New Year Celebration | नवीन वर्षाचे निमित्त साधून गोव्याला जाताय? मग ‘ही’ ठिकाणे पाहण्यास विसरू नका!
तुम्ही आता गोव्यात असाल किंवा जाण्याचे नियोजन करत असाल, तर ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या.।
मुंबई : नवीन वर्षाचे आगमन व्हायला आता केवळ एक दिवस शिल्लक राहिला आहे. अनेकांनी या सुट्ट्यांचे नियोजन आधीच केले आहे. मात्र, काही जन अजूनही घरीच अडकले होते. आता त्यांनी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गोव्याची निवड केलीच असेल. किंबहुना काही लोक आधीच गोव्यात पोहोचले देखील असतील. अशावेळी नवीन वर्षाची पार्टी किंवा नुसती मौजमजा करण्याबरोबरच गोव्यातील काही खास ठिकाणांना देखील भेटी दिल्या पाहिजेत (Top 5 Place in Goa you must visit).
तरुणांसह आबालवृद्ध सर्वांचेच आवडते ठिकाण गोवा आहे. विशेषतः तरुण वर्ग गोव्याला जाण्यासाठी सदैव तयार असतो. सह्याद्रीच्या रांगांमुळे हिरवागार निसर्ग, नारळ-पोफळीच्या बागा, सोनेरी मुलायम रेतीचे समुद्र किनारे व देश-विदेशातील पर्यटकांची मांदियाळी यामुळे गोव्याचे वातवरण सगळ्यांनाच सुखावून जाते. गोव्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्हाला भटकंती करता येते. तेव्हा तुम्ही आता गोव्यात असाल किंवा जाण्याचे नियोजन करत असाल, तर ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या…
ओल्ड गोवा / पणजी
पणजी ही पोर्तुगीजांची राजधानी होती. आशिया खंडातील सर्वात जास्त चर्च पणजीमध्ये असून त्यातील काही चर्च जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट आहेत. ओल्ड गोव्यातील ‘बॅसेलिका बॉम जीजस’, ‘द कान्वेट’, ‘चर्च ऑफ सेंट फ्रान्सिस’ ही चर्च प्रसिध्द असून, सेंट फ्रान्सिस चर्चमध्ये ‘सेंट फ्रान्सिस जेवियर’ यांचा मृतदेह ममी स्वरुपात जतन करण्यात आला आहे. आजही तो मृतदेह सुस्थितीत पाहायला मिळतो. या शिवाय पणजीमध्ये सलीम आली पक्षी अभयारण्य, गोवा राज्य संग्रहालय, गोवा पुरातत्व संग्रहालय, रीस मागोस किल्ला ही ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.
अॅग्वादा किल्ला
सतराव्या शतकात बांधलेला हा किल्ला मांडवी नदीच्या किनाऱ्याला लागलेला असून, प्रामुख्याने डच आणि मराठ्यापासून संरक्षण व्हावे म्हणून पोर्तुगीजांनी बांधला होता. पोर्तुगीजांच्या जहाजांना पिण्याचे पाणी व इतर साहित्य भरण्यासाठी, तसेच विश्रांतीसाठी या किल्ल्याचा वापर केला जाई. या किल्ल्यावर आशिया खंडातील सर्वात जुने असे पाच मजली दीपगृह आहे. फोटोग्राफीसाठी व निवांत वेळ घालवण्यासाठी हा किल्ला उत्तम ठिकाण आहे (Top 5 Place in Goa you must visit).
शनिवारी भरणारा रात्र बाजार
उत्तर गोव्याच्या आरपोरा या ठिकाणी दर शनिवारी, संध्याकाळी 4 पासून मध्यरात्रीपर्यंत बाजार भरतो. अनेक प्रकारच्या वस्तूंची खरेदी-विक्री या बाजारात होते. विदेशी पर्यटकांची विशेष गर्दी या बाजारात दिसून येते. आभूषणे, खेळणी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, चप्पल, बूट, चामड्याच्या वस्तू अशा अनेक प्रकारच्या वस्तू इथे रास्त भावात मिळतात. या बाजाराला लागुनच अनेक हॉटेल्स आहेत, जिथे लोक गोव्याचा निवांतपणा अनुभवू शकतात.
मंगेशी मंदिर
पणजीपासून 21 किमी अंतरावर मंगेशी गावामध्ये भगवान शंकराचे पुरातन मंदिर आहे. 450 वर्षे जुने असलेले हे मंदिर आस्थेचे प्रतिक आहे. या मंदिराच्या परिसरात आल्यानंतर मन:शांतीचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. मंदिराच्या आवारात असलेली सातमजली दीपमाळ सगळ्या भाविकांचे लक्ष वेधून घेते.
दूधसागर धबधबा
नावाप्रमाणेच दुधासारखा दिसणारा हा धबधबा निसर्गाचा अद्भुत देखावा आहे. भारतातील सर्वात उंच धबधब्यापैकी एक असणारा हा धबधबा कर्नाटक व गोवा या राज्यांची सीमा विभागतो. स्थानिक भाषेत या धबधब्याला ‘तांबडी सुर्ला’ असे म्हटले जाते. पणजीपासून 61 किमी व मडगावपासून 46 किमी अंतरावर हा धबधबा असून, जवळच भगवान महावीर सेन्क्चुरी व मोलेन नॅशनल पार्क आहे. बेळगाव- मडगाव रेल्वेमार्गावर कॅसल रॉक या ठिकाणी रेल्वे काही काळासाठी तांत्रिक थांबा घेते. या वेळी आपण हा धबधबा पाहू शकतो. तर, कुलेम गावातून धबधब्यापर्यंत जाण्यासाठी वन विभागाची जीप सफारी घेता येते.
(Top 5 Place in Goa you must visit)
हेही वाचा :
Photos : कोरोना, लॉकडाऊन अशा शब्दांनी वैतागलाय, मग कोकणातील हे ‘तुंबाड’ ठिकाण पाहाच…https://t.co/giACYB1k7O#Kokan | #Tumbad | #Ratnagiri
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 29, 2020