राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा यासाठी एका कार्यकर्त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. मात्र इतर कार्यकर्त्यांनी वेळीच त्याला रोखले आणि जीव वाचवला.
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा पक्षाध्यक्षपदाचा राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करत एका कार्यकर्त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. मात्र इतर कार्यकर्त्यांनी त्याला वेळीच रोखत त्याचा जीव वाचवला आहे. २ मे रोजी शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली होती. मात्र राज्यभरात त्याचे पडसाद उमटले असून सलग तीन दिवसांपासून एनसीपीच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्ते घोषणा देत पवारांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक प्रदेश कार्यालयात ११ वाजता सुरू झाली. या बैठकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करणारा ठराव मांडण्यात आला. हा ठराव सर्वच नेत्यांनी मंजूर केला. मात्र तेव्हाच एनसीपीच्या कार्यालयाबाहेर एका कार्यकर्त्याने स्वत:वर रॉकेल ओतले व आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला.
थोड्याच वेळात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार हे पत्रकार परिषद घेऊन बैठकीबाबतची माहिती देतील.
एकीकडे पक्ष नेत्यांची बैठक सुरू असतानाच पक्षाच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जमले होते. या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. हातात फलक घेऊन हे कार्यकर्ते जोरदार घोषणा देत होते. देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो… पवार साहेब… पवार साहेब… शरद पवार… शरद पवार अशा घोषणा हे कार्यकर्ते देत होते. रणरणत्या उन्हात हे कार्यकर्ते घामाघूम होत घोषणा देत होते. त्यामुळे या परिसरात तणावाचं वातावरण झालं होतं. याच वेळी एका कार्यकर्त्याने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी तेथील इतर कार्यकर्त्यांनी त्याला रोखले आणि मोठा अनर्थ होण्यापासून टळला.
अजित पवार येताच सुरू झाले नारे – शरद पवार, शरद पवार
गेल्या दोन दिवसांप्रमाणे आजही सकाळपासूनच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईतील राष्ट्रवादी कार्यालयात मोठ्या संख्येने जमले होते. ‘पूछो हमारे दिल से, शरद पवार फिर से’, ‘देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो’’ अशा घोषणा देत होते. सभेला उपस्थित राहण्यासाठी अजित पवार येताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ‘फिर एक बार शरद पवार-शरद पवार’ असा जोरदार घोषणाबाजी सुरू केली. अजित पवार यांनी ना पत्रकारांशी संवाद साधला ना कार्यकर्त्यांशी. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार हे एकमेव व्यक्ती आहेत ज्यांनी शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या घोषणेला पाठिंबा दिला होता.
शरद पवार त्यांचा राजीनामा मागे घेतील का ?
शरद पवार यांच्यार राजीनाम्याच्या घोषणेपासून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेते मोठ्या संख्येने ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत आणि त्यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी केली आहे. कालच शरद पवार यांनी कार्यकर्त्यांच्या प्रचंड मागणीपुढे नतमस्तक होण्याचे संकेत दिले होते आणि ‘मी तुमच्या इच्छेकडे दुर्लक्ष करणार नाही. दोन दिवसांनी इथे आंदोलनाला बसायची वेळ येणार नाही, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले होते.