Nail Care Tips: हिवाळ्यात वारंवार तुटतात नखं ? ‘या’ सोप्या टिप्स वापरून पहा
हिवाळ्यात बऱ्याच लोकांची नखं अधिक प्रमाणात तुटतात. नखं तुटण्याच्या या समस्येपासून बचाव करण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्सचा अवलंब करू शकता.
नवी दिल्ली – हिवाळ्यात नखं वारंवार (nail breakage) तुटण्याच्या समस्येने अनेकांना त्रास होतो. तसेच बऱ्याच वेळेस नखांच्या आसपासची त्वचा देखील खूप कोरडी (dry skin) होते. असे घडण्याची अनेक कारणे असू शकतात. जास्त गरम पाण्याचा वापर करणे, त्वचा कोरडी पडणे, नेलपेंट अधिक वेळेस वापरणे आणि थंड हवेत योग्य काळजी न घेणे (nail care) या कारणांमुळे नखं तुटू शकतात. तर काही वेळेस नखांच्या मध्यात एखादा क्रॅक अथवा तडाही पडतो. कोरडी त्वचा काढून टाकल्यावर खूप वेदना होतात. अशा परिस्थितीत नखांची योग्य काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
थंडीमध्ये नखांची योग्य काळजी घेण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्सचा वापर करू शकता.
हँड मॉयश्चरायजरचा वापर करा
हिवाळ्यात आपण फक्त चेहऱ्याची जास्त काळजी घेतो. मात्र आपल्या हातांकडे आपलं दुर्लक्ष होतं. यामुळे नखं कमकुवत होऊ लागतात आणि ती फार पटकन तुटतात. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे व त्यांना नीट मॉयश्चरायझर वापरणे महत्त्वाचे ठरते. तुम्ही चांगल्या प्रतीचे हँडक्रीम लावू शकता. याशिवाय तुम्ही पेट्रोलियम जेलीचाही वापर करू शकता.
ग्लोव्हज/हातमोजे घालावे
थंड हवेपासून हातांचे रक्षण करणे महत्वाचे ठरते. हात थंड हवेच्या संपर्कात आले तर ते केवळ कोरडे आणि निर्जीव होत नाही तर आपल्या हातांची नखंही कमकुवत होतात. आणि याच कारणामुळे नखं पटकन तुटतातही. त्यामुळे थंड हवेत हातांची नीट काळजी घेतली पाहिजे. हात व नखांचे संरक्षण करण्यासाठी हँडग्लोव्हज किंवा हातमोज्यांचा वापर करावा. यामुळे नखांचे कमी नुकसान होईल.
सकस व संतुलित आहार घ्यावा
नखं निरोगी ठेवायची असतील तर त्यांना योग्य पोषण मिळणेही आवश्यक आहे. कॅल्शिअम, जीवनसत्त्वे आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. यामुळे तुमचे आरोग्य तर चांगले राहीलच आणि नखेही मजबूत होतील. तसेच पुरेशा प्रमाणात पाणी प्या. कमी पाण्याचे सेवन केल्यानेही नखांचे नुकसान होऊ शकते.
नखांना मसाज करा
हिवाळ्यात गरम पाण्याच्या वापरामुळे आपली त्वचा कोरडी होते आणि नखे कमकुवत होतात. यामुळे ती अधिक तुटतात. अशा परिस्थितीत नखांना निरोगी ठेवण्यासाठी आंघोळ करण्यापूर्वी नखांना मसाज करणे महत्त्वाचे आहे. नखांसाठी तुम्ही बदाम तेल आणि खोबरेल तेलाचा वापर करू शकता. आंघोळ करण्यापूर्वी काही वेळआधी नखांना या तेलाने मसाज करावा.