लग्नाचा नवा ट्रेंड…लग्नाळूसाठी इव्हेंटचा बाजार, मेकअपपासून ते मेहंदीपर्यंत बदलत्या लग्नाची कहाणी
New Wedding Trend : पूर्वी वधू-वराच्या हातावरील मेहंदी खुलली तर त्यांचे एकमेकांवर प्रेम आहे, असे म्हणायचे. आता तर लग्न एक इव्हेंट झाला आहे. इतकेच नाही तर या काळात एक लव्ह स्टोरी खुलत असल्याचे दिसते. प्री-वेडिंग फोटो शूटपासून ते लग्नापर्यंत अनेक कार्यक्रमाची रेलचेल आहे. अशी बदलत गेली लग्नाची प्रेम कहाणी...
सुंदरतेच्या व्याख्यात भारतात वधू ही प्रत्येकवेळी पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आपण काही चांगले दिसले की लागलीच म्हणतो नवरीसारखी नटली आहे. नववधूलाच चंद्राची उपमा देण्यात आली आहे. त्यामुळे अशा वधूला नटवण्यासाठी लग्नात मोठा तामझाम असतो. तिचे सौंदर्य खुलवण्यासाठी प्री-वेडिंग फोटोशूट अगोदरपासूनच तयारी सुरू होते. पूर्वी केवळ पार्लरला जाऊन आले की झाले असे होत होते. पण आता मेकअप ही हायक्लास झाला आहे. मेकअप आर्टिस्ट आता स्वत: नवरीला सजवत आहेत. आता लग्नाचा ट्रेंड बदलत आहे. त्याप्रमाणे मेकअप सुद्धा बदलत आहे. बॉलिवूड, हॉलिवूड पद्धतीने मेकअपचा नवीन ट्रेंड येत आहे. या लग्न कथेत मेकअपच नाही तर लग्नाची प्रेम कहाणी अशी बदलत गेली.
सेलिब्रिटीवाला मेकअप
मेकअप आर्टिस्ट शिखा चंद्रा 11 वर्षांपासून मेकअप क्षेत्रात काम करतात. आपल्या लूकविषयी आताचा तरुणी अधिक जागरूक असल्याचा दावा त्यांनी केला. आता मेकअप स्टाईलमध्ये मोठा बदल झाल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी वधू या पार्लरमध्ये जाऊन तयार व्हायच्या. आता मेकअप आर्टिस्टचे स्टुडिओ असायचे. आता ट्रेंड बदलला आहे. आता मेकअप आर्टिस्ट वधूच्या घरी आणि विवाहस्थळी जातात. आता हॉटेलमध्ये वा डेस्टिनेशन वेडिंगच्या ठिकाणी मेकअप आर्टिस्ट असल्याने वधूला हायसे वाटते. तिचा लूक खराब होत नाही. उलट तिच्या सौंदर्याला चारचांद लागतात.
वधूचा नॅचरल लूकचा आग्रह
पूर्वी चेहऱ्यावर थोपलेला मेकअप, भडक मेकअप अशा विवाह सोहळ्यात चालून जायचा. वधू मेकअपमुळे उठून दिसायची. पण आता ट्रेंड बदलला आहे. भडक मेकअपाला विवाह सोहळ्यात बिलकूल स्थान नाही. नॅचरल लूकवर आता तरुणी भर देत आहेत. सिम्पल इज द बेस्ट, साध्या मेकअपमध्ये ती उठून दिसण्याला महत्त्व देत आहे. त्यासाठी लग्न ठरल्यापासून अनेक तरुणी चेहऱ्यासाठीच्या खास ट्रिटमेंटवर भर देत आहेत. चेहरा ग्लो करण्यासाठी कोरियन, जपानीज आणि इतर अनेक ट्रीटमेंट बाजारात आल्या आहेत. त्याचा वापर करण्यात येत आहे. मेकअप आर्टिस्ट पण आता स्कीन केअरची बरीच माहिती बाळगून असतात. त्यानुसार ते मेकअप करतात. त्यामुळे नवरी ही सर्वात खुलून दिसते. तिचे सौंदर्य अजून खुलते.
नो-मेकअप लूक असणारा मेकअप
आजकालच्या तरुणींचा नो-मेकअप लूक वर भर आहे. त्यामध्ये सर्व मेकअपच्या स्टेप्स फॉलो केल्या जातात. पण त्यासाठी मेकअप कमी लागतो. अर्थात त्यावरून आई आणि मुलीत वाद पण होतो. मुलगी अधिक तरूण आणि सर्वात उठून दिसावी असा आईचा आग्रह असतो. तर आता मुली नॅचरल ग्लोवर भर देत आहेत. त्या पद्धतीचा उपचार घेतल्यानंतर त्या पद्धतीचा साजेसा साधा मेकअप करण्यावर मुलींचा भर आहे. सध्या कोरियन ग्लो स्किन, ग्लास स्किनची क्रेझ वाढत आहे.
जिममध्ये, योगा क्लासेसला जाणाऱ्या तरुणींची संख्या दिवसागणिक वाढत आहे. तर विविध घरगुती फेसियलचा वापर करुन सौंदर्य शास्त्राच्या व्याख्येवर खरं उतरण्याची कसरत तरुणी करताना दिसत आहेत. त्यासाठी विविध व्हिडिओ, रिल्स चाळल्या जात आहेत. डार्क लिपस्टिक, थोपलेला मेकअप ही आजकालच्या तरुणींची पहिली चॉईस नाही तर ब्युटी विथ ब्रेन, ब्युटी विथ फिटनेस हा नवीन ट्रेंड पण बहरत आहे. त्यात बॉलिवूड, हॉलिवूड स्टाईलच्या मेकअपसाठी जादा पैसे मोजण्यास पण या तरुणी तयार आहेत.
मेकअपसाठी इतके मोजा पैसे
लग्नापूर्वी अनेकदा मुली त्यांच्या लूकसंदर्भात पार्लरमध्ये येऊन मेकअप आर्टिस्टसोबत चर्चा करतात. त्यांची मतं मांडतात. त्यांना कसा मेकअप हवा. कशी हेअरस्टाईल हवी यावर चर्चा करतात. त्या आता पूर्वीपेक्षा अधिक सजग आणि जागरूक असल्याचे दिसून येते. मेकअपसाठीच्या विविध घातक रसायनांचा चेहऱ्यावर परिणाम होऊ नये यासाठी त्या सजग असतात. त्या त्वचेची अधिक काळजी घेतात. मेकअपमध्ये नैसर्गिक घटकांचा वापर अधिक व्हावा यासाठी त्या आग्रही असतात. आता आयुर्वेदिक उपचारांवर पण त्या अधिक पैसा खर्च करतात. साधारणपणे लग्नातील मेकअपसाठी 10 हजार ते 2 लाख या दरम्यान मोजावे लागतात. भारतीय लोक लग्नकार्यात मोठा खर्च करतात. त्यासाठी जमा पुंजी खर्च करतात. मेकअपच नाही तर सोन्याची दागिने, महागडा ड्रेस, साडी, मेहंदी या गोष्टीसाठी मोठा खर्च होतो.
मेहंदीवर मोठा खर्च
मेहंदीवर सुद्धा मोठा खर्च करण्यात येतो. मेहंदीचे पण आता अनेक प्रकार समोर आले आहेत. पूर्वी हातावर, पायावर मेहंदी काढण्यात येत होती. आता तर ‘सजना है मुझे सजना के लिए’ असे म्हणत हनिमून मेहंदीचा ट्रेंड पण आला आहे. यामध्ये पाठीवर सुद्धा कोरीव मेहंदी काढण्यात येते. मेहंदी वधू-वराचे चेहरे हातावर टॅटूसारखे काढण्याचा ट्रेंड पण रूढ होत आहे. पहिली भेट लक्षात राहावी म्हणून मेहंदीच्या हातावर तारीख, ज्या ठिकाणी भेटले त्या स्थळाचे नाव हातावर कोरल्या जाते.
सूरतच्या मेहंदीला मोठी मागणी
आता मेहंदीत ही अनेक प्रकार आले आहेत. बॉम्बे स्टाईल मेहंदीला पूर्वी खूप मागणी होती. पण आजकाल सूरतच्या मेहंदीला सर्वाधिक मागणी आली आहे. कारण त्यात बारीक नक्षी आणि बारकावे टिपण्यात येते. ही मेहंदी काढणे सोपे काम नसते. ही मेहंदी नैसर्गिक असते. ही मेहंदी काढण्यासाठी कमीत कमी 12 ते 15 तास लागतात. तितका संयम आणि तितका वेळ या मेहंदीसाठी द्यावा लागतो.
मधुबनी डिझाईनची क्रेझ
मेहंदीत मारवाडी, बॉम्बे स्टाईल, मधुबनी आर्ट, 4D आणि इतर अशा डिडाईन असतात. यापूर्वी बॉम्बे स्टाईल ही जास्त लोकप्रिय होती. आता वधू मधुबनी आर्टला अधिक महत्त्व देत आहेत. मधुबनी आर्टमध्ये कलश आणि बारीक नक्षीदार कामाला महत्त्व देण्यात येते. मधुबनी झुमके, हत्ती, काही प्राणी यांचे खास डिझाईन असते. तर पूर्वी मुंबई स्टाईल लोकप्रिय होती. त्यात फुल, पानं यांचे डिझाईन असते. काही तरुणी 4D डिझाईनला महत्त्व देतात.
मेहंदी काढण्यासाठी खर्च किती?
आता ट्रेंड बदलला आहे. मेहंदी काढण्याची स्टाईल बदलली आहे. मेहंदी काढणे हे जिकरीचे आणि तितकीचे कौशल्याचे काम आहे. त्यासाठी अधिक वेळ द्यावा लागतो. विविध डिझाईन्स अगोदर दाखवण्यात येतात. वधूच्या महेंदीसाठी 7 हजार रुपयांपासून पुढे रुपये खर्च येतो. ज्या नवरी प्रॉपर थीमची मागणी करतात. त्यासाठी त्यांना लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. तर घर, वरात, आई-वडिल यांचे फोटो अशा थीम बेस मेहंदीसाठी लाखांच्या घरात शुल्क आकारले जाते. तर हनिमून मेहंदीसाठी त्यापेक्षा अधिक शुल्क आकारले जाते. हे शुल्क थीम बेस असते. त्यातही विविध प्रकार असतात. पूर्वी 1100 रुपयांत मेहंदी काढण्यात येत होती. आता मेहंदी काढण्यासाठी कमीत कमी 5 हजार तरी लागतातच. मेहंदीसाठी 25 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते. त्यातही कम्बो ऑफर असते. वधूच्या घरातील काही लोकांना त्यात मेहंदी काढून देण्यात येते. त्यासाठी 5 हजार ते 15 हजार रुपये खर्च येतो.
मेकअप आणि मेहंदीसाठी बुकिंग
तुमचं लग्न ठरलं आणि चांगल्या आर्टिस्टकडून तुम्हाला मेकअप अथवा मेहंदी काढायची असेल तर गेले आणि झाले असे होत नाही. त्यांच्याकडे अगोदरच अनेक ग्राहक रांगेत उभे आहेत. त्यांच्याकडे सलग अनेक महिन्यांचे बुकिंग असते. त्यात तारीख आणि वेळ पण नमूद असते. त्यामुळे तुम्हाला चांगल्या आर्टिस्टकडून हे सर्व करून घ्यायचे असेल तर बुकिंग करावे लागते. त्यासाठी काही शुल्क पण अगोदरच अदा करावे लागते. आता हा सर्व कारभार व्हॉट्सॲपपासून ते इतर अनेक सोशल प्लॅटफॉर्मवर नोंदवल्या जातो. त्याची आठवण तुम्हाला सातत्याने करून देण्यात येते. जशी डॉक्टरची अपॉईटमेंट असते. तशी आगाऊ वेळ सुद्धा घ्यावी लागते. तर एकूणच लग्न अविस्मरणीय होण्यासाठी पैसा खर्च करावा लागतो.