Health Tips : एक महिना करा तळलेले पदार्थ वर्ज्य, शरीरात दिसतील हे आश्चर्यकारक फरक
तुम्ही महिनाभर तळलेले पदार्थ खाल्ले नाहीतर तर तुमच्या शरीरात काय बदल होतात, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ? महिनाभर तळलेले अन्न खाणे वर्ज्य केल्याने काय फरक पडतो ते जाणून घेऊया.

नवी दिल्ली : वेट लॉसच्या प्रयत्नात असणारे किंवा ज्यांना वजन कमी (weight loss) करायचे आहे असे लोक सर्वप्रथम गोड आणि तळलेले पदार्थ खाणं (fried food) कमी करण्याचा अथवा सोडण्याचा निर्णय घेतात. पण हे करणं खूपच कठीण आहे. कारण आपल्या आहारात कोणत्या ना कोणत्या गोड अथवा तळलेल्या पदार्थांचा समावेश असतोच. आपल्यापैकी बहुतांश लोकांना तळलेले किंवा मसालेदार पदार्थ (spicy food) खाण्याची सवय असते. पण त्यामुळे गॅस, ॲसिडिटी किंवा फॅटी लिव्हर (fatty liver) सारख्या समस्या उद्बवण्याची शक्यता असते. पण असे पदार्थ महिनाभर खाल्ले नाहीत तर शरीरात काय बदल होतात, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ? महिनाभर तळलेले अन्न खाणे वर्ज्य केल्याने काय फरक पडतो ते जाणून घेऊया.
चांगली झोप येते
तुम्हाला माहिती आहे का की तळलेले पदार्थ कमी खाल्ले किंवा ते खाणं बंद केले तर पोटाचे आरोग्य सुधारू लागते. यामुळे अनेक समस्या दूर राहतात आणि शरीर निरोगी राहण्यास मदत होते. तळलेले पदार्थ खाणे थांबवण्याचा एक महत्वपूर्ण फायदा म्हणजे त्या व्यक्तीला चांगली झोप लागू शकते. चांगली व शांत झोप झाल्यास दुसऱ्या दिवशी मूडही फ्रेश राहतो.




पचनक्रिया सुरळीत होते
संशोधनात असेही म्हटले आहे की जे लोक तळलेले अन्न खातात त्यांचे फक्त पचनच बिघडते असे नाही तर गॅसेस आणि ॲसिडिटीचाही सामना करावा लागतो. मात्र असे पदार्थ खाणे बंद केले तर तुमची पचनक्रिया सुधारते आणि ॲसिडिटीचा त्रासही दूर राहतो. त्यामुळे महिन्यातून काही दिवस तरी तळलेल्या पदार्थांपासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा.
इम्युनिटी वाढते
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, तळलेले अन्न खाणे वर्ज्य करून प्रतिकारशक्ती वाढवता येते. यासोबतच शरीरातील सूजही कमी होऊ लागते. जर एखाद्याला फॅटी लिव्हरची समस्या असेल तर त्याने चुकूनही तळलेले पदार्थ खाऊ नयेत, असा सल्ला डॉक्टर देतात. अन्यथा त्रास वाढू शकतो.
त्वचा होते चमकदार
अन्नपदार्थ तळण्यासाठी वापरण्यात येणारे तेल केवळ पोटालाच नाही तर त्वचेलाही हानी पोहोचवते. त्वचेवर अतिरिक्त तेल तयार होते आणि ते निस्तेज दिसू लागते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तेलकट पदार्थ बंद केले की तेलाचे सेवनही कमी होते, त्यामुळे काही दिवसांनी तुमच्या त्वचेवरही चमक दिसू लागते.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)