थंडीत मुलांच्या आहारात तिळाचा जरूर करा समावेश, मिळतील हे जबरदस्त फायदे
तीळ दिसायला जरी लहान असले तरी त्यामध्ये खूप उर्जा असते. हिवाळ्यात मुलांच्या आहारात तीळाचा समावेश केला तर मुले दिवसभर सक्रिय आणि ऊर्जावान राहतील. तिळाच्या सेवनाने शरीरात शक्ती वाढते.
नवी दिल्ली – हिवाळ्यात लहान मुलं सहज आजारी (fall sick) पडतात. मुलांची प्रतिकारशक्ती मजबूत असेल तर संसर्गजन्य विषाणू त्यांना स्पर्शही करू शकत नाहीत आणि ती निरोगी राहतात. त्यामुळे ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत असेल अशा मुलांच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. हिवाळ्यात तीळ (sesame seeds) खाण्याची परंपरा आहे. तीळ हे ऋतूमानानुसार होणाऱ्या रोगांपासून संरक्षण (immunity) करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.
तीळ हे शरीराला उबदार ठेवतात आणि रोगप्रतिकार शक्तीही मजबूत करतात. रोजच्या आहारात 2-3 चमचे तीळ खाल्ले तर खूप फायदा होतो. लहान मुलं तीळ असे सहज खाणार नाहीत, पण वेगवेगळ्या पदार्थांमधून ते त्यांना खायला दिले तर अनेक आजार दूर राहतील.
लहान मुलांसाठी तीळाचे फायदे
एनर्जी बूस्टर – तीळ दिसायला जरी लहान असले तरी त्यामध्ये खूप उर्जा असते. हिवाळ्यात मुलांच्या आहारात तीळाचा समावेश केला तर मुले दिवसभर ॲक्टिव्ह आणि ऊर्जावान राहतील. तिळाच्या सेवनाने शरीरातील शक्ती वाढते. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स मेटाबॉलिज्म मजबूत करतात आणि पेशी निरोगी ठेवतात. त्यामुळे तीळ खाल्याने मुलांचा चांगला विकास होतो.
हाडं मजबूत होतात – तीळामध्ये कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हाड मजबूत करण्यासाठी तुम्ही मुलांना तीळ खायला देऊ शकता. वाढत्या वयात भरपूर कॅल्शिअम मिळाल्यास मुलांची उंचीही चांगली वाढते.
मेंदूसाठी फायदेशीर – तीळामध्ये चांगली चरबी असते, त्यामुळे मेंदूच्या विकासासाठी ते खूप फायदेशीर ठरतात. तसेच त्यातील अनसॅच्युरेटेड फॅट्स हेही मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी खूप फायदेशीर आहे. तीळाच्या सेवनामुळे त्वचा चांगली राहते तसेच जखमा सहज भरल्या जातात.
अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात – तीळात भरपूर अँटी-ऑक्सिडंट असतात. ते फ्री रॅडिकल्समुळे खराब झालेल्या पेशींना पुन्हा बरे करण्यास मदत करतात. तसेच त्वचा, केस आणि शरीराचे इतर भागही निरोगी राहतात.
अनेक रोगांपासून संरक्षण होते – तीळाच्या सेवनाने आपले लिव्हर (यकृत) निरोगी राहण्यास मदत होते, ज्यामुळे मुलांमध्ये कावीळ, हेपिटायटीस सारख्या आजारांचा धोका कमी होतो.
दातांची काळजी – लहान मुलांच्या दातांसाठीही तीळ खूप फायदेशीर असतात. यामध्ये मुबलक प्रमाणात असलेल्या कॅल्शिअममुळे अनेक समस्यांपासून दातांचे संरक्षण होते.