Chhagan Bhujbal : ‘या’ 4 कारणांमुळे छगन भुजबळांचं मंत्रीपद हुकलं ? inside स्टोरी काय ?
महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळ यांचा समावेश नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पक्षांतर्गत वाद आणि राजकीय समीकरणे यामुळे त्यांना मंत्रीपद मिळाले नाही, असे सूत्रांनी सांगितले आहे. भुजबळ यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. मात्र त्यांचं मंत्रीपद का हुकलं याची प्रमुख कारणं समोर आली आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी रविवारी मोठ्या थाटात पार पडला. त्यामध्ये अनेकांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मातर मंत्रीपद मिळालं नाही. तेव्हापासूनच भुजबळ नाराज असून त्यांनी उघडपणे त्यांची नाराजी व्यक्तही केली. जहाँ नहीं चैंना वहाँ नहीं रहना म्हणत त्यांनी मनातील खदखद व्यक्त करत वेगळे होण्याचेही संकेत दिले. पक्षात एकाधिरशाही सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
तर काल नाशिकमध्ये पार पडलेल्या समता परिषदेच्या मेळाव्यातही भुजबळ यांनी त्यांच्या मनातील सल स्पष्टपणे बोलून दाखवली. काल त्यांनी रणशिंगही फुंकले. मंत्रिपदाच्या विस्तारानंतर अस्वस्थ असलेल्या छगन भुजबळ यांनी बुधवारी मोठा निर्णय जाहीर केला. आपण संपूर्ण राज्यात जाणार आणि ओबीसींचा एल्गार पुकारणार आहे, असे भुजबळांनी जाहीर केले. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
मात्र आता याचदरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे. छगन भुजबळ यांना मंत्री पदापासून दूर का ठेवलं याची कारणंच समोर आली आहेत. पक्षांतर्गत नाराजीमुळेच भुजबळ हे मंत्रीपदापासून दूर राहिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भुजबळांचं मंत्रीपद का हुकलं ?
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असलेले, पक्षफुटीनंतर अजित पवारांसोबत ठाम उभे असलेले छगन भुजबळ यांना महायुतीच्या सरकारमध्ये यंदा मात्र मंत्रीपद मिळालं नाही. त्यांचं मंत्रीपद का हुकलं याची चार प्रमुख कारणं समोर आली आहेत. पक्षांतर्गत नाराजीमुळेच भुजबळ हे मंत्रीपदापासून दूर झाल्याचे बोलले जात आहेत.
काय आहेत कारणं ?
१) निवडणुकीमध्ये भुजबळ यांनी आपल्याच पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात काम केल्यामुळे पक्षातील लोक भुजबळ यांच्यावर नाराज होते.
२) छगन भुजबळ यांनी बळजबरीने मुलासाठी (पंकज भुजबळ) विधानपरिषद आमदारकी पदरात पाडून घेतली. त्यांचं हे कृत्य पक्षातील वरिष्ठ नेत्यांना आवडलं नाही अशी माहिती सूत्रांनी दिली.
३) तर छगन भुजबळ यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनी पक्षाविरूद्ध जाऊन महायुतीविरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळेही रोष व्यक्त होतोय अशी माहिती समोर आली.
४) तसेच नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदारानी छगन भुजबळ यांना मंत्रिपद देऊ नका अशी अजित पवार यांच्याकडे विनंती केली. भुजबळांना जर मंत्रीपद दिलं तर नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदार एकत्रित राजीनामा देतील असा इशाराही देण्यात आला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
आता छगन भुजबळ हे जरी नाराज असले तरीही त्याबद्दल पक्षाकडून कोणीही भूमिका मांडू नये, अशा सूचना देण्यात आली आहे. तसेच छगन भुजबळ यांच्या नाराजीबद्दल पक्षातील वरिष्ठ नेतेच थेट बोलतील, अशी माहितीही पक्षाकडून देण्यात आल्याचे समजते .