मुंबई: सध्या देशभरात व्हॅलेंटाईन डेचा विक सुरू आहे. काल चॉकलेट डे झाला. आज टेडी डे आहे. त्यामुळे टेडी डे साजरा करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. मात्र, या स्पेशल विकमध्ये टेडी डे का साजरा केला जातो? असा प्रश्न काहींना पडू शकतो. या डेचा व्हॅलेंटाईन डेशी काय संबंध आहे? असा सवालही केला जातो. तुमच्या मनातही हा प्रश्न निर्माण झाला असेल. त्यामुळे टेडी डे साजरा करण्यापूर्वी त्याचा इतिहास जाणून घ्या. टेडी डे साजरा का केला जातो? असा सवाल गर्ल फ्रेंडने विचारल्यास तिला उत्तर देता आलं पाहिजे. त्यामुळे टेडी डेचा इतिहास माहीत असणं आवश्यक आहे.
14 नोव्हेंबर 1902 रोजी अमेरिकेचे 26वे राष्ट्रपती थिओडोर टेडी रुज्वेल्ट हे अस्वलाची शिकार करायला गेले होते. त्यावेळी त्यांच्या सहकाऱ्याने एका अस्वलाला झाडाला बांधले होते. त्यामुळे हे अस्वल जोरजोरात ओरडू लागलं. सुटकेसाठी धडपड करू लागलं. त्यामुळे अस्वलाला मारण्यास राष्ट्रपती थिओडोर टेडी रुजवेल्ट यांनी नकार दिला.
त्यानंतर त्यांनी वर्तमानपत्रात अस्वलाचं एक भलं मोठं कार्टून छापून आणलं. हे कार्टून पाहून अमेरिकेतील खेळण्याच्या दुकानाचे मालक मॉरिस मिचटॉम हे प्रचंड प्रभावित झाले. मिचटॉम यांनी थेट अस्वलाच्या आकाराची खेळणी तयार केली.
तत्कालीन राष्ट्रपती रुजवेल्ट यांचं टोपण नाव टेडी होतं. त्यांनी अस्वलाचे प्राण वाचवले होते. त्यामुळे मिचटॉम यांनी या खेळणीला टेडी बियर हे नाव दिलं. तेव्हापासून टेडी बियर हे प्रेमाचं प्रतिक मानलं जातं.
त्यानंतर या व्हॅलेंटाईन डेच्या दहा दिवसाच्या डेमध्ये टेडी डेचाही समावेश करण्यात आला. प्रेमाचं प्रतिक म्हणून त्याचाही व्हॅलेंटाईन डेमध्ये समावेश करण्यात आला.
दरवर्षी व्हॅलेंटाईन डेच्या चौथ्या दिवशी टेडी डे साजरा केला जातो. त्या दिवशी प्रियकर आणि प्रेयसी एकमेकांना टेडी गिफ्ट देतात. टेडी हे प्रेमाचं अनोखं प्रतिक मानलं जातं.
टेडी देण्याची प्रथा सुरू झाल्याने टेडीची मागणीही वाढली आहे. त्यामुळे मार्केटमध्ये छोट्या साईजपासून ते मोठ्या साईजपर्यंतचे विविध प्रकारचे टेडी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. दरवर्षी टेडी खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये झुंबड उडालेली असते.
काही लोक तर आधीच टेडीची ऑर्डर देऊन ठेवतात. तरुणींमध्येही टेडीची मोठी क्रेझ असल्याने आपल्या प्रेयसीला इंम्प्रेस करण्यासाठी तरुणांचा कल टेडी खरेदीकडे अधिक असल्याचं दिसून येतं.