नवरा-बायकोत भांडण का होतं? तुम्हाला तरी ही 6 कारणं माहीत आहेत काय?
वैवाहिक जीवनात संवादाचा अभाव, पैशांबाबत वाद, मुलांची काळजी आणि वाढता दुरावा हे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी, जोडप्यांनी एकमेकांशी खुलेपणाने बोलणे, वित्त व्यवस्थापन करण्यात एकत्र काम करणे, मुलांच्या जबाबदाऱ्या वाटून घेणे आणि रोमांच राखण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
लग्न ही जीवनातील मोठी गोष्ट आहे. हे नातं जन्मोजन्मीचं असतं. हे नातं निभावताना कधी गोड तर कधी कडू अनुभव येत असतात. पण संसार म्हटलं तर असं चालायचंच. कधी पैशाचा वाद, कधी घरच्यांच्या वागणुकीमुळे होणारे वाद तर कधी शुल्लक वादही या संसारात अनुभवयाला मिळतात. अनेकवेळा काही जोडपे त्याकडे दुर्लक्ष करतात. तर काहींची कडाक्याची भांडणं होतात. पण या समस्यांचे वेळेवर समाधान करून आपण आपल्या नात्याला आनंदी आणि मजबूत बनवू शकतो.
वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्या जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. या समस्यांमधून बाहेर येऊन एकमेकांमध्ये प्रेम कसं टिकवून ठेवता येईल हे जाणून घेणंही आवश्यक आहे. जोडप्यांमध्ये तणावाला कारणीभूत असलेली काही कारणं रिलेशनशिप कौन्सिलर सांगतात. ही कारणं कोणती आहेत. हेच आज आपण जाणून घेऊ.
संवादाचा अभाव
नवरा-बायकोच्या नात्यात संवाद असायलाच हवा. संवाद असेल तरच नातं व्यवस्थित राहतं. पण अनेकदा नात्यात संवादाचा अभाव निर्माण होतो. त्यामुळे गैरसमज वाढतात आणि त्याचं रुपांतर भांडणात होऊ शकतं. कधी कधी तर, हे नातं तुटण्याचं कारण बनतं. म्हणून, दोन्ही पार्टनर्सनी एकमेकांशी संवाद कायम ठेवला पाहिजे. चांगला संवाद साधण्यासाठी, दोघांनाही एकमेकांना ऐकून घेऊन समजून घेतलं पाहिजे. एकमेकांना टोमणे न मारता, संपूर्ण म्हणणं ऐकून घ्या आणि मगच त्यावर बोला. आपल्याला ऐकलं जातं ही भावना जोडीदाराच्या मनात निर्माण झाली पाहिजे. संवादासाठी वेळ काढा. रात्री झोपताना, संध्याकाळी किंवा चहा पिताना संवाद साधाच.
हिशोबावरून भांडण
जोडीदारावर प्रेम असल्याचं आपण कितीही म्हणत असलो तरी एकत्र राहत असताना पैशांबद्दल बोलणं होतंच. पैसा कुठे खर्च होतो, कुठे खर्च केला अशी विचारणा केलीच जाते. हिशोब विचारल्यामुळे नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. पैशावरून सतत होणारे वाद आणि एकमेकांवरील अविश्वास यामुळे एकमेकांबद्दल अनादर निर्माण होतो. पैशांबद्दल बोलणं महत्वाचं आहे, पण ते तणावाचं कारण होता कामा नये. दोघांनी मिळून घराचं बजेट तयार करायला हवं, आणि एकत्र बचत करायला हवी.
मुलांची काळजी
मुलांची देखभाल करण्यावरूनही अनेकदा वाद होऊ शकतात. एकाला अधिक कामाची जाणीव होणं तणावाचा कारण बनू शकतं. म्हणूनच, दोघांनी मिळून मुलांची जबाबदारी पार पाडली पाहिजे. मुलांची काळजी घेण्यासाठी शेड्यूल तयार करा आणि जबाबदाऱ्या वाटून घ्या. कुटुंबातील सदस्यांची किंवा बेबीसिटरची मदत घ्या. एकमेकांसोबत क्वालिटी टाइम घालवण्यासाठी वेळ काढा.
नात्यात दुरावा
लग्नाची काही वर्ष एकमेकांचा सहवास चांगला वाटतो. पण नंतर नात्यात हळूहळू दुरावा निर्माण होतो. त्यामुळे जोडप्यांमध्ये अंतर निर्माण होऊ शकते. परिणामी विवाहबाह्य संबंधही निर्माण होतात. म्हणून, जोडप्यांनी वैवाहिक जीवनात रोमांच कायम ठेवायला हवा. वीकेंडवर डेट नाइट प्लान करा, आणि प्रत्येक 3-6 महिन्यांनी व्हॅकेशनचा बेत आखा. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा आणि एकमेकांना सरप्राईझ द्या.
तणाव आणि परिणाम
आयुष्यात ताणतणाव असतातच. तो आता आयुष्याचा एक भाग बनला आहे. काम, पैसा, आरोग्य किंवा कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमुळे नात्यावर तणावाचा परिणाम होऊ शकतो. म्हणून, जोडप्यांनी तणाव दूर करण्यासाठी एकत्र प्रयत्न करायला हवे. एकमेकांना सहकार्य करायला हवे आणि प्रत्येक समस्येचे समाधान शोधलं पाहिजे. ध्यान, योग, चालणे किंवा जॉगिंग करायला हवी. एकमेकांना आधार द्या आणि नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.
जास्त अपेक्षा नकोच
कधीही एकमेकांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. त्यामुळे नात्यात तणाव निर्माण करू शकतो. तुम्ही माझ्यासाठी हे केलं नाही, तुमची सर्व आश्वासने खोटी होती, तुम्ही असं करायला हवं होतं, तसं करायला हवं होतं, अशा गोष्टी जोडप्यांमध्ये होऊ शकतात. त्याच गोष्टी नंतर भांडणाचं कारणही ठरतात. त्यामुळे एकमेकांकडून अवाजवी अपेक्षा करू नका.