शासनाचा गलथान कारभार…कोविडची मदत केली आणि…अधिकाऱ्यांची चौकशी सुरु झाली
नाशिकमध्ये कोरोनात मृत्यू झालेल्या 71 वारसांना दोनदा लाभ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
नाशिक : कोरोनाने मृत्यू (Corona Death) झालेल्यांच्या वारसांना महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Govermenet) 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची योजना राज्यात लागू केली होती. नाशिकमधून जवळपास 15 हजाराहून अधिक वारसांनी मदतीसाठी अर्ज केले होते. त्याची छाननी झाल्यानंतर अनेकांना त्याचा लाभ मिळाला आहे. मात्र, योजनेची अंमलबजावणी सुरु झाल्यापासूनच प्रशासनातील गलथान कारभार समोर येत होता. आता पुन्हा योजनेत रक्कम अदा करतांना गलथान कारभार समोर आला आहे. नाशिक मधील (Nashik) तब्बल 71 वारसांना दोनदा 50 हजार रुपये खात्यात जमा झाल्याचे समोर आले आहे. त्यावरून प्रशासनाच्या या गलथान कारभाराची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे.
कोविडमुळे मृत्यू झालेल्यांना 50 हजार रुपयांची सानुग्रह मदत दिली गेली असून त्याचा हजारो वारसांनी लाभ देखील घेतला आहे.
नाशिकमध्ये कोरोनात मृत्यू झालेल्या 71 वारसांना दोनदा लाभ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
71 जणांच्या खात्यात 50 हजार रुपये अधिकचे जमा झाल्याने प्रशासनाकडून जादाचे अनुदान परत घेण्याची कार्यवाही सुरु आहे.
आत्तापर्यंत 71 जणांपैकी 8 जणांनी प्रामाणिकपणा दाखवत 50 हजार रुपये परत केले असून प्रशासनाला सहकार्य केले आहे.
मात्र उर्वरित 63 जणांनी प्रशासनाला प्रतिसाद दिला नसून संबंधित वारसांना नोटीस बजावण्याच्या तयारीत आहे.
सानुग्रह अनुदान योजना राबवत असतांना एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती मृत्यू झाल्याने त्यांचीही नावे यादीत असण्याची शक्यता आहे.
एकूणच सानुग्रह अनुदान योजना सुरुवातीपासूनच गोंधळात असल्याने या प्रक्रियेवरून नाराजी व्यक्त होत असून त्रुटींबाबत अधिकचा शोध घेण्याचं काम प्रशासनावर आले आहे.
अनेकांना सानुग्रह अनुदान मिळण्यावरून त्रुटी आल्याने त्यांचे निरसन करण्यासही अधिकाऱ्यांच्याकडून मदत होत नसल्याचा आरोप यापूर्वी झाला होता.