Weekend Trip | विकेंडसाठी लोणावळ्याला जाताय? ‘या’ ठिकाणांना आवर्जून भेट द्या!
ख्रिसमस, विकेंड अशा सलग सुट्ट्या आल्याने आपल्यापैकी बरेच लोक सहलीची योजना आखून, फिरण्यासाठी रवाना झाले आहे.
मुंबई : सध्या सगळीकडे नवीन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे. ख्रिसमस, विकेंड अशा सलग सुट्ट्या आल्याने आपल्यापैकी बरेच लोक सहलीची योजना आखून, फिरण्यासाठी रवाना झाले आहे. काय म्हणता, तुम्ही नाही गेलात? जायचा विचार करताय? आणि मुंबईच्या जवळची ठिकाणं शोधताय, तर ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे. एक किंवा दोन दिवसांच्या सुट्टीची योजना आखत असाल तर, मुंबईच्या जवळचे ‘लोणावळा’ हे ठिकाण उत्तम पर्याय आहे (Planning Weekend Trip in Lonavala then must visit these places).
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर वसले आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध असा हा परिसर नेहमीच प्रेक्षकांना आकर्षित करतो. इथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.
लोणावळ्यात जाऊन काय पाहाल?
भुशी धरण
इसवी सन 1860च्या दशकात इंद्रायणी नदीच्या पाण्याचा वेग अडवण्यासाठी भुशी धरणाची उभारणी करण्यात आली होती. परंतु, आता हे धरण लोणावळा येथील प्रसिद्ध व गर्दीच्या पर्यटनस्थळांपैकी एक आहे. लोणावळ्यापासून 7 किमी अंतरावर असणारे भुशी धरणा सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरु असते. या धरणाला भेट देण्यासाठी कुठलेही प्रवेश शुल्क आकारले जात नाही.
वॅक्स म्युझियम
लोणावळ्यात बरीच वॅक्स संग्रहालये आहेत. या वॅक्स म्युझियममध्ये जगभरातील अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचे उत्तम मेणाचे पुतळे आहेत. या वॅक्स म्युझियमना भेट देण्यासाठी साधारण 150 रुपये प्रत्येकी इतके शुल्क द्यावे लागते. सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत ही वॅक्स म्युझियम पर्यटकांसाठी खुली असतात (Planning Weekend Trip in Lonavala then must visit these places).
पवना तलाव
पवना लेक हे लोणावळ्यापासून साधारण 35 किलोमीटर दूर असलेले एक सुंदर तलाव आहे. आपण जर लोणावळ्यामध्ये एक दिवस मुक्कामाची योजना आखत असाल, तर या पवना लेकला अवश्य भेट द्या. इथे टेंट कॅम्पिंगची सुविधा उपलब्ध आहे. निसर्गरम्य परिसरात, तंबूत राहण्याचा आनंद घेण्यासाठी साधारण 1500 ते 3000 रुपये प्रत्येकी इतकी रक्कम मोजावी लागते.
कामशेत पॅराग्लाइडिंग
जर तुमहाला साहसी खेळांची आणि पॅराग्लाइडिंगची आवड असेल तर, कामशेत पॅराग्लाइडिंगला नक्की भेट द्या. लोणावळ्यापासून साधारण 10 किलोमीटरवर कामशेत पॅराग्लाइडिंग आहे. पॅराग्लाइडिंगचा आनंद घेण्यासाठी सधारण 1500 ते 6000 प्रत्येकी इतकी रक्कम मोजावी लागते.
कार्ला लेणी
कार्ला लेणी ही भारतातील सर्वात प्राचीन बौद्धकालीन लेणी आहे. लोणावळ्यापासून साधारण 11 किलोमीटर अंतरावर या लेण्या आहे. जवळच एकविरा देवीचे प्रसिद्ध मंदिर देखील आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कार्ल्याच्या लेण्या पर्यटकांसाठी खुल्या असतात. इथे जाण्यासाठी प्रत्येक व्यक्ती मागे केवळ 5 रुपये इतके नाममात्र शुल्क आकारले जाते.
(Planning Weekend Trip in Lonavala then must visit these places)
हेही वाचा :
नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी लोणावळ्याला जाताय? पर्यटकांसाठी महत्त्वाच्या सूचना https://t.co/a5ccM8m82a #NewYear #HillStation #Lonavla #Pune
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 25, 2020