भिवंडी लोकसभा : भाजप खासदार कपिल पाटील यांची तयारी पूर्ण?
ठाणे : आगामी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठी राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघ जो मागील 30 वर्षांपासून अनुसूचित जमातीसाठी राखीव डहाणू लोकसभेचा भाग होता. 2009 मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर भिवंडी लोकसभा हा नव्याने खुल्या प्रवर्गाचा मतदारसंघ निर्माण झाला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत कपिल पाटील यांनी […]
ठाणे : आगामी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठी राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघ जो मागील 30 वर्षांपासून अनुसूचित जमातीसाठी राखीव डहाणू लोकसभेचा भाग होता. 2009 मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर भिवंडी लोकसभा हा नव्याने खुल्या प्रवर्गाचा मतदारसंघ निर्माण झाला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत कपिल पाटील यांनी इथून दणदणीत विजय मिळवला.
शहरीकरण झालेल्या कल्याण, भिवंडी या क्षेत्रासह शहापूर, मुरबाड, भिवंडी तालुक्यासह वाड्याकडील ग्रामीण भाग येत असल्याने येथील आगरी कुणबी समाजाचे प्राबल्य असलेला हा मतदारसंघ काँग्रेसकडून भाजपाने खेचून घेतला. ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपात दाखल झालेले कपिल पाटील यांनी काँग्रेस पक्षात दाखल झालेले कुणबी सेनेचे संस्थापक विश्वनाथ पाटील यांचा तब्बल 109450 मतांच्या फरकाने पराभव करत विजय मिळवला. तर मनसेचे सुरेश म्हात्रे हे 93647 मते मिळवत तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
यावेळच्या निवडणुकीत चित्र वेगळं असण्याची शक्यता आहे. 2014 ची निवडणूक भाजप आणि शिवसेनेने एकत्र लढवली. पण यावेळी युती होणार नसल्याचं सध्या तरी चित्र आहे. या लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा निवडणुका शिवसेना-भाजपानेच नव्हे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनीही स्वतंत्र लढविल्या. ज्यामधील मुरबाड, कल्याण पश्चिम, भिवंडी पश्चिम या तीन मतदारसंघात भाजप, भिवंडी ग्रामीण आणि भिवंडी पूर्वमध्ये शिवसेना, शहापूरमध्ये राष्ट्रवादी असे आमदार निवडून आले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीने सहा पैकी चार विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार कपिल पाटील यांनी आघाडी घेतली होती. तर अल्पसंख्यांक मतदारांची संख्या अधिक असलेल्या भिवंडी पूर्व आणि भिवंडी पश्चिम विधानसभा क्षेत्रात काँग्रेसने आघाडी घेतली होती.
भाजपा-शिवसेना यांच्यातील फिसकटलेल्या चर्चेमुळे विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढवली. त्यामध्ये शिवसेनेने बऱ्यापैकी मते मिळवली, तर जिल्हा परिषद आणि कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता हस्तगत केल्याने भाजपासमोर आव्हान उभे केलं. सरपंच ते जिल्हा परिषद अध्यक्ष हा सत्तेचा सोपान राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून चढलेले कपिल पाटील यांचा प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एमएमआरडीएकडून कोट्यवधी रुपये विकास कामांसाठी मंजूर करुन घेतले. त्यामुळे या निवडणुकीत कपिल पाटील यांचा कार्यकर्त्यांसोबत असलेला दांडगा जनसंपर्क, प्रशासनावर वर्चस्व ठेवत या बाबी त्यांच्यासाठी अनुकूल ठरताना दिसतात.
संभाव्य उमेदवार
अशा परिस्थितीत युतीतून फारकत घेतलेल्या शिवसेनेकडून ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील आणि जिल्हा परिषद सभापती सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे हे संभाव्य उमेदवार ठरू शकतात. प्रकाश पाटील यांनी भिवंडी ग्रामीण, शहापूर, मुरबाड विधानसभा क्षेत्रात चांगले संघटन उभे केले आहे. निष्कलंक व्यक्तिमत्व म्हणून त्यांची राजकारणात ओळख आहे. तर सुरेश म्हात्रे यांनी 2014 ची निवडणूक मनसेकडून लढवून आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला होता. पण ते अपयशी झाल्यानंतर पुन्हा शिवसेनेत प्रवेश करून जिल्हा परिषद सत्तेच्या माध्यमातून संपूर्ण लोकसभा क्षेत्रात त्यांनीही मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. तर काँग्रेसकडून पुन्हा एकदा माजी खासदार सुरेश टावरे हे प्रबळ दावेदार ठरू शकतात. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील राजकारणामुळे 2009 मध्ये प्रथम खासदार होऊनही त्यांना 2014 मध्ये उमेदवारी नाकारली. परंतु त्यांनी सध्या सर्वांशी जुळवून घेतल्याने आणि भिवंडी महापालिकेत काँग्रेसचे 47 नगरसेवक विजयी झाल्यानंतर पुन्हा एकादा सुरेश टावरे यांनी मोर्चे बांधणीस सुरुवात केली आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीतील चित्र
विधानसभा
1] शहापूर [ अ . जमाती ] पांडुरंग बरोरा [ राष्ट्रवादी काँग्रेस ]
2] भिवंडी ग्रामीण [ अ . जमाती ] शांताराम मोरे [ शिवसेना ]
3] भिवंडी पश्चिम महेश चौघुले [ भाजपा ]
4] भिवंडी पूर्व रुपेश म्हात्रे [ शिवसेना ]
5] मुरबाड किसान कथोरे [ भाजपा ]
6] कल्याण पश्चिम नरेंद्र पवार [ भाजपा ]
विद्यमान खासदारांसाठी जमेचू बाजू काय?
शहरी क्षेत्रासोबतच ग्रामीण भागाच्या समस्या वेगवेगळ्या असून महानगरपालिका क्षेत्रातील समस्या त्याहून वेगळ्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर भिवंडी लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर अजूनही मूलभूत सुविधांचा अभाव आहे. 2014 च्या मोदी लाटेनंतर येत्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पाच वर्षात केलेले कार्य जनतेपर्यंत पोहचविण्यात भाजपाचा उमेदवार यशस्वी ठरल्यास ही निवडणूक जिंकणे भाजपास सहज शक्य आहे. लोकसभेच्या ग्रामीण भागात शिवसेनेच्या संघटनेची ताकद लक्षणीय असून त्या संघटनाला भाजप खासदार कपिल पाटील हे कसा सुरुंग लावतात त्या सोबतच, भिवंडी पूर्व आणि भिवंडी पश्चिम या विधानसभा क्षेत्रात अल्पसंख्याक मतांची टक्केवारी कोणाला आघाडी मिळवून देते यावर येथील निवडणुकीचा निकाल अवलंबून असेल.
भिवंडी लोकसभा क्षेत्रातील भिवंडी या महत्वपूर्ण शहराची ओळख यंत्रमाग उद्योग नगरीमुळे मँचेस्टर म्हणून केली जाते. या शहरातील उद्योग वाढीसाठी आणि विकासासाठी केंद्र सरकारने विविध योजना जाहीर केल्या. परंतु प्रत्यक्षात त्याचा फायदा व्यापारी वर्गाला मिळाला नसून, खासदार कपिल पाटील यांनी आपली प्रतिष्ठा वापरत राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपये मतदारसंघातील विकासकामांसाठी उपलब्ध करून दिले. ही त्यांच्यासाठी जमेची बाजू असेल.
शहराचा विचार करता शहरातील मेट्रो प्रकल्प, रस्ते काँक्रिटीकरण यासाठी केलेले प्रयत्न बघत असतानाच राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम मागील दोन वर्षांपासून रेंगाळले असल्याने वाहतूक कोंडी, भिवंडी रेल्वे थेट मुंबईशी जोडण्यासाठी प्रयत्न अपुरे पडले असल्याचे सांगितले. तर शिवसेना-भाजप यांची युती होणार नसल्याने शिवसेना पक्षाकडून सुरेश म्हात्रे हे लढत देऊ शकतात. तर काँग्रेसकडून माजी खासदार सुरेश टावरे हे प्रबळ दावेदार असून या तिघांमध्ये लढत होण्याची चिन्हे स्पष्ट असल्याचं सांगितलं जातंय.
लोकसभा निवडणूक 2014 विधानसभानिहाय निकाल
विधानसभा भाजपा (युती) काँग्रेस मनसे
1] शहापूर [ अ . जमाती ] 53270 49809 22503
2] भिवंडी ग्रामीण [ अ . जमाती ] 85542 42473 27330
3] भिवंडी पश्चिम 40421 59562 07592
4] भिवंडी पूर्व 42398 61895 06895
5] मुरबाड 92422 52246 14048
6] कल्याण पश्चिम 97017 35635 15279
एकूण 411070 301620 93647
काँग्रेससाठी शहरात पोषक वातावरण
भिवंडी लोकसभा क्षेत्रातील भिवंडी पूर्व आणि भिवंडी पश्चिम या दोन मतदारसंघात मुस्लीम अल्पसंख्याक मतांचे प्रमाणे हे 60 टक्के असून त्यांचा मोदी विरोध सर्वश्रूत होता. 2014 मधील लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही या दोन विधानसभा क्षेत्रात काँग्रेसने मताधिक्य घेतलं. त्यानंतर भाजप सरकार सत्तेवर आल्याने अल्पसंख्याक समाजामध्ये भाजपा विरोधक म्हणून काँग्रेसचा पर्याय निवडून भिवंडी शहरात काँग्रेस पक्षाचे तब्बल 47 नगरसेवक निवडून आल्यामुळे शहरात काँग्रेसला पोषक वातावरण आहे.
प्रबळ दावेदार म्हणून ओळखले जाणारे सुरेश टावरे यांचा अल्पसंख्याक समाजाबरोबर असलेले सौहार्दपूर्ण संबंध यामुळे त्यांना पोषक वातावरण असून त्यांनी त्या दृष्टीने मोर्चे बांधणी सुरु केली आहे. भाजपा आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये असलेला पराकोटीचा विरोध भिवंडी तालुका, शहापूर, मुरबाड या भागात जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्त वाढला असून, भविष्यात युती झाली तरी खासदार कपिल पाटील यांनी ज्या पद्धतीने शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांना डिवचले आहे त्याचा वचपा काढण्यासाठी युतीचे काम प्रामाणिकपणे करणार नसल्याची खात्री आहे. त्यामुळे भाजपाचे खासदार कपिल पाटील यांना नव्या-जुन्या भाजप कार्यकर्त्यांची मोट बांधून स्वतःच्या सामर्थ्यावर या निवडणुकीत झोकून द्यावे लागेल.
शहापूर या आदिवासी तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात बिगर आदिवासी समाजास नोकरीतील आरक्षण नसणे, तालुक्यात मुंबई आणि इतर महानगरी पाण्याची तहान भागविणारे धरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तालुक्यातील आजही असंख्य गावे-वाड्या पाण्यापासून वंचित आहेत. मुरबाड विधानसभा क्षेत्रात सहभाग असलेल्या बदलापूर नगरपालिकेचा समावेश होत असल्याने तेथील उपनगरीय रेल्वेने जोडल्या जाणाऱ्या शहरातील समस्या आजही प्रलंबित आहेत.
संबंधित बातम्या :