बेफाम वाहनचालकांनो सावधान, परिवहन विभागाच्या ताफ्यात 187 इंटरसेप्टर वाहने दाखल
महामार्गांवर बेफाम वाहन चालकांमुळे अपघाती मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. परिवहन विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत वाहनांच्या वेगाला लगाम लावण्यासाठी 187 स्पीड गन इंटरसेप्टर व्हेईकल खरेदी केल्या आहेत. या स्पीड गन इंटरसेप्टर व्हेईकल महामार्गांवर तैनात केल्या जाणार आहेत. त्यामुळे वाहनांच्या वेगावर पाळत ठेवणे शक्य होणार आहे.
मुंबई | 13 मार्च 2024 : हायवेवर बेफामपणे वाहन चालविणाऱ्यांनो सावधान आता परिवहन विभागाच्या ताफ्यात 187 इंटरसेप्टर वाहने दाखल झाली आहेत. ही वाहने परिवहन विभागाच्या वायुवेग पथकात समाविष्ट केली जाणार आहेत. या वाहनांमध्ये वाहनांच्या वेगावर नजर ठेवणाऱ्या ‘स्पीड गन’ देखील समाविष्ट असणार आहेत, त्यामुळे महामार्गांवर बेफामपणे वाहने चालविणाऱ्यांनी सावध रहाणे अत्यंत गरजेचे आहे. या 187 इंटरसेप्टर वाहनांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखविला आहे. या वाहनांना विविध महामार्गांवर तैनात केले जाणार आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी मोलाची मदत मिळणार आहे.
राज्याच्या परिवहन विभागाच्या वायूवेग पथकात 187 इंटरसेप्टर वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. या वाहनांच्या मदतीने मुंबई ते पुणे एक्सप्रेस वे सह अन्य महामार्गांवर वाहतूकीला शिस्त लावण्याचे काम केले जाणार आहे. मरीन लाईन येथील पोलिस जिमखाना येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या 187 इंटरसेप्टर वाहनांनी हिरवा झेंडा दाखविला. या कार्यक्रमाला शिक्षण मंत्री दीपक केसरकर, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, सह परिवहन आयुक्त भरत कळसकर, अप्पर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील आदींसह परिवहन विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते. राज्यातील वाहनांची संख्या ही पाच कोटीहून अधिक झाली आहे. यातील 70 टक्के वाहने ही दुचाकी स्वरुपाची आहेत.
इंटरसेप्टर व्हेईकलची खरेदी
राज्यातील राष्ट्रीय आणि आंतर राज्यीय महामार्गांवर चारचाकी वाहनांकडून अनेकदा वेगमर्यादेचे उल्लंघन केले जाते. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळते. राज्यातील मुंबई-पुणे एक्सप्रेस वे अनेक मोठे अपघात वाहनांच्या वेग मर्यादांचे उल्लंघन केल्याने घडले आहेत. राज्यातील समृद्धी महामार्गावर देखील अनेक अपघात घडले आहेत. बेफान वाहनचालकांना अंकुश लावण्यासाठी परिवहन विभागाच्या वायूवेग पथकांत सर्व तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा इंटरसेप्टर व्हेईकल दाखल झाल्या आहेत. या इंटरसेप्टर गाड्यांमध्ये स्पीडगन सह सर्व सोयीसुविधा उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे वाहनांच्या वेगावर अंकुश ठेवण्यासह अपघात स्थळी मदत पोहचविण्यासाठी तसेच तस्करी रोखण्यासाठी या वाहनांचा उपयोग होणार आहे. या स्पीडगनच्या खरेदीसाठी 57 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या स्कीम फॉर स्पेशल असिस्टंस टू स्टेट फॉर पॅपिटल इन्व्हेस्टमेंट अंतर्गत या इंटरसेप्टर व्हेईकल खरेदी केल्या आहेत.