चमचमीत जेवलात आता गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास सतावतोय? ‘या’ घरगुती उपायाने मिळेल आराम
चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेणे महत्त्वाचे आहे, पण त्याचबरोबर तुमच्या पचनाची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. थोडीशी खबरदारी घेऊन आणि योग्य उपाययोजना करून तुम्ही अॅसिडिटी टाळू शकता.

होळीचा सण काही दिवसांपुर्वीच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने अनेकांनी तळलेले, गोड पदार्थ तसेच अनेक प्रकारचे पेय या दिवशी अधिक प्रमाणात सेवन केले. त्यामुळे आता बहुतेक लोकांच्या पचनसंस्थेवर परिणाम झाला आहे. पोटात गॅस आणि ॲसिडिटी सारख्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. या समस्येमुळे पोट भरलेले वाटते, छातीत जळजळ आणि सौम्य वेदना होतात. जर पोट साफ नसेल तर अशा परिस्थितीत हे घरगुती उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील. या परिस्थितीत काय करावे आणि कोणते उपाय अवलंबावेत ते जाणून घेऊया.
पोटातील गॅस आणि ॲसिडिटीची समस्या अजून सतावत असेल तर हे काही नैसर्गिक घरगुती उपाय आहेत, जे बऱ्याचपैकी तुमच्या स्वयंपाकघरात आढळू शकतात. हे अंगीकारून तुम्ही तुमची पचनसंस्था पुन्हा बरी करू शकता.
बडीशेप
पाण्यात थोडी बडीशेप घेऊन काही तास भिजवून ठेवा आणि जेवणानंतर पाण्यातुन ती बडीशेप चावून खा. यामुळे तुम्हाला गॅस आणि अपचनाच्या समस्येपासून आराम मिळेल. बडीशेप पचनासाठी चांगली मानली जाते. त्यात अँटीऑक्सिडंट पोषक घटक आढळतात, जे पचनाच्या समस्या दूर करण्यास मदत करतात.
गूळ
थंड पाण्यात थोडा गूळ घालून तसेच ठेवा. काही वेळाने गुळाचे पाणी प्या. किंवा जेवणानंतर गुळाचा एक छोटा तुकडा खा. यामुळे गॅस आणि अॅसिडिटीची समस्याही कमी होऊ शकते.
तुळस
तुळशीची पाने धुवून चाऊन खा किंवा एक कप पाण्यात तुळशीची पाने टाकुन ते पाणी चांगले उकळवा आणि गरम चहासारखे हळूहळू प्या.
लिंबू पाणी
एका ग्लास कोमट पाण्यात लिंबू घालून ते प्यायल्याने गॅस आणि अॅसिडिटीची समस्याही कमी होऊ शकते. लिंबू पाणी पोटासाठी फायदेशीर आहे.
बदाम
कच्चे बदाम खाल्ल्यानेही तुम्हाला या समस्येपासून आराम मिळू शकतो. मूठभर बदाम आणि काही केळी एकत्र खाल्ल्याने गॅस आणि अॅसिडिटीची या पोटाच्या समस्या दूर होतात.
अॅसिडिटीपासून दीर्घकालीन आराम मिळवण्यासाठी, तुम्ही अँटासिड्स देखील घेऊ शकता, जे दूकानंमध्ये देखील उपलब्ध आहेत. हे पोटातील आम्ल कमी करण्यास मदत करते आणि आम्लतेच्या लक्षणांपासून त्वरित आराम देते.
आहार आणि जीवनशैलीत बदल करा
तुम्हाला जर वारंवार अॅसिडिटी होत असेल तर हे नियंत्रित करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत आणि आहारात काही बदल करावे लागतील. तुम्ही असे पदार्थ टाळावेत जे विशेषतः अॅसिडिटीची समस्या निर्माण करू शकतात, जसे की तळलेले पदार्थ, जास्त फॅटयुक्त गोड पदार्थ आणि मसालेदार पदार्थ. यामध्ये होळीसाठी खास पदार्थांचाही समावेश आहे. याशिवाय पुरेसे पाणी प्या. चांगली झोप घ्या आणि थोडा व्यायाम करा. जर तुमची लक्षणे कायम राहिली किंवा तुम्हाला वारंवार आम्लपित्त होत असेल तर डॉक्टरांना भेट द्या.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)