अकोला लोकसभा मतदारसंघ : अकोला लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 60 टक्के मतदानाची नोंद झाली. अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार संजय धोत्रे, भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून काँग्रेसचे हिदायत पटेल अशी तिरंगी लढत होती. मात्र ‘बिग फाइट’ ही संजय धोत्रे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातच झाली. अखेर भाजपचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांनीच बाजी मारली.
अकोला लोकसभा मतदारसंघात
पक्ष | उमेदवार | निकाल |
---|---|---|
भाजप/शिवसेना | संजय धोत्रे (भाजप) | विजयी |
काँग्रेस/ राष्ट्रवादी | हिदायत पटेल (काँग्रेस) | पराभूत |
अपक्ष/इतर | प्रकाश आंबेडकर (VBA) | पराभूत |
यंदा लोकसभेच्या रिंगणात एकूण अकरा उमेदवार होते. अन्य घटकही प्रभाव पाडू शकतील अशी स्थिती नव्हती. त्यामुळे धोत्रे हॅट्ट्रिक साधतात की, आंबेडकरांचा नव्याने स्थापन केलेला वंचित बहुजन आघाडी फॉर्म्युला काही जादू करतो याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं.
एकेकाळी अकोला लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. येथून माजी केंद्रीय मंत्री वसंत साठे, मधुसुदन वैराळे विजयी होत असत. परंतु 1989 नंतर येथे भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले. हा प्रभाव अजून कायम आहे. उत्तर प्रदेशात मायावतींनी राबविलेल्या ‘सोशल इंजिनीअरिंग’चा खूप गाजावाजा झाला होता. हा प्रयोग त्याआधीही अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात भारिप-बहुजन महासंघाच्या माध्यमाने राबविला होता. त्यात त्यांना बऱ्यापैकी यशही मिळाले होते. जिल्हा परिषदेवर ताबा मिळाला. विधानसभेत पक्षाचे आमदारही पाठविता आले. परंतु या प्रयोगाने काँग्रेसचा सफाया झाला.
जिल्हा परिषदेवर सध्या भारिप-बहुजन महासंघाचीच पकड आहे. शिवाय पक्षाच्या विचाराचे एक आमदार होते,ते आता बुलढाणा येथील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते. 2014 च्या लोकसभेत आंबेडकरांनी तगडी फाईट दिली होती.पण आंबेडकरांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. पण यावेळी परिस्थिती थोडी वेगळी होती. निवडणुकीपूर्वी मोदी लाट ओसरत असल्याची चर्चा होती,पण मतदानानंतर हे चित्र वेगळे पाहायला मिळाले. एक्झिट पोलची आकडेवारी पाहिली तर भाजप पुन्हा सत्तेत येऊ शकते असा अंदाज वर्तविण्यात आला.
भाजपचे उमेदवार संजय धोत्रे चौथ्यांदा विजय मिळवणार असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी बांधला. 2014 च्या निवडणुकीत ज्याप्रमाणे हॅट्रिक करत भाजपने गड राखला तोच गड यावेळी राखणार असल्याची चर्चा अकोल्यात रंगली.