रावेर लोकसभा : रक्षा खडसेंना यावेळीही ‘नो चॅलेंज’
जळगाव : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. जळगाव जिल्यातील रावेर, जळगाव लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापायला लागलंय. गेल्या 15 वर्षांपासून या रावेर मतदारसंघात भाजप-राष्ट्रवादी अशी सरळ लढत होत असून दोन पंचवार्षिकपासून या मतदारसंघात भाजपचा उमेदवार निवडून येत आहे. तसेच रावेर लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला असून ही जागा काँग्रेसकडे घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. […]
जळगाव : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. जळगाव जिल्यातील रावेर, जळगाव लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापायला लागलंय. गेल्या 15 वर्षांपासून या रावेर मतदारसंघात भाजप-राष्ट्रवादी अशी सरळ लढत होत असून दोन पंचवार्षिकपासून या मतदारसंघात भाजपचा उमेदवार निवडून येत आहे. तसेच रावेर लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला असून ही जागा काँग्रेसकडे घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. या रस्सीखेचमुळे या मतदारसंघात चुरस निर्माण झाली आहे.
गेल्या महिन्यात फैजपूर येथे झालेल्या अधिवेशनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तसे संकेत दिल्याने माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी तयारी सुरु केली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी रावेर मतदारसंघाची जागा काँग्रेसला मिळावी म्हणून प्रयत्न केले. मात्र जागा न सुटल्याने त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. भाजपतर्फे खासदार रक्षा खडसे यांचे नाव निश्चित मानले जात असले तरी जळगाव जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यातील मत आणि मनभेद सर्वश्रुत आहेत. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते गटबाजीत विभागले गेले असल्याचे, पक्षाचे नेतेही आता उघडपणे मान्य करतात.
आगामी लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील या लोकसभा मतदारसंघात भाजपला अंतर्गत कलहाला सामोरे जावेच लागणार आहे. खास करून रावेर लोकसभा मतदारसंघात दोन्ही नेत्यांचे विधानसभा मतदारसंघ येत असल्यामुळे भविष्यात हा वाद अधिक विकोपाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु गिरीश महाजन यांनी उघडपणे मान्य केले की साधना महाजन या खासदारकीच्या रिंगणात नसल्याने आता अंतर्गत कलहाचा प्रश्न थोडा दूर झाला आहे.
जळगाव लोकसभेच्या तुलनेत रावेर लोकसभा मतदारसंघ म्हणजे भाजपासोबत एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु तिकीट वाटपात राजकीय कुरघोडी झाल्यास खडसेंची भूमिका काय असू शकते? हे देखील या निवडणुकीत महत्त्वाचे ठरेल. रावेर लोकसभा मतदारसंघ लेवा पाटीदार बहुल असल्यामुळे अनेक पंचवार्षिकपासून हा मतदार संघ लेवा समाजाकडेच राहिलेला आहे. म्हणूनच खडसे यांची आजही या मतदार संघावर एकहाती पकड आहे. राजकीय बलाबल लक्षात घेता, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या तुलनेत या मतदारसंघात भाजप मजबूत आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघामधील प्रमुख समस्या
रावेर मतदारसंघातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बोदवड तालुक्यातील गावांना पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे. या मतदारसंघात रस्त्यांच्या समस्या खूप मोठ्या आहेत. रस्ते खराब असून नवीन रस्त्यांचं बांधकाम झालेलं नाही. भुसावळ येथील 70 वर्षांपासून रेल्वेच्या आवारात लोक राहत होते. ते अतिक्रमण काढल्याने शेकडो नागरिक बेघर झाले. त्यांचा पुनर्वसनाचा मुद्दा खूप मोठा आहे. रोजगाराचा प्रश्न तर कायम आहे.
लोकसभा 2014 मध्ये प्रथम मताची आकडेवारी
रक्षा खडसे, भाजप – 6 लाख 05 हजार 452
मनीष जैन, राष्ट्रवादी काँग्रेस – 2 लाख 87 हजार 384
राजीव शर्मा, आप – 3 हजार 756
दशराम भांडे – 29 हजार
उल्हास पाटील – 21 हजार 332
रावेरमधील विधानसभा मतदारसंघातले आमदार
चोपडा – चंद्रकांत सोनवणे, शिवसेना
रावेर – हरिभाऊ जावळे, भाजप
भुसावळ – संजय सावकारे, भाजप
जामनेर – गिरीश महाजन, भाजप
मुक्ताईनगर – एकनाथ खडसे, भाजप
मलकापूर – चेनसुख संचेती, भाजप
एकंदरीतच या विधानसभा मतदारसंघात भाजपचे सहापैकी पाच आमदार आहेत. शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही भाजपची सत्ता आहे. एकनाथ खडसेंसारखा तळागाळापर्यंत पोहोचलेला नेता भाजपकडे आहे. खडसेंची पक्षावर नाराजी असली तरी याचा फटका ते निवडणुकीत बसू देणार नाहीत. कारण, आपण उभं आयुष्य भाजपसाठी वाहिल्याचं त्यांनी अनेकदा बोलून दाखवलंय.