Women’s Day 2023 | जगातला पहिला महिला दिन कधी सजरा करण्यात आला? काय आहे नेमका इतिहास?
International Women's Day | जागतिक महिला दिन आज सर्वत्र उत्साहात साजरा केला जातोय. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात नेमकी कधी झाली, हे पाहुयात.
मुंबई : जगात सर्वत्र महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. विविध संघटना, कार्यालये इतकच काय तर घराघरांमध्ये महिलांप्रती आदरभाव व्यक्त करण्याकरिता वेगवेगळ्या पद्धतीने प्लॅनिंग करण्यात आलंय. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दरवर्षी ठराविक संकल्पनेवर आधारीत या दिवसाचं नियोजन केलं जातं. त्यापुढे संपूर्ण वर्षभर संबंधिक संकल्पनेनुसार समाज जागृतीचे उपक्रम हाती घेतले जातात. पण जगात सर्वात पहिल्यांदा महिला दिवस कुठे साजरा झाला, कुणी केली महिला दिनाची सुरुवात, असे प्रश्न अनेकदा पडतात. तर या प्रश्नांची उत्तर इथे मिळतील.
कुणाला सूचली संकल्पना?
तर जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्याची कल्पना सर्व प्रथम क्लारा झेटकीन या महिलेला सूचली. त्या अमेरिकेच्या. साम्यवादी विचारसरणीच्या कार्यकर्त्या आणि महिला हक्कांच्या पुरस्कर्त्या. नोकरीच्या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांची पिळवणूक कमी करता. त्यांना चांगला पगार आणि मतदानाचा अधिकार हवा, या मागण्यांसाठी त्यांनी मोठी रॅली काढली. ते वर्ष होतं १९०८चं. न्यूयॉर्कमध्ये १२ ते १५ हजार महिलांनी मोर्चा काढला. त्यानंतर एक वर्षाने अमेरिकेच्या सोशलिस्ट पार्टीने पहिल्या राष्ट्रीय महिला दिनाची घोषणा केली होती. त्यानंतर १९११ मध्ये डेन्मार्क, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, जर्मनीत पहिला आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात आला. या वर्षी आपण १११ वा जागतिक महिला दिन साजरा करत आहोत. १९७५ साली संयुक्त राष्ट्रांनी अधिकृत रितीने ८ मार्च हा महिला दिन साजरा करण्यास मान्यता दिली.
कोणत्या देशात कसा साजरा होतो महिला दिन?
जागतिक महिला दिनाला अनेक देशांमध्ये महिलांना सुटी दिली जाते. रशियात हा दिवस अधिक उत्साहाने साजरा केला जातो. तर चीनमध्ये अनेक महिलांना कामाच्या ठिकाणी अर्ध्या दिवसाची सुटी दिली जाते. अमेरिकेत संपूर्ण मार्च महिना वूमन्स हिस्ट्री मंथ म्हणून साजरा केला जातो. ८ मार्च या दिवशी अमेरिकन महिलांच्या यशाचं कौतुक करणारं मानपत्र काढलं जातं.
आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२३ ची थीम काय?
2023 या वर्षाच्या महिला दिनासाठी संयुक्त राष्ट्रांनी नवी संकल्पना सादर केली आहे. डीजी ऑलः लिंगसमानतेसाठी संशोधन आणि तंत्रज्ञानाचा वापर अशी ही संकल्पना आहे. ज्या महिला आणि मुली तंत्रज्ञान तसेच ऑनलाइन शिक्षणात जगभरात जे योगदान देतात, त्यांचा यथोचित सन्मान व्हावा, असा यामागे उद्देश आहे.