Split Ends मुळे खुंटली केसांची वाढ ? ‘ही’ काळजी घेतली तर समस्या होईल दूर, केस दिसतील सुंदर
केसांची काळजी घेण्यासाठी, आपण प्रथम केसांची निगा राखणे, हेअर केअर रूटीन फॉलो करणे आवश्यक आहे जेणेकरून ते खराब होणार नाहीत आणि जाड दिसू शकतील.
नवी दिल्ली : घनदाट आणि लांब केसांसाठी, आपण वेगवेगळे हेअर केअर रुटीन (hair care routine) फॉलो करत असतो. यासाठी बऱ्याच महिला सलूनमध्ये जातात तसेच वेगवेगळी सौंदर्य उत्पादनेही वापरतात. अनेकवेळा महिला केसांचा पोत समजून न घेता, कळत-नकळतपणे काही चुका करतो, ज्यामुळे आपले केस खराब (hair damage) होतात. तसेच आजकाल स्प्लिट एंड्सची (split ends) म्हणजेच दुभंगलेल्या केसांची समस्या आजकाल अगदी सामान्य झाली आहे. आजकाल अनेक महिलांन केसांना फाटे फुटण्याचा किंवा ते दुभंगण्याचा त्रास सहन करावा लागतो. केसांसाठी वापरण्यात येणारे केमिकल्स (harmful chemicals) आणि हेअर स्ट्रेटनर यामुळे केस दुभंगण्याचा धोका जास्त असतो. फाटे हे केसांना कुठेही फुटू शकतात. पण शक्यतो लांब केसांच्या शेवटच्या टोकाला फाटे फुटल्याचे दिसून येते. याचा सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजे यामुळे केसांची वाढ खुंटते.
तुम्हालाही स्प्लिट एंड्सचा त्रास असेल तर काही गोष्टी करणे पूर्णपणे टाळावे, अन्यथा केस दुभंगण्याचा त्रास आणखीनच वाढू शकतो. केसांच्या काळजीशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.
ओले केस विंचरणे
अनेकदा आपण केस ओले असताना कंगव्याचा वापर करतो, त्यामुळे आपले केस कोरडे होतात आणि स्प्लिट एंड्सही वाढतात. तसेच केस गळूही लागतात. त्यामुळे तुमचे केस ओले असतील तर केसांमध्ये कंगवा अजिबात वापरू नका, ते आधी पूर्ण कोरडे होऊ द्या. असे केल्याने तुमचे केस अडकणार नाहीत आणि त्यांचे नुकसान होण्यापासून वाचेल.
केस न कापणे
बऱ्याच काळापासून केस कापले नसतील तरीही स्प्लिट एंड्सची समस्या दिसून येते. प्रत्येक महिलेने किंवा तरूणीने किमान 6 महिन्यांनंतर तरी त्यांचे केस ट्रिम केले पाहिजेत. जेणेकरून ते दुभगंणार नाही व ते डॅमेज फ्री राहतील.
कंडीशनर न वापरणे
अनेकदा आपण घाईघाईत केस धुण्यासाठी फक्त शांपूचा वापर करतो, त्यांना नंतर कंडीशनर लावत नाही. पण केसांना योग्य प्रमाणात ओलावा मिळायला हवा असेल तर शांपूसोबत केसांना कंडीशनर लावणे अत्यावश्यक असते.
केस वारंवार धुणे
केस वारंवार धुणे हे देखील स्प्लिट एंड्सचे किंवा केस दुभंगण्याचे कारण असू शकते. केस वारंवार धुतल्याने त्यातील आर्द्रता कमी होते आणि केस कोरडे होऊ लागतात. जर तुम्हाला स्प्लिट एंड्स टाळायचे असतील तर आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच केस धुवावेत.