Home Remedies For Dark Neck : काळवंडलेल्या मानेमुळे वाटते लाज ? या घरगुती उपायांची होईल मदत
त्वचेचा रंग उजळवण्यासाठी लोकं विविध उपाय करत असतात. चेहऱ्यासाठी आपण विविध क्रीम्सचा वापर करतो, पण कधी आपल्या मानेकडे पुरेसे लक्ष देतो का ? काळवंडलेल्या मानेकडेही वेळीच लक्ष देऊन उपाय केले पाहिजेत.
नवी दिल्ली | 5 ऑगस्ट 2023 : बहुतांश लोक सुंदर चेहरा हवा म्हणून विविध उपाय करत असतात. रोज सकाळ – संध्याकाळ फेसवॉश वापरणे, फेस मास्क वापरणे असो किंवा आणखी काही… पण चेहऱ्याच्या सौंदर्याच्या नादात बऱ्याच वेळेस मानेच्या स्वच्छतेकडे (Dark Neck) लक्षच जात नाही.
चेहरा तर चमकदार दिसू लागतो पण आपली मान खूप काळसर वाटू लागते. अनेक वेळा धूळ, माती प्रदूषण तसेच टॅनिंगमुळेही मानेचा रंग काळवंडतो. मानेचा गडदपणा घालवण्यासाठी काही घरगुती उपायांची (Home Remedies) मदत घेऊ शकतो. ज्यामुळे फरक दिसून येईल.
बेसन व लिंबू
चणाडाळीचं पीठ किंवा बेसन आणि लिंबू यांच्या वापराने मानेचा रंग उजळू शकतो. त्यासाठी एका वाटीत एक चमचा बेसन आणि एक चमचा लिंबाचा रस घ्या व त्याची पेस्ट बनवा. आता ही पेस्ट मानेवर लावून मसाज करा. १० मिनिटे पेस्ट मानेवर ठेवून वाळू द्या व नंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. १० -१५ दिवस हा उपाय नियमित केल्यास तुम्हाला अपेक्षित फरक दिसण्यास सुरूवात होईल.
बटाटाही फायदेशीर
टॅनिंग घालवण्यासाठी कच्चा बटाटा वापरणेही फायदेशीर ठरते. त्यात कमी प्रमाणात ॲसिड असते, जे मानेचा रंग खुलवण्यास मदत करते. एक कच्चा बटाटा घेऊन त्याचा कीस काढा. त्यानंतर त्या किसातून रस पिळून काढा व त्यात थोडे दही मिसळा. हे मिश्रण मानेवर लावून २० मिनिटे ठेवावे. वाळल्यावर धुवून टाकावे.
तांदूळाच्या पीठानेही पडेल फरक
एका वाटीत दोन चमचे तांदूळाचे पीठ घेऊन त्यात दोन चमचे बटाट्याचा रस घाला. हे नीट मिक्स करून मानेला लावा आणि मसाज करा. तुम्हा हवे असेल तर तुम्ही त्यात गुलाबजलही टाकू शकता. २० मिनिटांनी हे मिश्रण मानेवरून काढा आणि स्वच्छ धुवा. नियमित वापराने फरक दिसून येईल.
दही व हळद ठरते उपयोगी
मानेचा गडदपणा घालवून ती उजळवण्यासाठी तुम्ही हळद आणि दह्याची पेस्ट वापरू शकता. यासाठी एका भांड्यात 2 चमचे दही घ्या आणि त्यात 2 चिमूटभर हळद घाला. त्याची पेस्ट बनवून मानेवर लावा. सुमारे 30 मिनिटांनंतर ते स्वच्छ करा.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)