रवींद्र नाट्य मंदिरात भरणार सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन!; अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार
मुंबईतील स्वामीराज प्रकाशन आणि कणकवलीतील प्रभा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभादेवीत गुरुवारी २७ मार्च रोजी " सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन" आयोजित करण्यात आले आहे.

‘ना घर होते, ना गणगोत, चालेन तेवढी पायाखालची जमीन होती…’ ही ‘माझे विद्यापीठ’ नावाची दीर्घ कविता असो की माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यावरील ‘नेहरु गेले त्यावेळची गोष्ट’ ही कविता… ‘कामगार आहे मि तळपती तलवार आहे, सारस्वतांनो माफ करा थोडासा गुन्हा करणार आहे’ अशा अनेक कवितांनी प्रस्थापितांना हादरवून सोडणारे दिवंगत कवी नारायण सुर्वे यांच्या नावाने प्रभादेवीत ‘सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन’ भरणार आहे.
मुंबईतील स्वामीराज प्रकाशन आणि कणकवलीतील प्रभा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे अध्यक्ष स्थान कवी नारायण सुर्वे यांच्या कवितांचे अभ्यासक, ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार भूषविणार आहेत. दिवंगत कवी नारायण सुर्वे यांच्या कवितांचा स्मृती जागर करणारे हे एकदिवसीय साहित्य संमेलन गुरुवारी २७ मार्च रोजी प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात भरणार आहे.
या संमेलनात नारायण सुर्वे यांच्या गीतांचे शाहीरी गायन, काव्य अभिवाचन, परिसंवाद, मुलाखत, निमंत्रितांचे कवी संमेलन, एकांकिका आणि “आणखी एक मोहन्जोदारो” या बहुचर्चित लघुपटाचे प्रदर्शन असा भरगच्च कार्यक्रम आखण्यात आला आहे. सकाळी १० ते रात्री १० पर्यंत हे संमेलन चालणार आहे. या संमेलनास सर्व साहित्य रसिकांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन स्वामीराज प्रकाशनचे रजनीश राणे आणि प्रभा प्रकाशनचे अजय कांडर यांनी केले आहे.




मास्तरांची सावली पुरस्काराने गौरव
या संमेलनात प्रदीप आवटे, योगिता राजकर ,सुनील उबाळे, सफर अली इसफ, मधुकर मातोंडकर आणि सुजाता राऊत या साहित्यव्रतींचा ” मास्तरांची सावली ” पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, शाल,श्रीफळ आणि ग्रंथ भेट असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
प्रमोद पवार यांचा प्रवास
प्रमोद पवार यांनी अभियनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. मराठी नाटक आणि प्रायोगिक रंगभूमी असो की मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांचं योगदान अतुलनीय आहे. त्यांनी खतरनाक (२००१), जोगवा (२००९), देऊळ बंद (२०१५) आणि आंद्याचा फंडा (२०१७) यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या आहेत. म्हैस (२०१३), पोलिस लाईन – एक पूर्ण सत्य (२०१६), मुंबई टाईम (२०१६), भो भो (२०१६) आणि संभाजी १६८९ (२०१७) यातील भूमिकाही त्यांच्या अविस्मरणीय ठरल्या आहेत.