नागपूर: एकाचवेळी 16 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण (Coronavirus) झाल्यामुळे नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय सील करण्यात आले आहे. नागपूर महापालिकेकडून मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. (16 people in college found coronavirus positive seal college campus)
कोरोनाची लागण झालेले सर्वजण महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचारी आहेत. या सगळ्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असल्यामुळे त्यांची चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर नागपूर महापालिकेने तात्काळ पावले उचलत महाविद्यालय सील केले.
लक्ष्मीनगर झोनचे सहाय्यक आयुक्त गणेश राठोड यांनी महाविद्यालया समोर प्रतिबंधित क्षेत्र असल्याचा फलक लावला आहे. सामूहिक प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने आठवडाभरासाठी डॉ. आंबेडकर कॉलेजचा परिसर सील करण्यात आला आहे. तसेच महाविद्यालय प्रशासनाला परिसर सॅनिटाइज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाविद्यालयातील कोरोनाबाधितांवर विविध ठिकाणी उपचार सुरु आहेत.
राज्यात कोरोना संसर्गाने नव्याने डोके वर काढले आहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, नागपूर अशा महत्त्वाच्या शहरांत कोरोनाग्रस्तांची संख्या लक्षणीयरित्या वाढत आहे. आजसुद्धा (23 फेब्रुवारी) कोरोनाग्रस्तांची संख्या हजारोंनी वाढली असून कालच्या तुलनेत आज 1000 नव्या रुग्णांची भर पडली आहे. म्हणजेच कालच्या तुलनेत कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ झाली आहे. राज्यासाठी ही चिंतेची बाब ठरत आहे.
मंगळवारी दिवसभरात कोरोनाचे 6218 नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तसेच, 5869 कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.96 टक्क्यांवर आहे. तर दिवसभरात 51 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.45 टक्क्यांवर आहे. अशाच प्रकारे कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली, तर आगामी काळात हा मृत्यूदर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 21 लाख 12 हजार 312 वर पोहोचला आहे. काल राज्यात 5 हजार 210 कोरोनारुग्णांची नोंद झाली होती. तर काल दिवसभरात 18 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता.
संबंधित बातम्या:
‘मास्क’चा वापर टाळणाऱ्या 22 हजार 976 नागरिकांना एका दिवसात तब्बल 46 लाख रुपयांचा दंड
एकीकडे कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ, दुसरीकडे नियमांची पायमल्ली; जळगावात मनपाकडून डी मार्टला टाळे
(16 people in college found coronavirus positive seal college campus)