जालना-बीड मार्गावर बस-ट्रकची धडक, भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू
अपघातावेळी बसमध्ये 25 ते 30 प्रवासी होते. अनेकांना गंभीर जखमा झाल्या असून स्थानिक नागरिकांनी जखमींना कसेबसे बाहेर काढत उपचारांसाठी अंबड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले
जालना ते बीड मार्गावर एका बस आणि मोसंबी वाहतूक करणाऱ्या ट्रकची धडक होऊन भीषण अपघात झालाय. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू असून जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. अंबड पासून 10 किमी वर हा अपघात झाला आहे. जालना-वडीगोद्री मार्गावर मठ तांडा येथे गुरूवारी सकाळी अपघात झाला.
मोसंबी नेणारा ट्रक आणि प्रवासी बस यांची मठ तांडा येथे समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की बसच्या आणि ट्रकच्या पुढच्या भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. ट्र्कमधील मोसंबीचा रस्त्यावर खच पडला होता. बसमधून अनेक प्रवासी बाहेर फेकले गेले. त्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
अपघातावेळी बसमध्ये 25 ते 30 प्रवासी होते. अनेकांना गंभीर जखमा झाल्या असून स्थानिक नागरिकांनी जखमींना कसेबसे बाहेर काढत उपचारांसाठी अंबड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, संबंधित कुटुंबांना सूचना देण्यात आल्या आहेत.
मात्र हा अपघात नेमका कसा झाला याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस पुढील चौकशी करत आहेत. अपघातामध्ये ट्रकचालकही मृत पावल्याची माहिती आहे.