मतदार पडताळणी कार्यक्रमात हलगर्जीपणा, तब्बल 71 शिक्षकांवर गुन्हे, राज्यातील सर्वात मोठी कारवाई
भारत निवडणूक विभागामार्फत मतदार पडताळणी कार्यक्रमात हलगर्जीपणा केल्याचा ठपका या 71 शिक्षकांवर ( केंद्रस्तरीय अधिकारी ) ठेवण्यता आला आहे.
बुलडाणा : मतदार पडताळणी कार्यक्रमात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत, एकाच तालुक्यातील तब्बल 71 शिक्षकांवर (case registered against Teacher) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात ही राज्यातील सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. भारत निवडणूक विभागामार्फत मतदार पडताळणी कार्यक्रमात हलगर्जीपणा केल्याचा ठपका या 71 शिक्षकांवर ( केंद्रस्तरीय अधिकारी ) ठेवण्यता आला आहे. ही राज्यातील सर्वात मोठी कारवाई असून या शिक्षकांनी शून्य टक्के काम केल्याचे निदर्शनास आल्याचं सांगण्यात येत आहे. मतदार नोंदणी कार्यक्रमास असहकार्य करत हलगर्जीपणा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. (case registered against Teacher)
निवडणूक विभागाने मतदार पडताळणी कार्यक्रम 11 नव्हेंबर ते 13 फेब्रुवारीदरम्यान बी एल ओ हायब्रीड अॅपनुसार ऑनलाईन करण्याचे आदेश दिले आहेत. यात मेहकर तालुक्यातील 2 लाख 17 हजार 88 मतदारांचे पुनर्निरीक्षण करायचे होते. यासाठी 241 शिक्षकांची मतदार केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून निवड करण्यात आलेली होती. मात्र तीन महिने होत आले, तरी मेहकर तालुक्यातील मतदार पडताळणीचे काम 7 टक्यांवरच आहे. त्यामुळे निवडणूक विभागाने बी एल ओ शिक्षकांना वेळोवेळी सूचना दिल्या आणि समज देण्यासाठी कारणे दाखवा नोटीसही दिल्या. मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही.
त्यामुळे शून्य टक्के काम करणाऱ्या 71 बीएलओंवर मेहकर निवडणूक निर्णायक अधिकारी यांच्या आदेशाने नायब तहसीलदार श्रीमती पंकजा मगर यांनी मेहकर पोलीस स्टेशनमध्ये लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 च्या कलम 32 नुसार व भारतीय दंड सहिता 1860 चे कलम 188 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
यापूर्वी मेहकर तालुक्यातील ग्राम डोणगांव येथील 120 क्रमांकाच्या बूथ क्रमांकावर पुर्नमतदान झाल्याने आणि त्या बूथवरील कर्मचारी निलंबित झाल्याने हा मेहकर तालुका देशभरात चर्चेत आला होता. अशातच आपल्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या 71 बीएलओंवर कारवाई झाल्याने, पुन्हा मेहकर तालुका चर्चेत आला आहे. तर या कारवाईमुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.