Nashik: एकाच दिवशी 20 लाखांचे वीजबिल भरले; 19 शेतकऱ्यांना थकबाकीतून मुक्त होण्याचा मान
कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त होण्यासाठी थकबाकीच्या रकमेत सुमारे 66 टक्के सूट मिळविण्याची संधी महा कृषी ऊर्जा अभियानाच्या माध्यमातून उपलब्ध आहे.
नाशिकः महावितरणच्या महा कृषी ऊर्जा अभियानात जवळपास 66 टक्के सूट मिळविण्याच्या सुवर्णसंधीचा लाभ घेत धुळे जिल्ह्यातील 19 शेतकऱ्यांनी एकाच दिवशी 20 लाखांचे वीजबिल भरून कृषिपंपांच्या थकबाकीतून मुक्त होण्याचा मान मिळविला. महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांच्या हस्ते या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. हुमणे यांनी धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी भेट देऊन वीजबिल थकबाकी वसुलीसह महावितरणच्या कामकाजाचा आढावा घेतला. कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त होण्यासाठी थकबाकीच्या रकमेत सुमारे 66 टक्के सूट मिळविण्याची संधी महा कृषी ऊर्जा अभियानाच्या माध्यमातून उपलब्ध आहे. या योजनेत सहभागी होऊन कृषिपंपाचे वीजबिल कोरे करावे तसेच चालू वीजबिलांचा नियमित भरणा करावा, असे आवाहन करून बिल भरण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद देत 19 शेतकऱ्यांनी एकाच दिवशी 19 लाख 41 हजार रुपयांचे वीजबिल भरले आणि थकबाकीमुक्त होण्याचा मान मिळवला.
या शेतकऱ्यांचा पुढाकार
साक्री तालुक्यातील शांताराम देवरे, योगेंद्र देशपांडे, अण्णा दुमाले, वसंतराव अहिरराव, जयसिंग राऊत, हेमलता शिंदे, उत्तमबाई कोकणी, लीलाबाई पाटील, नीना पाटील, विजय पाटील, चंद्रशेखर जयवंत, शिरपूर तालुक्यातील विश्वनाथ गुजर, लखेसिंग राजपूत, उज्ज्वला ठाकूर, यमुनाबाई पाटील, खटाबाई पाटील, शिंदखेडा तालुक्यातील मंजुळाबाई भागवत, कमलबाई चौधरी तर धुळे तालुक्यातील वेडू धवलू या कृषिपंप ग्राहकांनी वीजबिल भरले. या सर्व ग्राहकांचा मुख्य अभियंता कैलास हुमणे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महावितरणचे धुळे मंडलाचे अधीक्षक अभियंता पंकज तगलपल्लेवार, धुळे ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय भामरे, दोंडाईचा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र जोशी, कार्यकारी अभियंता (प्रशासन) भीमराव मस्के आदी उपस्थित होते.
33 टक्के निधी विकासकामांसाठी
मुख्य अभियंता हुमणे म्हणाले की, कृषिपंप वीजबिलांच्या वसुलीतून 66 टक्के कृषी आकस्मिक निधी म्हणजेच प्रत्येकी 33 टक्के निधी ग्रामपंचायत व जिल्हास्तरावर विकास कामांसाठी खर्च करण्यात येत आहे. हा निधी त्या-त्या ग्रामपंचायत व जिल्ह्याच्या क्षेत्रातच स्थानिक वीजयंत्रणेच्या पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी खर्च करण्यात येत आहे. स्वतंत्र खात्यात जमा होणाऱ्या निधीतून नवीन उपकेंद्र, नवीन रोहित्र व क्षमतावाढ तसेच नवीन वीजजोडण्या यासह वीज वितरण व उपकेंद्रातील विविध यंत्रणेच्या पायाभूत सक्षमीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे कृषिपंपांसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांना आणखी दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या ऐतिहासिक योजनेत सहभागी होऊन कृषिपंपाचे वीजबिल कोरे करावे तसेच चालू वीजबिलांचा नियमित भरणा करावा, असे आवाहन त्यांनी केले.
मुख्य अभियंत्यांचा कर्मचाऱ्यांशी संवाद
मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी धुळे येथे महावितरणचे अभियंते व तांत्रिक कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला. कृषिपंप ग्राहकांसह सर्व ग्राहकांना दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठा करावा. महावितरणची खालावलेली आर्थिक परिस्थिती पाहता वीजबिलांच्या थकबाकी वसुलीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे विजेच्या प्रत्येक युनिटच्या वसुलीसाठी प्रयत्न करावे. तसेच गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना कृषिपंप धोरणाचे महत्त्व पटवून द्यावे, असे निर्देश हुमणे यांनी यावेळी दिले. यावेळी जवळपास १०० तांत्रिक कर्मचारी उपस्थित होते.
VIDEO : Pune | CNG Price Hike : पुण्यामध्ये सीएनजीच्या दरात वाढ, किलोमागे मोजावे लागणार इतके रूपये – tv9#cng #CNGprice #Hike #Pune pic.twitter.com/cRg4CZkkRJ
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 18, 2021
इतर बातम्याः
Nashik: स्वयंरोजगारासाठी 50 लाखांपर्यंत कर्ज हवंय; जाणून घ्या योजना, पात्रता अन् कुठे साधावा संपर्क!
Nashik: 80 ठिकाणांची नावे बदलणार; नेमकं काय प्रकरण, घ्या जाणून!