वेळीच सावध व्हा…टाइप 2 मधुमेहाचा विळखा वाढतोय…काय सांगतो अभ्यास ?
भारतात ज्येष्ठांसोबत आता तरुणांमध्येही मधुमेहाच्या समस्या निर्माण होत आहेत. यातील बहुतांश रुग्ण टाईप 2 मधुमेहाचे आहेत. अलीकडील संशोधनानुसार टाइप 2 मधुमेह असलेल्या रुग्णांना इतर 57 रोगांचा धोका असू शकतो, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मधुमेहींनी साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
भारतात गेल्या काही वर्षांत मधुमेहाच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक वाढली आहे. भारताला मधुमेहींची राजधानीच (Capital) म्हटले जात आहे. यावरुन भारतात मधुमेहींची संख्या किती झपाट्याने वाढतेय, हे दिसून येईल. ‘मेलिटस’ हा मधुमेहाचा सर्वात सामान्य प्रकार आहे. टाईप 2 मधुमेह (Type 2 diabetes) ग्रामीण लोकसंख्येच्या 2.4 टक्के आणि शहरी लोकसंख्येच्या 11.6 टक्के आहे. मधुमेहाचे 2 प्रकार आहेत. टाइप 1 मधुमेह आणि टाइप 2 मधुमेह. टाइप 1 मधुमेहामध्ये स्वादुपिंड इन्सुलिन अजिबात तयार करत नाही, तर टाइप 2 मधुमेहामध्ये, स्वादुपिंड कमी इन्सुलिन तयार करतो. मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी (Blood sugar levels) नियंत्रित ठेवणे खूप महत्वाचे आहे. जेव्हा शरीरात साखरेवर प्रक्रिया करण्याची क्षमता कमी होते तेव्हा टाइप 2 मधुमेह होतो.
दरम्यान, मधुमेह होण्याचे मुख्य कारण म्हणजे अतिरिक्त वजन आणि चुकीची जीवनशैली होय. अलीकडील संशोधनानुसार, टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांना 57 इतर रोगांचा धोका वाढतो. टाईप 2 मधुमेहामुळे कर्करोग, हृदय आणि किडनीच्या आजारांचा धोकाही वाढतो.
काय सांगते संशोधन?
केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या नेतृत्वाखालील आणि डायबिटीज यूकेने केलेल्या या अभ्यासात यूकेमधील 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 3 दशलक्ष लोकांचा डेटा वापरला गेला. ज्यामध्ये असे आढळून आले, की टाइप 2 मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये, मध्यमवयीन असलेल्यांना 116 पैकी 57 गंभीर आरोग्य समस्या निर्माण होण्याचा धोका जास्त होता. डायबेटिस यूकेच्या संशोधन संचालक डॉ. एलिझाबेथ रॉबर्टसन यांनी सांगितले, की मधुमेहाची गुंतागुंत गंभीर आणि जीवघेणी असू शकते. या अभ्यासात टाइप 2 मधुमेह असलेल्या मध्यमवयीन लोकांमध्ये रोगांचे प्रमाण तपशीलवार आहे. संशोधनात असे आढळून आले की टाइप 2 मधुमेह असलेल्या रुग्णांना मूत्रपिंडाच्या आजाराचा धोका 5 पट जास्त असतो, तर यकृताच्या कर्करोगाचा धोका सरासरीपेक्षा 4 पट जास्त असतो. डॉ. लुआन म्हणाले, मध्यम वयातील आरोग्य समस्या टाळण्यासाठी टाइप 2 मधुमेह रोखणे फार महत्वाचे आहे.
मँचेस्टर विद्यापीठाच्या विश्लेषणातून असे दिसून आले, की 2018 आणि 2019 दरम्यान इंग्लंडमध्ये टाइप 2 मधुमेह रोगामध्ये 7 टक्के घट झाली आहे. मधुमेहींनी ते काय खातात याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, कारण त्यांना त्यांचे ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. टाइप 2 मधुमेहामध्ये शरीरातील पेशी इन्सुलिनला प्रतिरोधक बनतात, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवण्याची जास्त गरज असते. नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या मते, रक्तातील साखरेची पातळी खूप जास्त असल्याने ‘डायबेटिक केटोअॅसिडोसिस’ सारखी जीवघेणी स्थिती निर्माण होऊ शकते.