नाशिक : नाशिक महानगर पालिकेच्या ( NMC ) माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून वॉटरग्रेस कंपनी स्वच्छतेचे काम करत आहे. शेकडो कर्मचारी नाशिक शहराची स्वच्छता वॉटरग्रेस ( Watergrace ) कंपनीच्या माध्यमातून केली जात आहे. मात्र, वॉटरग्रेस कंपनी आणि कर्मचारी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर हा वाद अधिकच चिघळला होता. त्यात मनसेच्या नेत्यांनी ( MNS Leader ) उडी घेतली होती. आता मात्र हा वाद अधिकच चिघळला असून 450 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याने आमरण उपोषण सुरू केले आहे.
नाशिक महानगर पालिकेच्या प्रवेशद्वारावर वॉटरग्रेस कंपनीच्या 350 कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
वॉटरग्रेस कंपनीकडून कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. त्यानंतर वॉटरग्रेस कंपनीचे कर्मचारी अधिकच आक्रमक झाले आहे. पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे यासाठी कर्मचारी यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहेत.
नाशिक महानगर पालिकेच्या राजीव गांधी भवन येथील प्रवेशद्वारावर हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यामध्ये महानगर पालिकेने हस्तक्षेप करून न्याय द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.
यापूर्वीही वॉटरग्रेस कंपनीवर कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूणच हा वाद मोठ्या प्रमाणात चिघळला आहे. नाशिक शहरात या आंदोलनामुळे अस्वच्छता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महानगर पालिकेचे कंत्राटदार असलेल्या वॉटरग्रेस कंपनीच्या संदर्भात आमरण उपोषण कर्मचारी करू लागल्याने नाशिकच्या महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष बाब म्हणजे हे आंदोलन मनसेच्या नेतृत्वात होत आहे.
शहरातील सफाई कर्मचाऱ्यांचा मुद्दा मनसेने हाती घेतला आहे. आमरण उपोषण करत आंदोलन सुरू झाले असले तरी येत्या काळात काय घडामोडी घडतात, पालिका याबाबत दखल घेते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
वॉटरग्रेस कंपनीच्या एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर मनसेचे नेते अविनाश जाधव नाशिकमध्ये आले होते. त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना मनसे तुमच्या पाठीशी असून येत्या काळात तुम्हाला अडचण आल्यास हाक मारा असे आवाहन करत मनसे पाठीशी राहील अशी भूमिका मांडली होती.
त्यानंतर सफाई कर्मचारी असलेल्या जवळपास 450 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याची माहिती समोर आली आहे. त्यावरुन सफाई कर्मचारी यांनी पालिकेच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषण सुरू केले त्यामध्ये मनसेने नेतृत्व करत भूमिका घेतली आहे.