मोठी बातमी ! नाराज गावकऱ्यांनी समस्यांचा पाढा वाचला, पालकमंत्री दादा भुसे म्हणाले हात जोडून विनंती करतो, पण…
दादा भुसे यांच्या मध्यस्थीनंतर नाराज ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले आहे, लवकरात लवकर कामे होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली असून आश्वासने पूर्ण झाली नाहीतर पुढील निर्णय घेऊ असा इशारा देखील यावेळी दिला आहे.
चंदन पूजाधिकारी, नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथील नाराज नागरिक आणि पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडली. या बैठकीत सुरगाणा येथील विलीनीकरण संघर्ष समितीच्या वतिने समस्यांचा पाढा वाचण्यात आला होता. बैठकीत रस्ता, आरोग्य सुविधा, पाणी, वीज नसल्याने गुजरातला जाऊ देण्याची विनंती केली. आमचा विकास करून घ्या, अन्यथा आमचा मार्ग मोकळा करून द्या अशी सुरगाणा ग्रामस्थांनी पालकमंत्री दादा भुसे आणि प्रशासनाला विनंती केली होती. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, सुरगाणा उपजिल्हा रुग्णालय व्हावे, प्रस्तावित असलेले उंबरठाण ग्रामीण रुग्णालय व्हावे, रोजगार हमी योजना कागदावर राहू नये, पावसाळ्यात खड्डे डांबराने भरावेत, तात्पुरती मलमपट्टी नको, 108 अम्ब्युलन्स नाही, उपलब्ध व्हावी, चांगल्या दर्जाची प्राथमिक शाळा द्यावी, नॅशनल बँका नाही, त्या बँका व्हाव्यात, पाण्याची व्यवस्था व्हावी या मागण्या करण्यात आल्या.
याशिवाय मोबाईल नेटवर्क नाही, कंपन्यांशी चर्चा करावी, एसटी डेपो व्हावा, कुकडने गावातील दारू दुकान बेकायदेशीर, त्याची चौकशी व्हावी, गुजरात च्या गावांना मिळते तशी व्यवस्था व्हावी.
शासकीय वसतिगृह, आश्रमशाळा यांची हलाखीची परिस्थिती, सुरगाणा मार्केट कमिटी दिंडोरीला जोडून द्यावी, विहिरींना पाणी नाही, वीज नाही अशा विविध समस्यांचा पाढाच यावेळी वाचण्यात आला.
नाराज ग्रामस्थांनी म्हणणे मांडल्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी नाराज ग्रामस्थांनी मनधरणी केली आहे.
यावेळी अधिकाऱ्यांना धारेवर धरत ऑफिसमध्ये बसून पाट्या टाकू नका, गावात जाऊन गावकऱ्यांच्या मागण्या काय आहेत ते बघा असा दमच भुसे यांनी भरला.
भुसे यांनी या सर्व समस्यांच्या बाबतीत जे अधिकारी उपस्थित होते त्यांना तात्काळ सूचना देत प्राधान्यक्रमाने कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहे.
अधिकाऱ्यांना झापत पालकमंत्री दादा भुसे यांनी नाराज ग्रामस्थांना वेळ द्या सगळीकामे पूर्ण करू असं आश्वासन दिले आहेत.
भुसे म्हणाले, आपल्या भावना रास्त असला तरी टोकाची भूमिका घेऊ नका, हुतात्मे शहीद झाले आणि त्या नंतर आपल्याला महाराष्ट्र मिळाला आहे.
सगळ्यांना हात जोडून विनंती, महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला गालबोट लागेल असे काम करू नका, तुम्हाला दिलेला शब्द पाळू असं पालकमंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषदेत म्हंटले.
दादा भुसे यांच्या मध्यस्थीनंतर नाराज ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले आहे, लवकरात लवकर कामे होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली असून आश्वासने पूर्ण झाली नाहीतर पुढील निर्णय घेऊ असा इशारा देखील यावेळी दिला आहे.