राज्यात उद्या बुधवार दि. 19 जूनपासून पोलीस भरती प्रक्रीया सुरु होणार आहे. राज्यभरातील लाखो उमेदवार गेल्या काही महिन्यांपासून या पोलीस भरती 2024 पदांसाठी जोरदार सराव करीत आहेत. पोलिस भरती दरम्यान पाऊस आला तर दुसऱ्या तारखा जाहीर केल्या जातील असे सरकारने म्हटले आहे. उत्तर प्रदेशात पोलिस भरती परीक्षेत मोठा घोटाळा झाला होता. त्याचाही फटका भाजपाला बसला असे म्हटले जाते. परंतू राज्यातील पोलिस भरती प्रक्रीयेची मैदानी चाचण्यांना सुरुवार उद्यापासून होत आहे. पोलिसांनी कोणत्याही आमीषाला बळी पडू नये, ही पोलिस भरती प्रक्रीया अत्यंत पारदर्शकपणे पार पाडली जाणार असल्याचे म्हटले आहे. तसेच सर्व प्रक्रिया सीसीटीव्ही फुटेजच्या निगराणीत होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
या पोलिस भरतीत 17,471 जागांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज आले आहेत. तर बँड्समन पदासाठी 41 जागा असून त्यासाठी 32,026 जणांनी अर्ज केले आहेत. तुरुंगविभागातील शिपाई ( प्रिझन कॉन्स्टेबल ) या पदाच्या 1800 जागांसाठी 3,72,354 अर्ज आल्याने एका जागेसाठी तब्बल 207 उमेदवारांमध्ये स्पर्धा आहे. चालक पदासाठी 1,686 जागा असून त्यासाठी 1 लाख 98 हजार 300 अर्ज आले आहेत. सर्वाधिक कॉन्स्टेबल पदाच्या 9,595 जागांसाठी 8 लाख 22 हजार 984 अर्ज आले आहेत. म्हणजे एका जागेसाठी 86 उमेदवारांमध्ये स्पर्धा आहे.
सांगलीत पोलीस भरतीत 40 पदासाठी 1750 अर्ज दाखल झाले आहे. 19 जूनपासून सलग तीन दिवस पोलीस भरती प्रक्रिया होणार असल्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची सांगितले आहे. सांगलीतील पोलीस मैदानावर पोलीस भरती प्रक्रिया पार पडणार आहे यातील 27 पोलीस शिपाई आणि 13 चालक पोलीस अशा या पोलीस पदांसाठी भरती असून यासाठी प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे .19 जूनपासून सलग तीन दिवस मैदाना चाचणी होणार आहे. पावसामुळे उमेदवारांचे मैदानी चाचणी रखडली तर त्यांची शारीरिक चाचणी पुन्हा घेण्यात येईल अशी माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे.
अमरावतीत 25 हजार 549 उमेदवार विविध पदांसाठी मैदानी चाचणी देणार आहेत. ज्यामध्ये 18 हजार 419 पुरुष आणि 7 हजार 130 महिलांचा समावेश आहे. शिपाई आणि चालक पदाकरिता ही चाचणी होणार आहे. अमरावतीचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी संपूर्ण मैदानाची पाहणी केली आहे.यादरम्यान कुठल्याही विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी देखील घेण्यात आली आहे. पोलीस भरती संदर्भात कुठल्याही प्रलोभनाला उमेदवारांनी बळी पडू नये असे आवाहन अमरावतीचे पोलिस अधिक्षक विशाल आनंद यांनी केले आहे.
परभणी जिल्हा पोलिस दलात शिपाई पदाच्या 111 जागांकरीता 6 हजार 464 तर चालकांच्या 30 पदांसाठी 4 हजार 540 अर्ज दाखल झाले आहेत. भरतीची प्रक्रिया वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत क्रिडा संकुलात उद्या 19 जून पासून सुरू होत आहे.
धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने 19 जून पासून 57 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी 2475 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यातील सर्व उमेदवारांना एसएमएस द्वारे सूचित करण्यात आले असून, जे उमेदवार उंची, छाती व कागदपत्रांमध्ये पात्र ठरतील त्यांचीच मैदानी चाचणी घेतली जाणार असून, मैदानी चाचणीमध्ये देखील ज्या उमेदवारांना 50 टक्के गुण प्राप्त होतील. त्यांनाच लेखी परीक्षेसाठी पात्र ठरविले जाईल असे देखील पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्पष्ट केले आहे.
लातुर जिल्हा पोलीस दलात 64 जागांसाठी पोलीस भरती घेण्यात येत आहे.शिपाई, चालक आणि बँडसमन या पदांसाठी ही भरती होणार आहे.19 जून रोजी ही भरती होणार आहे. पहाटे पाच पासून भरतीसाठी इच्छुक उमेदवारानी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आदित्य ठाकरे यांच्या एक्सवर शुभेच्छा –
महाराष्ट्र पोलीस दलासाठीची कित्येक दिवस रखडलेली पोलीस भरती प्रक्रिया उद्या सुरु होतेय.
१७,००० पदांसाठी १७ लाख ७६ हजार २५६ अर्ज आलेत. महाराष्ट्रातले युवक ह्या भरतीकडे अपेक्षेने पाहत आहेत.
परंतु ऐन पावसाळ्याच्या तोंडावर आणि काही भागात अजूनही उन्हाळ्याचा फटका बसत असताना ही भरती…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 18, 2024
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पोलीस भरतीबद्दल एक्सवर पोस्ट करीत काही भागात अजून पाऊस आलेला नसून प्रचंड ऊन असल्याने सरकारने योग्य काळजी घ्यावी असे म्हणत उमेदवारांना पोलीस भरतीतील परीक्षांबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.