Weekend Trip | एक दिवसाच्या सुट्टीचे नियोजन करताय? मग, पालघरमधील’जव्हार’ला नक्की भेट द्या!
सध्या मुंबईजवळचे ठिकाण आणि पर्यटनाचा एक नवीन पर्याय म्हणून पालघर जिल्ह्याकडे बघितले जात आहे.
मुंबई : नवीन वर्ष सुरु झालं आहे. वर्षाप्रमाणेच आता सुट्ट्या संपून, कामंदेखील सुरु झाली आहेत. रोजच्या कामातून आणि धकाधकीच्या जीवनातून काही निवांत क्षण शोधत असाल, तर पालघरमधील ‘जव्हार’ला नक्की भेट दिली पाहिजे. सध्या मुंबईजवळचे ठिकाण आणि पर्यटनाचा एक नवीन पर्याय म्हणून पालघर जिल्ह्याकडे बघितले जात आहे. या शहराला निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्य बहाल केले आहे. पर्वत रांगा, धबधबे, तलाव, पुरातन वास्तुकला, नयनरम्य सनसेट पॉईंट्स, आणि रेखीव मंदिरे या सुंदर आणि शांत शहराला एक परफेक्ट डेस्टीनेशन बनवतात (Weekend trip destination Palghar Javhar).
‘पालघर’ रेल्वे स्थानक असल्याने, शटल-मेल किंवा लोकलने पालघरला जाता येते. तिथून पुढे प्रवासासाठी एसटी बस किंवा स्थानिक वाहनाचा वापर करता येतो. तुम्ही देखील एक दिवसाच्या सुट्टीनिमित्ताने पालघरला जाण्याचा विचार करत असाल, तर ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या…
दाभोसा आणि दादरकोपरा धबधबा
जव्हारपासून 18 किलोमीटरवर तलासरी-सिल्व्हासा रोडवर हे सुंदर धबधबे आहेत. लेंडी नदीपासून वाहणारे पाणी डोगरांच्या दोन्ही बाजूने धबधब्याच्या रूपात खाली येते. दाभोसा हा मुख्य धबधबा असून उंची 300 फूट इतकी आहे. दादरकोपरा धबधबा हा उन्हाळ्यात कोरडा असतो, म्हणून त्याला ‘सुका धबधबा’ असेही म्हणतात. दोन्ही धबधबे हे उंच डोंगरांनी वेढलेले आहेत. या भागात अनेक औषधी वनस्पती आढळून येतात.
शिर्पामाळ
तीन शतकांपेक्षाही जुने असे हे शिल्प शिवरायांच्या स्मरणार्थ बांधले गेले आहे. डोंगराच्या कडेवर असल्यामुळे या जागेचा शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी वापर केला जात असे. या भागातून संपूर्ण जव्हार शहरावर नजर टाकता येते. सुरतच्या दिशेने कूच करताना शिवरायांनी याच भागत थांबून विश्रांती घेतली होती. जव्हारचे त्यावेळचे राजे पहिले विमशहा यांनी छत्रपतींना मानाचा शिरपेच देऊन जव्हारमध्ये स्वागत केले तेच हे ऐतिहासिक स्थळ आहे. हिरव्यागार टेकडीवर फडकणाऱ्या भगव्याचे दृष्य अत्यंत सुंदर दिसते (Weekend trip destination Palghar Javhar).
जयविलास राजवाडा
जव्हारमधील सर्वात प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू असलेला हा वाडा ‘राज बरी’ या नावाने सुद्धा ओळखला जातो. राजे यशवंतराव मुकणे यांनी बांधलेला हा राजवाडा मुकणे घराण्याच्या राजाला राहण्यासाठी बांधला होता. येणाऱ्या शत्रूवर नजर ठेवण्यासाठी हा वाडा बरोबर डोंगराच्या माथ्यावर बांधला गेला आहे. आदिवासी संस्कृती दर्शवणारे कोरीवकाम, राजवाड्याची घुमटे आणि आजूबाजूला पसरलेले हिरवे जंगल ही या राजवाड्याची वैशिष्ट्ये आहेत. गुलाबी दगडातून तयार केलेल्या या अद्वितीय अशा वास्तुरचनेमुळे या वाड्याचा वापर अनेक चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी केला गेला आहे. नाममात्र शुल्क देऊन तुम्ही हा राजवाडा पाहू शकता.
सनसेट पॉईंट
जव्हारमधील अजून एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजेच सनसेट पॉईंट आहे. शहराच्या मध्यवर्ती भागापासून पश्चिमेला फक्त अर्धा किमीवर हे ठिकाण आहे. हा पॉईंट सूर्यास्ताचे एक अप्रतिम दृष्य दाखवतो. येथून दिसणारा दरीचा आकार हा धनुष्यासारखा आहे म्हणून पूर्वी या भागाला ‘धनुकमळ’ असे म्हटले जायचे. येथून डहाणू जवळच्या महालक्ष्मी डोंगराचेही सुंदर दृष्य दिसते.
(Weekend trip destination Palghar Javhar)
हेही वाचा :
Vacation Trip | मुंबईकरांनो नव्या वर्षात ‘शॉर्ट ट्रीप’चं प्लॅनिंग करताय? मग ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या!#vacation | #WeekendTrip | #Mumbai | #travel https://t.co/P7MtQQs2Sj
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 2, 2021