते त्वचेला अतिनील किरणांपासून संरक्षण देऊ शकेल.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)