कोरड्या त्वचेच्या समस्येने झालात हैराण ? या पदार्थांमुळे त्वचा राहील हायड्रेटेड
थंडीत कोरड्या त्वचेच्या समस्येमुळे अनेक लोक त्रस्त असतात. ही समस्या कमी करण्यासाठी काही पदार्थांचे सेवन करणे लाभदायक ठरू शकते. त्यांच्या नियमित सेवनाने त्वचेतील आर्द्रता कायम राहील.
नवी दिल्ली – हिवाळ्यात बहुतांश लोकांना कोरड्या त्वचेचा (dry skin) त्रास होतो. कोरडी, आणि भेगाळलेली त्वचा खडबडीत असते, स्पर्श केला तरी वेदना होतात. तसेच ती निस्तेज आणि निर्जीवही दिसते. जर साबणाने चेहरा स्वच्छ केला तर तो आणखी कोरडा होतो. कोरड्या त्वचेमध्ये आर्द्रतेचा अभाव असतो. आणि अशा त्वचेला संसर्ग (infection) होण्याचीही शक्यता असते. मॉयश्चरायझर लावूनही तुमची त्वचा कोरडी आणि निर्जीव असेल तर आहार बदलून पहावा. काही पदार्थांचे सेवन केल्याने शरीरातील विषारी (toxins) पदार्थ बाहेर काढून ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होते.
असे काही पदार्थ जाणून घेऊया, जे कोरड्या त्वचेची समस्या दूर करतात आणि त्वचेतील आर्द्रता टिकवून ठेवतात.
किवी – तुमची त्वचा खूप कोरडी असेल तर तुम्ही किवी खाऊ शकता. किवीमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक असते. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे त्वचेवर विपरीत परिणाम होतो. यासोबतच सांधेदुखी, जखमा भरण्यास उशीर यासारख्या समस्याही उद्भवू शकतात. व्हिटॅमिन सी त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यासाठी फायदेशीर असते, तसेच रोगप्रतिकारशक्तीही मजबूत राहते. व्हिटॅमिन सीच्या सेवनाने मोतीबिंदू होण्याचा धोका कमी होतो. सर्दीच्या लक्षणांची तीव्रता कमी करते. त्यामुळे किवीचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
हळद – त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी हळदीचा वापर वर्षानुवर्षे केला जातो. हळद त्वचेशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या दूर करते. हळदीमुळे कोरड्या त्वचेशी लढण्यासही मदत होते. हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन कंपाऊंड अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मांनी समृद्ध असते. सोरायसिस आणि त्वचारोगाची लक्षणे कमी करण्यासाठी कर्क्यूमिन प्रभावी ठरू शकते. हे मुरुम देखील कमी करते.
भरपूर पाणी प्यावे – जर तुमची त्वचा कोरडी असेल तर पुरेशा प्रमाणात पाणी पिण्यास सुरुवात करा. थंडीच्या दिवसांत तहान न लागल्याने अनेकदा लोकं कमी पाणी पितात. पाण्याद्वारे त्वचेच्या पेशी पुन्हा हायड्रेट होतात. पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने वृद्धत्वाची लक्षणे लवकर दिसत नाहीत. त्वचेत ओलावा टिकून राहतो. दररोज कमीत कमी तीन लिटर पाणी प्यायले पाहिजे.
सुकामेवा खा – आहारात ड्रायफ्रुट्स किंवा सुका मेव्याचा समावेश करून तुम्ही त्वचेची आर्द्रता टिकवू शकता. तुम्ही अक्रोड, बदाम, काजू, पिस्ता, इत्यादी पदार्थ खाऊ शकता. यामध्ये मुबलक प्रमाणात प्रथिने, बी गटातील जीवनसत्त्वे, व्हिटॅमिन ई असतात, ज्याचा त्वचेला फायदा होतो. याशिवाय त्यात मॅग्नेशिअम, तांबे, लोह, कॅल्शिअम, जस्त, पोटॅशिअम, डाएटरी फायबर देखील असते, जे पेशींची दुरुस्ती करतात. यामुळे रक्ताभिसरण सुधारते. तसेच त्वचा मऊ, रेशमी आणि चमकदार दिसते.
ॲव्होकॅडो खा – ॲव्होकॅडोच्या सेवनामुळेही त्वचा निरोगी राहते. तसेच त्वचेतील ओलावा टिकून राहतो. या फळामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के यासह फोलेट, ओमेगा-3 फॅटी ॲसिड असतात. हे सर्व पोषक घटक स्किन टिश्यूजना निरोगी ठेवतात. व त्वचा हायड्रेटेड राहते. ॲव्होकॅडो खाल्ल्याने सुरकुत्या येण्याची समस्याही दूर होते.