जळगावमध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जळगावमध्ये शड्डू ठोकले आहे. भाजपने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचा पत्ता कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्यानंतर उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश करून त्यांचे सहकारी करन पवार यांना लोकसभेचं तिकीट मिळवून दिलं. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसलेला आहे. भाजपला जळगावात धोबीपछाड केल्यानंतर ठाकरे गट जळगावमध्ये भाजपला आणखी मोठं खिंडार पाडण्याच्या तयारीत आहे. भाजपच्या 30 नगरसेवकांवर ठाकरे गटाने जाळं फेकलं असल्यांचं उघड झालं आहे. एका फोटो समोर आल्याने जळगावत राजकीय भूकंप होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
उन्मेष पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर जळगावात जोर बैठका सुरू झाल्या आहेत. बंददाराआड या बैठका होत आहेत. अशाच एका बंददाराआड झालेल्या बैठकीचा फोटो व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या फोटोवरून ठाकरे गट जळगावात भाजपला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे. भाजपचा विद्यमान खासदार पक्षात घेतल्यानंतर आता ठाकरे गटाने महापालिकेतील भाजपचे नगरसेवक फोडण्यावर भर दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.
नगरसेवकांना तंबी
जळगावातील महापालिकेत लोकप्रतिनिधी असलेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर भाजपचे 30 पैकी जास्तीत जास्त नगरसेवक फोडण्याची मोठी जबाबदारी देण्यात आल्याची माहिती आहे. ठाकरे गट नगरसेवक फोडण्याच्या तयारीत असल्याची बातमी फुटली. त्यानंतर मंत्री गिरीश महाजनांनी तातडीने भाजपच्या सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांना पक्षातच राहण्याच्या सूचना दिल्याचं सांगितलं जात आहे. या बंद दाराआड झालेल्या बैठकीत महाजन यांनी नगरसेवकांना पक्ष सोडून न देण्याची तंबीही दिल्याचं सांगण्यात येतं.
मताधिक्य द्या, नाही तर…
यावेळी महाजन यांनी नगरसेवकांची झाडाझडती घेतल्याचंही सांगण्यात आलं आहे. प्रत्येक नगरसेवकांना मतांचं टार्गेट दिल्याचं बोललं जातंय. तुमच्या मतदारसंघातून मताधिक्य मिळालं तरच तुम्हाला महापालिकेचं तिकीट देऊ, नाही तर नाही. त्यामुळे तुम्हाला मताधिक्य द्यावच लागणार आहे, असा दमही महाजन यांनी नगरसेवकांना भरल्याचं सूत्रांनी सांगितलं.
निवडणुकीआधी भूकंप
ज्या वार्डातून मताधिक्य मिळणार नाही, त्या वॉर्डातील उमेदवार बदलणार अन् त्या नगरसेवकाला कामही मिळणार नसल्याचं महाजन यांनी या नगरसेवकांना सुनावल्याचं सांगण्यात येतं. महापौर पदाच्या निवडणुकीवेळी जशी दुसऱ्या पक्षात जावून इज्जत घालवली, तशी पुन्हा माझी इज्जत घालू नका, अशी महाजन यांच्याकडून नगरसेवकांची झाडाझडती करण्यात आली आहे, असं सूत्रांनी सांगितलं. तर, उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठाकरे गटाची आणि उन्मेष पाटील समर्थकांची बैठक झाली. त्यात जळगावचे भाजपचे नगरसेवक फोडण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या मतदानाआधीच जळगावात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.