नवी दिल्ली : फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात व्हॅलेंटाइन वीक (Valentines week) सप्ताह साजरा केला जातो. 7 ते 14 फेब्रुवारी दरम्यान व्हॅलेंटाईन वीक असतो, त्यात वेगवेगळे दिवस साजरे केले जातात. त्यामध्ये रोझ डे, प्रपोज डे, किस डे, टेडी डे, प्रॉमिस डे अशा अनेक दिवसांचा समावेश असतो. याच आठवड्याचा तिसरा दिवस म्हणजे 9 फेब्रुवारी, हा चॉकलेट डे (Chocolate Day)म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जोडपे एकमेकांना चॉकलेट (chocolates) देऊन त्यांच्या प्रेमात गोडवा वाढवतात. तुम्हीही तुमच्या आवडत्या व्यक्तीला आज चॉकलेट देऊ शकता. पण व्हॅलेंटाइन डेच्या आधी चॉकलेट डे का साजरा केला जातो हे तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया याबद्दलची रंजक माहिती..
व्हॅलेंटाइन डे पूर्वी चॉकलेट डे का साजरा केला जातो?
वर नमूद केल्याप्रमाणे दरवर्षी 7 फेब्रुवारीपासून 14 फेब्रुवारीपर्यंत प्रेमाचा आठवडा व्हॅलेंटाईन वीक म्हणून साजरा केला जातो. हा आठवडाभर प्रेमी युगुलं आपल्या भावना वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करतात. यापैकीच एक असतो, तो म्हणजे चॉकलेट डे. खरंतर जागतिक चॉकलेट दिवस हा 7 जुलै रोजी साजरा केला जातो. पण व्हॅलेंटाईन वीकमध्ये येणारा हा चॉकलेट डे वेगळा असतो. कदाचित तुम्हाला हे माहीत नसेल पण 1550 साली चॉकलेटची ओळख झाल्यानंतरच वर्ल्ड चॉकलेट डे साजरा करण्यात येऊ लागला.
आहे रंजक इतिहास
चॉकलेट डे आणि व्हॅलेंटाईन वीक यांच्यातील नातेसंबंधात खूप इतिहास जोडलेला आहे. परंतु सर्वात लोकप्रिय गोष्ट ही प्रसिद्ध चॉकलेट निर्माता आणि समाजसेवक रिचर्ड कॅडबरी यांच्याशी संबंधित आहे. 1840 साली जगभरातील लोकांना व्हॅलेंटाईन डेबद्दल माहिती मिळाली. यानंतर लोकांनी या प्रसंगी आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांप्रती प्रेम दर्शवण्यासाठी भेटवस्तू म्हणून विविध फुलं आणि चॉकलेट देण्यास सुरुवात केली. रिचर्ड कॅडबरी यांनी चॉकलेट बनवायला सुरुवात केली आणि चॉकलेट बास्केटची वेगळी आयडिया लोकांसमोर आणली, असे म्हटले जाते. त्यानंतर चॉकलेट बास्केट हे लोकांच्या प्रेमाचे प्रतीक बनले आणि जगभरात चॉकलेट डे साजरा करण्याचा ट्रेंड सुरू झाला. व्हॅलेंटाइन डेच्या आधी केवळ चॉकलेट डेच नाही तर रोझ डे, प्रपोझ डे, टेडी डे, प्रॉमिस डे आणि किस डे असे अनेक दिवस साजरे करण्यात येतात.
तुम्हालाही तुमचा जोडीदार, मित्र-मैत्रिणी , पालक किंवा तुमची मुलं, थोडक्यात तुमच्या कोणत्या आवडत्या व्यक्तीला चॉकलेट द्यायचं असेल तर आजचा हा दिवस उत्तमच ठरेल नाही का?