108 किलो घटल्यानंतरही पुन्हा पहिले पाढे पंच्चावन्न!! अनंत अंबानी यांच्या वाढत्या वजनाचं कारण काय? नीता अंबानी म्हणाल्या…
2016 मध्ये अनंत अंबानींच्या वेट लॉस ट्रान्सफॉर्मेशनवरून इंटरनेटवर चर्चेची लाट आली होती. त्यांनी 18 महिन्यात नैसर्गिक पद्धतीने 108 किलो वजन घटवल्याचं म्हटलं गेलं.
मुंबईः रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा सर्वात लहान मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) मध्यंतरी त्याच्या अभूतपूर्व वेटलॉसमुळे (Weight loss) चर्चेत आला होता. सोशल मीडियावरून त्याचे फोटो तुफ्फान व्हायरल झाले होते. अनंत अंबानीचा नुकताच साखरपुडा झाला. त्यात त्याचं वजन पुन्हा एकदा वाढलेलं दिसून आलं. एवढ्या मेहनतीने घटवलेलं पुन्हा का वाढतंय, यावरून सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. एकिकडे अनंत अंबानीची भावी पत्नी राधिका मर्चंट हिच्या सौंदर्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत तर दुसरीकडे अनंत अंबानीच्या वजनावर चिंता व्यक्त केली जातेय.
2016 मध्ये 108 किलो वजन घटवल्यानंतर अनंत अंबानी हे वेटलॉस करणाऱ्यांसाठी एक आदर्श ठरले होते. पण सध्या त्यांचं वजन पुन्हा वाढतंय. यामागचं नेमकं कारण काय आहे, हे जाणून घेण्यासाठी लोक गूगल सर्चदेखील करतायत. अनंत अंबानीच्या या वेटलॉस प्रवासाबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
TOI ला नीता अंबानी यांनी 2017 मध्ये एक मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांनी अनंत अंबानींच्या स्थूलपणावर मोकळेपणाने प्रतिक्रिया दिली होती. अनंत अंबानी यांना अस्थमा असल्यामुळेल त्यांना स्टेरॉयड घ्यावे लागतात. त्यामुळे त्यांना स्थूलपणाचा आजार जडल्याचं त्यांनी म्हटलं होतं. वेटलॉसपूर्वी अनंत अंबानींचं वजन 208 किलो होतं.. अस्थमाचा अटॅक आलेल्या रुग्णांना डॉक्टर स्टेरॉयड देतात. त्यामुळे श्वास नलिकेत आलेली सूज कमी होण्यास मदत होते. यामुळे दम लागण्याची समस्या कमी होते.
स्टेरॉयडमुळे वजन वाढते?
अस्थमा अँड लंग्स ऑर्गनायझेशन यूकेच्या मते, एखाद्या रुग्णाला अस्थमा असेल तर व्यायाम करणं किंवा सक्रिय राहणं कठीण जातं. तसेच खूप काळ स्टेरॉयड घ्यावे लागतात. त्यामुळे सामान्यांपेक्षा जास्त भूक लागत राहते. त्यामुळे वजन वाढण्याचा धोका असता. स्टेरॉयडयुक्त औषधांमुळे शरीरात पाणी साठते, त्यामुळे शरीर सूजण्याचा धोका असतो. त्यामुळे वजन वाढण्याची भीती असते.
2016 मध्ये अनंत अंबानींच्या वेट लॉस ट्रान्सफॉर्मेशनवरून इंटरनेटवर चर्चेची लाट आली होती. त्यांनी 18 महिन्यात नैसर्गिक पद्धतीने 108 किलो वजन घटवल्याचं म्हटलं गेलं. यासाठी ते दररोज 5-6 तास व्यायाम करत होते. यात 21 किमी चालणं, योग, वेट ट्रेनिंग, फंक्शनल ट्रेनिंग, कार्डियो यांचा समावेश होता.
डाएट काय घेतलं होतं?
अनंत अंबानी यांनी झीरो शुगर, हाय प्रोटीन आणि कमी फॅटवाले लो कार्ब डाएट फॉलो केलं होतं. ते दररोज फक्त 1200-1400कॅलरी सेवन करत होते. यासह ताज्या हिरव्या भाज्या, डाळी, मोड आलेलं धान्य, तसेच दूध, पनीर आदी आहार सेवन करत होते. तर जंक फूड पूर्णपणे बंद केलं होतं.