गुलाबाच्या पाकळ्यांचा करा ‘असा’ वापर, मिळेल गुलाबासारखी टवटवीत त्वचा
गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्यांचा तुम्ही फेसपॅक तयार करण्यासाठी वापर करू शकता. त्या त्वचा सुधारण्याचे काम करतात.
नवी दिल्ली : गुलाबाचे फूल (rose)सर्वांनाच आवडते. त्याचे विविध रंग आणि सुगंध आपले मन मोहून घेतात. गुलाबाचा वापर केवळ पूजेसाठी आणि केसांत माळण्यासाठीच नव्हे तर सौंदर्यप्रसाधनांमध्येही केला जातो. गुलाबपाणी (rose water) अनेक ठिकाणी वापरले जाते. तसेच गुलाबाच्या पाकळ्याही सौंदर्यप्रसाधन म्हणून वापरता येतात. गुलाबाच्या पाकळ्या (rose petals for skin) त्वचेसाठीही वापरतात. या पाकळ्यांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. तसेच अँटी ऑक्सिडंट गुणधर्म आहेत. ते त्वचेचे फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीपासून संरक्षण करण्यास मदत करतात. ते मुरुमे आणि फोड सारख्या समस्या टाळण्यास मदत करतात. या पाकळ्या तुम्ही त्वचेसाठी अनेक प्रकारे वापरू शकता. त्यांच्या वापराने चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यास मदत मिळते.
गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये लिंबू, दूध आणि मध यांसारख्या अनेक घटकांचे मिश्रण करून तुम्ही ते वापरू शकता. या पाकळ्यांचा वापर करून फेसपॅक कसा बनवावा ते जाणून घेऊया.
गुलाब आणि लिंबू
गुलाबाच्या पाकळ्या नीट धुवून घ्या. नंतर त्या बारीक चुरून त्याची पेस्ट बनवून घ्या. या पेस्टमध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस घाला. हा पॅक चेहरा आणि मानेवर लावा. 15 ते 20 मिनिटे त्वचेवर राहू द्या. यानंतर त्वचा साध्या पाण्याने धुवा. हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता. या फेसपॅकमुळे डाग दूर होण्यास मदत होईल.
गुलाब आणि दूध
ताज्या गुलाबाच्या पाकळ्या घ्या. त्या स्वच्छ धुवून बारीक करून घ्या व त्यामध्ये थोडं थंड दूध घाला. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. 15 ते 20 मिनिटे त्वचेवर राहू द्या. यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता. चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यास मदत होईल. व त्याचा सुगंध मन मोहून घेईल.
गुलाब आणि कोरफड
एक गुलाब घ्या. त्याच्या पाकळ्या बारीक करून पेस्ट बनवा. त्यात 1 ते 2 चमचे कोरफडीचे जेल टाका. नीट मिक्स करून ते मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा. 15 ते 20 मिनिटे त्वचेवर राहू द्या. यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 3-4 वेळा वापरू शकता. नियमित वापराने फरक दिसून येईल.
गुलाब आणि मध
एका भांड्यात गुलाबाच्या पाकळ्या बारीक करून त्याची पेस्ट बनवा. त्यात एक चमचा मध घाला. दोन्ही नीट मिसळा आणि चेहरा आणि मानेला लावा. 10 ते 15 मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता. हा फेस पॅक तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यास मदत करेल.