सुंदर आणि मऊ पाय हवे असतील तर या टिप्स ठरतील फायदेशीर, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
हिवाळ्यात पायांची निगा राखण्यासाठी मसाज, स्क्रब आणि पायाला तेल लावणे, हे महत्वाचे ठरते. आपल्या चेहर्याप्रमाणेच पायांच्या त्वचेतही ऋतूनुसार बदल होत असतो. तुम्हालाही या बदलांच्या प्रभावापासून पायांचे संरक्षण करायचे असेल, तर या टिप्स जरूर फॉलो करा.
नवी दिल्ली – पाय सुंदर व मऊ ठेवणायासाठी आपण अनेकदा पायाला मालिश (foot massage) करतो, त्यामुळे अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. त्याशिवाय, पायांची योग्य काळजी घेण्यासाठी काही विशेष उपचार (treatment) करणेही आवश्यक आहे. कोरडे पडलेले पाय आणि भेगा पडलेल्या टाचांपासून मुक्त होण्यासाठी काही टिप्स (foot care tips) जाणून घेऊया. ज्यामुळे हिवाळ्यातही तुमच्या पायांचे आरोग्य जपले जाईल व तुम्ही नीट काळजी घेऊ शकाल.
हिवाळ्यात पायांची त्वचा कोरडी पडू लागते. त्यामुळे पाय निर्जीव, कोरडे आणि पांढरे दिसू लागतात. थंड वाऱ्याचा प्रभाव कमी करण्यासाठी आपण मोजे वापरतो. थंडीचे हे परिणाम कमी करण्यासाठी काही उपाय केल्यास तुमची समस्या आपोआप दूर होईल.
अशी घ्या पायांची काळजी
1) मॉयश्चराइज करा
दिवसातून दोन ते तीन वेळा पाय मॉयश्चराइज करा. खरंतर चेहऱ्याप्रमाणेच पायाची त्वचाही हिवाळ्यात कोरडी होते. विशेषत: टाचांना कोरडेपणामुळे भेगा पडू लागतात. ज्यामुळे पायांचे सौंदर्यही बिघडते आणि कधी कधी चालताना त्रास होतो. पायांवर क्रीम लावल्यास पायाची त्वचा मऊ राहते आणि पाय मोज्यांमध्ये लपवावे लागणार नाहीत. यासाठी तुम्ही पायांवर कोणतेही फूट क्रीम लावू शकता. पायांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी खोबरेल तेलाने पायाची मालिश करा. हवे असल्यास तुम्ही टाचांवर कोरफडीचे जेल किंवा पेट्रोलियम जेली देखील लावू शकता.
2) प्यूमिक स्टोन
हिवाळ्यात हातांच्या बोटांची आणि पायाची त्वचा खडबडीत होते. त्वचेची हरवलेली चमक परत आणण्यासाठी पायांच्या कडक त्वचेला प्युमिक स्टोनने घासून घ्या. प्युमिक स्टोन मृत त्वचा काढून त्वचेला एक्सफोलिएट करण्याचे काम करते. मात्र तो चेहऱ्यावर वापरणे टाळा.
वापरण्याची पद्धत
सर्व प्रथम, पाय कोमट पाण्यात भिजवा. तुम्ही पाण्यात थोडे बॉडी वॉश घालू शकता. 5 मिनिटांनंतर प्युमिक स्टोनने पाय घासून घ्या. गोलाकार पद्धतीने पाय घासणे खूप फायदेशीर ठरते. डेड स्कीन काढून टाकल्यानंतर पाय कोरडे करा. त्यानंतर पायाला कोणतेही क्रीम लावा आणि मोजे घाला.
3) पॅराफिन वॅक्स
कोणताही उपाय करण्यापूर्वी, पायाच्या तळव्याची त्वचा मऊ करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही हलके गरम पॅराफिन वॅक्स वापरू शकता. पॅराफिन वॅक्स कोरड्या आणि भेगा पडलेल्या टाचांसाठी प्रभावी ठरते.
त्यासाठी पॅनमध्ये पॅराफिन वॅक्स घेऊन ते वितळवा, नंतर त्यात पाय बुडवा. यानंतर तुमचे पाय प्लास्टिकमध्ये गुंडाळा आणि त्यांना किमान अर्धा तास तसेच राहू द्या. मात्र ही प्रक्रिया घरी करणे टाळा आणि सौंदर्य तज्ञाच्या देखरेखीखालीच करावी.
4) ग्लिसरीनच्या वापराने त्वचा बनेल मऊ
ग्लिसरीन त्वचेतील ओलावा रोखण्याचे काम करते. हिवाळ्यात पाय मऊ, गुळगुळीत आणि भेगा-मुक्त ठेवण्यासाठी ग्लिसरीन हा एक सोपा उपाय आहे.
अशा प्रकारे करा वापर –
एका भांड्यात 2 मोठे चमचे गुलाबपाणी घेऊन त्यात 4 मोठे चमचे ग्लिसरीन मिसळा. आता हे मिश्रण पायाला चोळा. नंतर पायात मोजे घालून मग झोपा. रात्रभर हे मिश्रण पायांवर ठेवावे आणि सकाळी कोमट पाण्याने पाय धुवावे.
5) फूट स्क्रब
पायांची त्वचा मऊ करण्यासाठी फूट स्क्रब हा एक प्रभावी मार्ग आहे. तुम्ही घरी साखर आणि मधाचे मिश्रण सहज बनवून पायाला लावू शकता. याशिवाय बाजारात उपलब्ध असलेले फूट स्क्रब देखील लावता येईल.
असा करा वापर
एका भांड्यात 4 चमचे मध आणि 4 चमचे साखर घ्या. त्यानंतर त्यात एक चमचा लिंबाचा रस घाला. हे मिश्रण एकत्र करावे आणि पायाला लावून स्क्रब करावे. स्क्रबिंग केल्यानंतर, हे मिश्रम 10 मिनिटे पायांवर फूट पॅक सारखे राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने पाय धुवावेत.