Skin Care : होळीच्या रंगामुळे त्वचा झाली लालेलाल ? या उपायांनी मिळेल त्वरित आराम
होळी हा आनंदाचा आणि रंगांचा सण समजून साजरा केला जातो. यावेळी सर्वजण उत्साहात रंग खेळतात. पण बऱ्याच जणांना नंतर रंगाचा त्रास होतो, त्वचेवर त्यामुळे पुरळ उठतात. यापासून वाचायचं असेल तर काही टिप्स फॉलो करू शकता.
होळी पौर्णिमा आणि रंग खेळणं हे सर्वांनाच आवडतं. देशभरात हा सण उत्साहाने साजरा होतो. होळीच्या रंगात भिजणं बहुतेक लोकांना आवडतं. पण त्यानंतर बऱ्याच जणांना त्वचेवरील रंग काढताना नाकीनऊ येतात. बाजारात मिळालेले रंग इतके पक्के असतात जे अंगावरून सहाजसहजी निघत नाहीत.ते खूप अवघड होतं. तसेच हे रंग केमिकलयुक्त असल्यामुळे त्यामुळे आपल्या त्वचेला हानीदेखील पोहोचते.या रंगांमुळे त्वचेवर पुरळ उठणे, त्वचा लाल होणे असा त्रास होऊ शकतो. अशावेळी आपल्या घरातील काही पदार्थ वापरून या त्रासापासून मुक्ती मिळवू शकता.
ज्या रंगांमुळे आपल्या त्वचेला हानी पोहोचणार नाही, अशा रंगाचा वापर करण्याचा प्रयत्न करावा. मात्र रंग टाळणं कठीण होऊ शकतं. होळी खेळल्यानंतर त्वचेवर पुरळ, लालसरपणा आणि जळजळ असा त्रास होत असेल तर यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही काही टिप्स अवलंबू शकता.
नारळाचे तेल किंवा साधं तूप
रंग काढून टाकल्यानंतर खोबरेल तेल किंवा तुपाने चेहऱ्याला मालिश करा. यामुळे तुम्हाला पुरळ आणि जळजळ यापासून बराच आराम मिळेल. खोबरले तेल किंवा तूप हे तुमची त्वचा हायड्रेट करतं आणि त्वचा निस्तेज किंवा कोरडी होण्यापासून रोखतं.
कोरफडीची कमाल
कोरफड आपल्या त्वचेसाठी किती फायदेशीर आहे हे बहुतेकांना माहित आहे. रंगांमुळे त्वचेला खाज सुटली किंवा लालसरपणा जाणवत असेल कोरफडीचा ताजा रस लावा. यामुळे त्वचेच्या जळजळीपासून लगेच आराम मिळेल आणि लालसरपणाही कमी होईल.
दही आणि बेसनाचा फायदा होईल
त्वचेवरील रंग काढून टाकल्यानंतर जर जळजळ होत असेल तर बेसन, दही आणि कोरफड जेल मिसळून एक पेस्ट बनवा आणि त्वचेवर लावा. ही पेस्ट काही काळ तशीच राहू द्या आणि ७५ ते ८० टक्के सुकल्यानंतर साध्या पाण्याने त्वचा स्वच्छ करा. यामुळे त्वचेचा लालसरपणा आणि जळजळ कमी होईल आणि त्वचेवर उरलेला रंगही निघून जाईल आणि त्वचाही मुलायम होईल.
कोल्ड कॉम्प्रेसमुळे मिळेल आराम
रंग काढून टाकल्यानंतर जर पुरळ, मुरुम आलं असेल किंवा तसेच चेहऱ्यावर खाज येण्याची समस्या असेल तर कोल्ड कॉम्प्रेसमुळे तुम्हाला खूप आराम मिळेल. यासाठी तुम्ही बर्फाच्या पॅकने शेकू शकता. किंवा बर्फाचा तुकडा एका कपड्यात ठेवून प्रभावित भागावर लावू शकता. यामुळे फायदा होईल.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)