Valentine Day : धर्माच्या सीमा ओलांडत लग्नगाठ बांधली, रसिका आणि आसिफचा आंतरधर्मीय प्रेम विवाह पुन्हा चर्चेत
कधीकाळी संपूर्ण राज्यात चर्चेत आलेल्या नाशिकमधील एक विवाह पुन्हा एकदा दीड वर्षांनी व्हॅलेंटाईन वीकच्या निमित्ताने चर्चेत आली आहे.
नाशिक : काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर ( Social Media ) एक लग्नपत्रिका व्हायरल झाली होती. त्यामध्ये लिहिलं होतं रसिका ( Rasika ) आडगावकर आणि आसिफ ( Asif ) खान. त्यामुळे या विवाहाला धार्मिक रंग देऊन लग्न मोडण्यासाठी कट्टरवादी लोकांनी यामध्ये पुढाकार घेतला होता. त्यामुळे संपूर्ण राज्यात हा चर्चेचा विषय झाला होता. यामधील विशेष बाब म्हणजे दोन्ही समाजातील कट्टरवादी लोकांनी या लग्नाला विरोध करूनही दोन्ही मुला-मुलीकडील कुटुंबं त्यांच्यासोबत होते. त्यामुळे लग्न होणार हे जवळपास निश्चित होते. मात्र, विरोध पाहता लग्न होणार की नाही अशी सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली होती.
पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. असं असलं तरी आजही आंतरधर्मीय असो नाहीतर आंतरजातीय विवाह असो त्याला अनेक ठिकाणी विरोध केला जातो. त्यामुळे अनेक ठिकाणी दुर्दैवी घटना सुद्धा घडतात.
आंतरधर्मीय किंवा आंतरजातीय विवाह केल्यानंतर समाज काय म्हणेल, नातेवाईकांमध्ये काय चर्चा होईल अशा भीतीपोटी अनेक विवाह होत नाही पण याच भिंती तोडून दीड वर्षापूर्वी आसिफ आणि रसिकाचा विवाह पार पडला होता.
विशेष म्हणजे संपूर्ण ठिकाणाहून विरोध होत असतांना तत्कालीन मंत्री बच्चू कडू यांनी आसिफ आणि रसिकाची भेट घेतली होती. त्यानंतर हा विवाह निर्विघ्नपणे पार पडला होता. आज त्यांच्या लग्नाला जवळपास दीड वर्षे पूर्ण झाले आहे.
आसिफ आणि रसिका यांची खरंतर ओळख महाविद्यालयात झाली होती. त्यांची चांगली मैत्री झाल्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले होते. त्यानंतर दोघांनीही आपल्या घरी याबाबत माहिती देऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
दोन्ही कुटुंबाकडून संमती मिळाल्यानंतर लग्न सोहळा पार पडत होता. मात्र, नातेवाइकांनीच लग्नपत्रिका व्हायरल करत लग्न मोडण्यास सुरुवात केली होती, त्यानंतर कट्टरवादी लोकांनी यामध्ये उडी घेत लग्न मोडण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र, आज दीड वर्षे झाले असून रसिका आणि आसिफ यांचा सुखाने संसार सुरू असल्याचे सांगत आहे. आम्ही लग्न करतांना हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही पद्धतीने विवाह केला होता असे सांगत असतांना त्यांना आजही तो विरोध डोळ्यासमोर येत आहे.
आसिफ आणि रसिका यांच्या प्रेमाची चर्चा सध्या सुरू असलेल्या व्हॅलेंटाईन विकमध्ये चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचा, त्यामध्ये झालेला विरोध आणि आता सुखी असलेल्या संसाराची चर्चा होऊ लागली आहे.